साप चावणे आणि त्यावरील उपाय (Snake bite) :
अनेकदा आपल्या आसपास एकाद्यास साप चावल्याच्या घटना घडत असतात. अशावेळी साप चावल्यास कोणते प्राथमिक उपाय करावेत, काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यास, शक्य तितक्या लवकर वैद्यकिय सुविधा मिळणे आवश्यक आहे. अशावेळी साप चावल्यावर कोणतेही घरगुती उपाय न करता तात्काळ रूग्णाला दवाखान्यात घेऊन जावे.
साप चावल्यावर दिसणारी लक्षणे –
- साप चावलेल्या ठिकाणी जखम होणे,
- सर्पदंशाच्या ठिकाणी लालसरपणा, सूज व वेदना होणे,
- उलट्या व मळमळ होणे,
- अस्पष्ट दिसणे,
- घाम सुटणे,
- आकडी येणे (convulsions)
- श्वास घेण्यास त्रास होणे,
- अन्न गिळण्यास त्रास होणे,
- पोटात दुखणे, ताप येणे,
- शॉक,
- हातापायात मुंग्या येणे किंवा बधिरता जाणवणे,
- पक्षाघात (paralysis) अशी लक्षणे सापाच्या विविध जातीनुसार जाणवू शकतात.
साप चावल्यावर काय करावे..?
जर तुम्हाला चावलेला साप हा विषारी होता की बिनविषारी हे निश्चित करता येत नसल्यास, विषारी साप समजूनच प्राथमिक उपाय करावे. अशावेळी पहिला प्राथमिक उपाय म्हणजे, तात्काळ साप चावलेल्या व्यक्तीला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी 108 नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी किंवा वाहन असल्यास त्यातून व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जावे. साप चावल्यावर काय करावे, कोणती काळजी घ्यावी याची माहिती येथे दिली आहे.
साप चावल्यास हे प्राथमिक उपाय करावे :
- तात्काळ 108 या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी किंवा जवळपास वाहन असल्यास त्यातून साप चावलेल्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जावे.
- रुग्णवाहिका येण्यास वेळ असल्यास साप चावलेल्या व्यक्तीस शांत करावे, त्याला धीर द्यावा.
- त्या व्यक्तीला आडवे झोपवावे.
- साप चावलेल्या व्यक्तीस जास्त हालचाल करू देऊ नये. कारण यामुळे रक्तप्रवाहातून शरीरात लवकर विष पसरत असते.
- साबणाच्या पाण्याने साप चावलेल्या ठिकाणी धुवावे. जंतुनाशक औषध (अँटीसेप्टिक औषध) जवळ असल्यास जखमेवर लावावे.
- साप चावलेल्या ठिकाणाच्या थोड्या वरील बाजूस दोरीने आवळपट्टी बांधावी. यामुळे विष सर्व शरीरात पसरण्यापासून रोखले जाते. मात्र आवळपट्टी जास्त घट्ट बांधू नये. ती थोडी सैल बांधावी.
- बांधलेली आवळपट्टी 10-15 मिनिटांनी सोडून 15 सेकंद झाल्यावर पुन्हा बांधावी.
- रूग्णाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल करा.
साप चावल्यानंतर काय करू नये..?
साप चावल्यास काय करावे यापेक्षा साप चावल्यानंतर काय करू नये हे लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे.
- साप चावल्यास भयभीत होऊ नये.
- सापाला शोधण्यास किंवा साप मारण्यास वेळ घालवू नये. त्यापेक्षा सर्पदंश झालेल्या व्यक्तीला लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा कशी मिळवून देता येईल ते पाहावे.
- साप चावलेल्या व्यक्तीस चालत दवाखान्यात नेऊ नये. रुग्णवाहिका किंवा जवळच्या वाहनातून त्याला दवाखान्यात घेऊन जावे.
- साप चावलेल्या ठिकाणी ब्लेडने चिरा देऊ नये. यामुळे रक्तस्त्राव होऊन रुग्णाचा जीव धोक्यात येतो.
- साप चावलेली जखम चोळू नये.
- साप चावल्यानंतर कोणतेही घरगुती उपाय करीत बसू नये.
- साप चावलेल्या ठिकाणी तोंडाने रक्त शोषण्याचा प्रयत्न करू नये.
- बर्फ किंवा कोल्ड compress काहीही जखमेवर लावू नये.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर कोणतेही औषध, झाडपाला जखमेवर लावू नये.
- साप चावलेल्या ठिकाणी लोखंड वैगेरे काहीही गरम करून चटके लावू नयेत.
- साप चावलेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू असे काहीही पिण्यास देऊ नये.
- आवळपट्टी किंवा दोरी जास्त घट्ट बांधू नये.
- सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मांत्रिकाकडे घेऊन जाऊ नये. मंत्रातून सापाचे विष उतरत नाही. अंधश्रध्देच्या नादी लागून रुग्णाचा अमूल्य वेळ व्याया घालवू नये.
साप चावणे यावरील औषध उपचार :
शासकीय दवाखान्यात सर्पदंशावर मोफत उपचार केले जातात. यावेळी हॉस्पिटलमध्ये जखम स्वच्छ करून जंतुनाशक औषध लावले जाते. तसेच आवश्यकता वाटल्यास tetanus इंजेक्शन देतात. सर्पदंशावरील प्रमुख उपचार हे ‘अँन्टीस्नेक वेनम सिरम’ (antivenom) याद्वारे करतात. antivenom इंजेक्शन हे सर्पदंशावरील अतिशय प्रभावी असे औषध आहे.
Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 14, 2024.