जन्मापासून काही महिने आईचे दूध हाच बाळाचा योग्य आहार असतो. आईच्या दुधाचे पचन बाळाच्या शरीरात 20 मिनिटे ते एक तासात होत असते. त्यामुळे बालकास वरचेवर भूक लागत असते. अशावेळी बालकास भूक लागेल त्यावेळी त्याला स्तनपान द्यावे लागत असते.
दिवसातून बाळाला किती वेळा पाजावे..?
बाळास भूक लागेल तसे स्तनपान करणे आवश्यक असते. पहिल्या सात दिवसात वारंवार बाळास दूध पाजावे लागते. डिलिव्हरीनंतर पहिल्या सात दिवसात दररोज 8 ते 10 वेळा बाळास स्तनपान करावे लागू शकते.
त्यानंतर चार ते पाच तासांनी जेंव्हा बाळ रडेल तेंव्हा बाळास स्तनपान करावे. बाळ मागेल तेव्हा व मागेल तेवढा वेळ स्तनपान द्यावे. बाळाने मागितल्यास रात्रीच्या वेळीही बाळास स्तनपान करावे. रात्रीच्या वेळी दोन ते तीन वेळा स्तनपान करणे पुरेसे असते.
जर वेळेपूर्वी जन्मलेले बाळ असल्यास किंवा बाळाचे वजन कमी असल्यास बाळ दूध मागण्याची वाट बघत बसू नये. अशावेळी 2 ते 3 तासांनी बाळास स्तनपान देत राहावे. त्यामुळे त्यांचे पोषण होऊन तब्येत सुधारण्यास मदत होते.
बाळाला दूध पाजताना एकावेळी एका बाजूच्या स्तनानेच पाजले पाहिजे. कारण स्तनातून सुरुवातीला येणारे दूध (म्हणजे फोअर मिल्क) हे पातळ असते. यात पाणी व साखर यांचं प्रमाण जास्त असते. तर नंतर येणारे दूध (म्हणजे हाईड मिल्क) हे घट्ट असतं. यात स्निग्ध पदार्थांचं प्रमाण जास्त असते. असे दूध बाळास मिळाल्यास बाळाचे पोषण होऊन वजन वाढण्यास मदत होते.
एकावेळी किती वेळ स्तनपान करावे.?
काही बाळं लवकर स्तनपान संपवतात. अशावेळी स्तनपानसाठी पाच ते दहा मिनिटे लागतात. तर काही हळूहळू म्हणजे अर्धा ते पाऊण तासही स्तनपान करीत असतात.
नोकरी करणाऱ्या आईने स्तनपान कितीवेळा व कसे करावे..?
जर आई नोकरी करणारी असेल तर ती आपले दूध निर्जंतूक, हवाबंद डब्यात काढून ठेवून जाऊ शकते. हे दूध साधारणत: सहा तास चांगले राहते. बाळाला थोड्या थोड्या वेळाने हे दूध निर्जंतूक केलेल्या चमचा-वाटीने पाजावे. स्तनातून हाताने किंवा ब्रेस्ट पंपचा वापर करून दूध काढता येते.
स्तनपान केल्यानंतर बाळाचे पोट भरले आहे की नाही हे कसे समजते..?
जर बाळ स्तनपान करीत असल्यास आणि बाळ दिवसातून पाच ते सहा वेळा शी व लघवी करत असल्यास, याचा अर्थ असा होतो की बाळाचे पोट भरत असून त्याला दुधातून आवश्यक ते पोषण मिळत आहेत.
तसेच दर महिन्याला बाळाचं वजन कमीतकमी अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅमने वाढत असेल तर आईचं दूध बाळाला पुरेसं आहे हे समजावे. बाळाला पुरेशी लघवी होणे तसेच बाळाचे व्यवस्थित वजन वाढणे या दोन गोष्टीवरून स्तनपान व्यवस्थित चालू आहे हे समजण्यास मदत होते.
स्तनपान करणाऱ्या बाळास पाणी किंवा फळांचा रस द्यावा का..?
जर बाळ स्तनपान करीत असल्यास त्याला पाणी किंवा फळांचा रस पिण्याची आवश्यकता नसते. आईच्या दुधातूनचं बाळास पुरेसे पाणी मिळत असते. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या बाळांना सहा महिने होईपर्यंत पाणी, फळांचा रस, मध किंवा अन्य पदार्थ देऊ नयेत.
हे सुद्धा वाचा..
बाळाचे वजन वाढवण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
Read Marathi language article about How Much and How Often to Breastfeed? Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.