प्रेग्नन्सीमध्ये वजन कमी होणे :
गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. गरोदरपणात स्त्रीचे वजन वाढणे हे स्वाभाविक असते. परंतु काही गर्भवती महिलांमध्ये असे होताना दिसत नाही. अनेक स्त्रिया अशा असतात की ज्यांचे वजन गर्भावस्थेत पुरेसे वाढत नाही. मात्र प्रेग्नन्सीमध्ये वजन कमी होणे तसेच वजन अधिक प्रमाणात वाढणे ह्या दोनही स्थिती चिंताजनक असतात.
जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होते, तेव्हा तिच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण अशावेळी आईने घेतलेल्या आहारातूनचं पोटातील बाळाची वाढ होत असते. पोटातील बाळाची योग्यरित्या होत आहे की नाही ते गरोदर स्त्रीच्या वाजनावरून लक्षात येऊ शकते.
गरोदरपणात वजन कमी असण्याची ही आहेत करणे :
जर गरोदर होण्यापूर्वी स्त्रीचे वजन कमी असेल तर अशा स्त्रियांचे वजन गर्भधारणेदरम्यान देखील योग्यप्रकारे वाढत नाहीत. त्यामुळे त्यांचे वजन गरोदरपणात कमी असते. तसेच जर स्त्रीला गर्भावस्थेत योग्य पोषक आहार न मिळाल्यास वजन कमी राहत असते. याशिवाय गरोदरपणात उलट्या, अतिसार यासारखे त्रास प्रेग्नेंट महिलेला अधिक प्रमाणात झाल्यामुळेही गरोदरपणात वजन कमी होत असते.
गर्भधारणेदरम्यान जर आईचे बॉडी मास इंडेक्स (BMI) हा 18.5 पेक्षा कमी असेल तर काही समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी गर्भपात होण्याची, पोटात बाळ दगावण्याची, अकाली प्रसूती होण्याची किंवा जन्मणारे बाळ हे कमी वजनाचे असण्याची समस्या निर्माण होत असते.
गर्भावस्थेत वजन कमी असल्यास हे करा उपाय :
गरोदरपणात ज्या स्त्रियांचे वजन कमी असते त्यांना वजन वाढवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे ज्या स्त्रियांचे वजन गरोदरपणात कमी असते त्यांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक असते. विशेषतः त्यांनी प्रोटिन्स, कर्बोदके, व्हिटॅमिन, खनिजे, फायबर्स अशी पोषकतत्वे असणारा पोषक आहार घेणे आवश्यक असते.
यासाठी आहारात दूध व दुधाचे पदार्थ, सुकामेवा, विविध फळे, फळांचा ताजा रस, कडधान्ये, धान्ये, पालेभाज्या, फळभाज्या, मांस, मासे, अंडी यांचा आहारात समावेश करावा. आहार वेळच्यावेळी व पुरेसा घ्यावा. दिवसातून तीन ते चार वेळा थोडाथोडा आहार घ्यावा. पुरेसे पाणीही प्यावे. तसेच दुपारच्या वेळेस थोडी विश्रांती व झोप घ्यावी.
गर्भधारणेत अचानक वजन कमी होणे हे चिंताजनक असते का..?
होय, गर्भारपणात अचानक वजन कमी होणे हे चिंताजनक बाब असते. कारण अशावेळी गर्भवती आणि गर्भाशयातील बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः गर्भधारणेदरम्यान हायपेरेमेसिस ग्रॅव्हिडारममुळे अचानक वजन कमी होऊ शकते. यावेळी गर्भवतीस नेहमीपेक्षा जास्त उलट्या होतात ज्यामुळे ती कमकुवत होऊ लागते. अशा परिस्थितीत, गर्भवतीचे वजन गर्भधारणेदरम्यान 15 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. अशावेळी तातडीचे वैद्यकीय उपचार आवश्यक असतात.
Read Marathi language article about causes of weight loss during pregnancy. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.