अकाली जन्मलेले बाळ (Premature baby) :
आईच्या गर्भाशयात बाळ हे वाढत असते आणि बाळाचा जन्म हा साधारण नऊ महिन्यांनंतर होत असतो. परंतु काही कारणांमुळे नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच बाळाचा जन्म होऊ शकतो. अशा बाळास वेळेपूर्वी जन्मलेले बाळ किंवा प्री मॅच्युअर बेबी असेही म्हणतात.
प्री मॅच्युअर बाळांच्या जन्माचे वाढते प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. जर गर्भधारणेच्या 37 आठवड्यांपूर्वी बाळाचा जन्म झाल्यास त्याला ‘प्री-मॅच्युअर बर्थ’ असे म्हणतात. मात्र 37 ते 42 आठवड्यात जन्म होणे हे बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण या आठवड्यात जन्मलेल्या बाळांच्या अंग अवयवांची पूर्ण वाढ झालेली असते.
अशा प्रकारच्या वेळेपूर्वी जन्मलेल्या बालकांना अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार तातडीने मिळणे गरजेचे असते. मुदतपूर्व प्रसूतीत जन्मलेल्या बाळाचे वजन हे पूर्ण वाढ होऊन जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत खूप कमी असते. तसेच त्यांची त्वचा अतिशय नाजूक असते. म्हणूनच अशा कमी वजनाच्या बाळांकडे जन्मल्यापासून विशेष लक्ष देण्याची, त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जाण्याची आणि विशेष काळजी घेण्याची गरज असते.
वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळातील काही लक्षणे व समस्या :
• वेळेपूर्वी जन्मलेले बाळ खूपच नाजूक असते.
• वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असते.
• अकाली बाळाची त्वचा ही पूर्ण वाढ झालेल्या सामान्य बाळाच्या त्वचेपेक्षा पातळ असते.
• अकाली जन्मलेले नवजात बाळ हे इतर सामान्य बाळाच्या तुलनेत कमी शारीरिक क्रिया करतात.
• अकाली बाळाचे वजन सामान्य जन्मलेल्या बाळापेक्षा कमी असते. बहुतेक अकाली बाळांचे वजन 2 ते 1.5 किलो किंवा त्यापेक्षा कमी असू शकते
• अशी मुले अत्यंत हळू आवाजात रडतात.
• श्वास घेताना जोरात श्वासोच्छ्वास घेत असतात.
• अकाली जन्मलेल्या बाळात ऍनिमियाची समस्या होऊ शकते.
• याशिवाय त्यांना कावीळ, नेक्रोटिझिंग एन्टरोकॉलिटिस असे आरोग्य समस्या होऊ शकतात.
प्री मॅच्युअर बाळांची हॉस्पिटलमध्ये घेतली जाणारी काळजी (Premature baby care) :
जन्मल्याबरोबर त्यांना उपचाराकरिता नवजात अर्भकांकरिता खास बनविल्या गेलेल्या अतिदक्षता विभागात (NICU)मध्ये ठेवण्याची आवश्यकता भासते. त्यांच्या जिवाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी अतिदक्षता विभागात बाळ सतत वैद्यकीय देखरेखीखाली असणं गरजेचे असते. बाळाच्या रक्तातील ऑक्सिजन, शर्करा, रक्त पेशींची संख्या, हृदयाच्या ठोक्यांचा वेग आदी गोष्टींची अतिदक्षता विभागात विशेष लक्ष देऊन त्यांची सतत वैद्यकीय नोंद ठेवणे आणि त्यानुसार व चालू असलेल्या उपचारांना बाळाकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार पुढचे उपचार ठरवणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे जितक्या लवकर बाळ जन्माला आले आहे तितके दिवस किंवा त्याची तब्येत नॉर्मल होईपर्यंत बाळाला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणे आवश्यक असते.
अशी बालके हॉस्पिटलमधून घरी आणल्यावरही अधिक काळजी घ्यावी लागते. कारण त्यांना इन्फेक्शन होण्याचा जास्त धोका असल्याने जास्त स्वच्छता बाळगावी. आजारी व्यक्तींनी बाळाजवळ जाणे टाळावे.
अकाली जन्मलेल्या बाळाचे वजन असे वाढवावे :
वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांचे वजन हे कमी असू शकते. त्यामुळे अशा बाळास आईने सहा महिने स्तनपान दिले पाहिजे. कारण आईच्या दुधात सर्व आवश्यक पौष्टिक पदार्थ असतात, जे बाळाच्या वाढीस मदत करतात. हे त्याचे वजन वाढविण्यास देखील मदत करते.
कांगारू केअर पद्धतसुद्धा अशा बाळांसाठी उपयोगी असते.
जर वेळेपूर्वी जन्मलेले बाळ असल्यास किंवा बाळाचे वजन कमी असल्यास बाळ दूध मागण्याची वाट बघत बसू नये. अशावेळी 2 ते 3 तासांनी बाळास स्तनपान देत राहावे. त्यामुळे त्यांचे पोषण होऊन तब्येत सुधारण्यास मदत होते.
हे सुद्धा वाचा –> बाळाचे वजन वाढवण्याचे उपाय जाणून घ्या..
बाळाला दूध पाजताना एकावेळी एका बाजूच्या स्तनानेच पाजले पाहिजे. कारण स्तनातून सुरुवातीला येणारे दूध (म्हणजे फोअर मिल्क) हे पातळ असते. यात पाणी व साखर यांचं प्रमाण जास्त असते. तर नंतर येणारे दूध (म्हणजे हाईड मिल्क) हे घट्ट असतं. यात स्निग्ध पदार्थांचं प्रमाण जास्त असते. असे दूध बाळास मिळाल्यास बाळाचे पोषण होऊन वजन वाढण्यास मदत होते.
Read Marathi language article about Premature baby care. Last Medically Reviewed on March 10, 2024 By Dr. Satish Upalkar.