गर्भावस्थेतील गर्भाची वाढ :

गरोदरपणात आईच्या पोटात बाळाची वाढ होत असते. गर्भाशयातील बाळाची वाढ ही आईच्या आहारावरच अवलंबून असते. मात्र अनेक गरोदर स्त्रियांच्या बाबतीत गर्भधारणेदरम्यान पुरेशी काळजी घेतल्यानंतरही गर्भाशयातील बाळाची वाढ योग्यप्रकारे होताना दिसत नाही. यासाठी येथे पोटातील गर्भाची अपेक्षित वाढ न होण्याची कारणे व त्यावरील उपाय यांची माहिती दिली आहे.

गर्भाची वाढ ही खालील कारणांमुळे अत्यंत हळूहळू होत असते :

प्रेग्नन्सीमध्ये गर्भाची वाढ योग्यरीत्या न होता हळूहळू होत असल्यास त्या स्थितीला इंट्रायूटरिन ग्रोथ रिस्ट्रक्शन (IUGR) असे म्हणतात. यामध्ये गर्भाची वाढ ही इतर बाळांच्या तुलनेत अगदी सावकाशपणे होत असते. तसेच अशा गर्भाचे वजनही कमी असते. यामुळे अशी बाळे कमी वजनाची जन्मतात. गर्भाची वाढ अत्यंत सावकाश होत असल्यास बाळाच्या आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकते.

गर्भाची वाढ अगदी मंदगतीने होत असल्याची लक्षणे :

जर गर्भाची वाढ योग्यरीत्या होत असेल तर, आईचे वजनही योग्यरीत्या वाढत असते. त्यामुळे आईच्या वजनावरून पोटातील बाळाची वाढ योग्यप्रकारे होत आहे की नाही ते ठरवता येते. याशिवाय अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्येही गर्भाची वाढ हळू होत असल्याचे दिसून येत असते.

गर्भाची अपेक्षित वाढ न होण्याची कारणे :

प्रेग्नन्सीमध्ये गर्भ हा व्यवस्थित वाढत नसल्यास त्याला अनेक कारणे जबाबदार असू शकतात. गर्भाची वाढ योग्यरीत्या न होणे अर्थात ‘IUGR’ ही स्थिती होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

1) पोषकघटकांची कमतरता –
गरोदरपणात गर्भाच्या वाढीसाठी पोषकघटकांनी युक्त असा आहार घेणे आवश्यक असते. अशावेळी आईने योग्यप्रकारे आहार न घेतल्यास पोटातील बाळास पोषकघटक न मिळाल्याने त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ लागतो. गरोदरपणात प्रोटीन, कॅल्शियम, लोह, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन अशी पोषकतत्वे आवश्यक असतात. त्यामुळे गर्भाची अपेक्षित वाढ होत नसल्यास गरोदर स्त्रीने स्वत:च्या आहाराकडे लक्ष द्यावे. डॉक्टरांनी दिलेली पूरक औषधे व लोह, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या वेळेवर घ्याव्यात. गरोदरपणी आहार कसा असावा ते जाणून घ्या..

2) प्री-एक्लेम्पसिया –
गर्भावस्थेत प्रेग्नंट स्त्रीमध्ये प्री-एक्लेम्पसियाची धोकादायक स्थिती निर्माण झाल्यास गर्भाची वाढ योग्यप्रकारे होत नाही. प्रेग्नन्सीमध्ये उच्च रक्तदाब असणे, हातापायांवर सूज येणे अशी लक्षणे प्री-एक्लेम्पसियामध्ये असतात. प्री-एक्लेम्पसियामुळे शिरा संकुचित होतात व प्लेसेंटामध्ये रक्त प्रवाह व्यवस्थित जात नाही. त्यामुळे वाढणाऱ्या गर्भास रक्ताचा पुरवठा कमी होतो. अशाप्रकारे पोटातील बाळास रक्तातून पोषक घटक आणि ऑक्सिजन व्यवस्थित मिळत नाही. याचा परीणाम गर्भाच्या वाढीवर होत असतो. प्री-एक्लेम्पसियाविषयी अधिक माहिती जाणून घ्या..

3) इन्फेक्शन –
गर्भावस्थेत आईकडून गर्भातील बाळास सिफलिस, टॉक्सोप्लाज्मोसिस, रुबेला यासारख्या जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळेही गर्भाच्या वाढीवर वाईट परिणाम होत असतो.

4) प्लेसेंटासंबंधित कारणे –
जर प्लेसेंटा योग्य प्रकारे कार्य करत नसल्यास, गर्भाला आईकडून ऑक्सिजन आणि पोषकतत्वे व्यवस्थित मिळत नाहीत. यामुळेही गर्भाची वाढ मंद होत असते.

5) गर्भजल कमी असणे –
गर्भजल किंवा अम्नीओटिक फ्लुइडची पातळी कमी असल्यास त्यामुळेही गर्भाची वाढ व्यवस्थित होत नाही.
याशिवाय गर्भातील जन्मजात क्रोमोसोमल विकृती यामुळेही गर्भाची वाढ मंदपणे होत असते.

गर्भाची वाढ व्यवस्थित होत नसल्यास अशी घ्यावी काळजी :

• नियमित डॉक्टरांकडून गर्भाची तपासणी करून घ्यावी.
• डॉक्टरांनी दिलेली औषधे व त्यांच्या सूचनांचे पालन करावे.
• संतुलित पोषकघटकांनी युक्त असा आरोग्यदायी आहार घ्यावा.
• आहारात दूध व दुधाचे पदार्थ, सुकामेवा, विविध फळे, फळांचा ताजा रस, कडधान्ये, धान्ये, पालेभाज्या, फळभाज्या, मांस, मासे, अंडी यांचा आहारात समावेश करावा.
• आहार वेळच्यावेळी व पुरेसा घ्यावा.
• दिवसातून तीन ते चार वेळा थोडाथोडा आहार घ्यावा.
• डॉक्टरांनी सांगितलेला व्यायाम नियमित करावा. विशेषतः दीर्घश्वसन करावे. यामुळे पुरेसे ऑक्सिजन बाळास मिळण्यास मदत होते.
• झोप आणि पुरेशी विश्रांती घ्यावी.
असे काही उपाय आहेत की, ज्यामुळे गर्भाची वाढ योग्यरीत्या होण्यास मदत होईल.


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...