गरोदरपणातील झोप आणि विश्रांती :
गर्भावस्थेत झोपेच्या अनेक तक्रारी होऊ शकतात. गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भामुळे गरोदरपणात पोट वाढलेले असते. अशावेळी आरामदायी स्थितीत झोप घेणे अवघड वाटत असते. तसेच याकाळात होणाऱ्या पाठदुखी, कंबरदुखी, पायात गोळा येणे, रात्री लघवीला जावे लागणे अशा अनेक कारणांमुळे झोपमोड होत असते.
मात्र गर्भारपणात आईने पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे आवश्यक असते. यासाठी येथे प्रेग्नन्सीमध्ये आरामदायक झोप येण्यासाठी गर्भावस्थेत झोपण्याची स्थिती कशी असावी, गरोदरपणात कसे झोपावे, गर्भवती महिलांनी किती तास झोप व विश्रांती घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
प्रेग्नन्सीमध्ये गरोदर स्त्रीने किती झोप घ्यावी..?
प्रेग्नन्सीत पुरेशी झोप व विश्रांती घेणे आवश्यक असते. कारण प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे थकवा अधिक जाणवत असतो. यासाठी रात्रीच्या वेळी पुरेशी म्हणजे किमान आठ तास झोप घ्यावी. विनाकारण जागरण करू नये. तसेच प्रेग्नन्सीमध्ये दुपारीही काहीवेळ म्हणजे एक ते दीड तास झोप घ्यावी.
गरोदरपणात झोपण्याची योग्य स्थिती कोणती असते..?
गरोदरपणात डाव्या कुशीवर गुडघे थोडे दुमडून झोपणे आरामदायी ठरू शकते. अशावेळी गर्भवतीने पायाखाली उशी ठेवून झोपल्यास खूप चांगले असते.
गर्भावस्थेत डाव्या कुशीवर का झोपावे..?
गरोदरपणात डाव्या कुशीवर झोप घेणे उपयुक्त असते. यामुळे आपणास आरामदायक झोप येऊ शकते तसेच ही स्थिती आपल्या बाळासाठीही चांगली असते. कारण डाव्या कुशीवर झोपल्यामुळे नाळेत रक्त आणि पोषकतत्वे योग्यरीत्या जाण्यास मदत होते. त्यामुळे बाळाचे योग्यप्रकारे पोषण होण्यास मदत होते.
याव्यतिरिक्त डाव्या कुशीवर झोपल्याने तुमच्या शरीरातील अपायकारक घटक किडणीतून फिल्टर होऊन लघवीवाटे बाहेर निघून जाण्यासही मदत होते. त्यामुळे हातापायावर सूज येणे, रक्तदाब वाढणे असले गरोदरपणी होणारे त्रास कमी होतात.
गर्भावस्थेत गर्भवतीने कसे झोपू नये..?
गर्भावस्थेत पोटात बाळ वाढत असल्याने पोटावर झोपू नये. यामुळे पोटावर दबाव पडत असतो तसेच यामुळे थकवा येणे, चक्कर येणे असे त्रास होऊ शकतात.
झोप येत नसेल तर डॉक्टरी सल्ला घ्यावा. स्वतःच्या मनाने झोपेच्या गोळ्या घेऊ नयेत. त्या गोळ्यांचा गर्भावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात कोणता आहार घ्यावा ते जाणून घ्या
Read Marathi language article about Sleeping Positions During Pregnancy. Last Medically Reviewed on February 17, 2024 By Dr. Satish Upalkar.