तीन महिन्यांचे बाळ :
बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याठिकाणी तीन महिन्याच्या बाळाची घ्यावयाची काळजी, आहार याची सविस्तर माहिती दिली आहे.
तीन महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची :
प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो.
बालकाचे (baby boy) चे वजन 5.1 ते 7.9 किलो आणि उंची 64 सेमी पर्यंत इतकी असू शकते.
तर बालिकेचे (baby girl) चे वजन साधारण वजन 4.6 ते 7.4 किलो असते आणि उंची सुमारे 61 सेमी पर्यंत असू शकते.
तीन महिन्यांच्या बाळातील विकासाचे टप्पे :
• बाळाला पालथे झोपविल्यास ते आपली मान व खांदे उचलते.
• आवाजाच्या दिशेने प्रतिसाद देते.
• बाळाला बोलाविल्यास आनंदाने हुकार देते, हसते.
• आसपासच्या लोकांना ओळखते.
• खेळणी पकडायला शिकते.
तीन महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता असा असावा :
पहिले सहा महिने नवजात बालकाचा आहार म्हणजे आईचे दूध हेचं असते. त्यामुळे तिसऱ्या महिन्यातही बाळाला स्तनपान करावे. तीन महिन्याची बालके दिवसभरात 8 ते 10 वेळा स्तनपान करू शकतात. आईचे दुध सोडून बाळास इतर कोणताही आहार 3ऱ्या महिन्यात देऊ नये. त्यामुळे बाळास पाणी, ग्राईप वॉटर, ग्लुकोजचे पाणी, फळांचा रस, गुटी वैगरे काहीही देऊ नये.
काही परिस्थितीत बाळास आईचे दूध देता येत नसल्यास पावडरचे फॉर्म्युला दूध दिले जाते. तिसऱ्या महिन्यात फॉर्म्युला दूध देताना बाळाला सहा ते सात वेळा थोडे थोडे फॉर्म्युला दूध दिले पाहिजे.
तीन महिन्याच्या बाळाची झोप :
तीन महिन्याचे बाळ एका दिवसात 15 तास झोप घेत असते. बाळाची वाढ आणि विकासासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.
तीन महिन्याच्या बाळाचे लसीकरण :
तिसऱ्या महिन्यात बाळाला अडीच महिना किंवा दहा आठवडे पूर्ण झाल्यावर खालील तीन लसी दिल्या जातात.
• पोलिओ (2) – बाळाला अडीच महिना पूर्ण झाल्यावर पोलिओचा दुसरा डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या तोंडात दोन थेंब पोलिओचा डोस दिला जातो.
• डी.पी.टी. (2) – बाळाला अडीच महिना पूर्ण झाल्यावर डी.पी.टी. चा दुसरा डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या उजव्या मांडीच्या बाहेरील बाजूस लस टोचली जाते.
• हेपाटिटिस बी (3) – हेपाटिटिस बी ची तिसरी लस बाळाच्या डाव्या मांडीत बाहेरील बाजूस दिली जाते.
तिसऱ्या महिन्यात बाळाच्या विकासासाठी हे करा :
तिसऱ्या महिन्यात बाळाला काही वेळ पोटावर झोपवावे व त्याच्या समोर खेळणी ठेवावी. त्यामुळे बाळ आपले डोके व खांदे वर उचलण्यासाठी हळूहळू प्रयत्न करीत असते. त्यामुळे त्याची मान, खांदा येथील मांसपेशी मजबूत होतात व बाळाची मान धरते. याशिवाय,
• अंघोळ घालण्यापूर्वी बाळाला मालिश करावी.
• बाळाला रंगीबेरंगी खेळणी आणून द्यावीत.
• बाळाला झोपवताना छान छान अंगाई गीते म्हणावीत.
डॉक्टरांकडे कधी जावे..?
तिसऱ्या महिन्यात बाळ दूध पीत नसल्यास किंवा त्याला ताप, अतिसार, उलट्या, सर्दी, खोकला असे त्रास झाल्यास बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.