प्लेसेंटा प्रिव्हिया म्हणजे काय (Placenta previa) :
प्रेग्नन्सीमध्ये आई आणि बाळ यांना साधणारा दुवा म्हणजे वार (प्लेसेंटा). गर्भावस्थेत पिशवीमध्ये बहुतांशवेळा वरील बाजूस ‘प्लेसेंटा’ असावी लागते. परंतु काहीवेळा प्लेसेंटाची पोझिशन ही पिशवीच्या खालच्या बाजूस असते. म्हणजे ती पिशवीच्या तोंडाजवळ असते. अशावेळी त्या स्थितीस ‘प्लेसेंटा प्रिव्हिया’ असे म्हणतात.
प्लेसेंटा प्रिव्हियामुळे गरोदरपणात ‘वार’ ही पिशवीपासून सुटण्याची शक्यता असते. वार सुटून पिशवीपासून अलग झाल्यास जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. या स्थितीमुळे आई आणि बाळाच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. काहीवेळा ही ‘वार’ पूर्णपणे पिशवीचे तोंड झाकून टाकते. ही अवस्था जास्त धोकादायक असते.
प्लेसेंटा खालील भागात असल्यास काय होते..?
प्लेसेंटा गर्भाशयाच्या खालील भागात असल्यास प्रसूतीच्या वेळेस योनीतून बाळ बाहेर येण्याचा मार्ग अडवला जातो. अशावेळी सिझेरियन डिलिव्हरी करावी लागते. तसेच प्लेसेंटा प्रॅव्हियामुळे गर्भधारणेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या त्रैमासिकामध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो.
प्लेसेंटा कोणत्या ठिकाणी आहे ते कधी कळते..?
प्लेसेंटा कोणत्या ठिकाणी आहे याचे निदान सोनोग्राफीमार्फत केले जाते. तिसऱ्या महिन्यांतील सोनोग्राफीत साधारण याचा अंदाज येतो. पाचव्या महिन्यांतील सोनोग्राफीत प्लेसेंटा कोणत्या भागात आहे, प्लसेंटा प्रिव्हियाची स्थिती आहे का याचे स्पष्ट निदान होते. आणि सोनोग्राफीत ‘प्लसेंटा प्रिव्हिया’ असल्याचे स्पष्ट झाल्यास तेव्हापासूनच योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
‘प्लेसेंटा प्रिव्हिया’मुळे गरोदरपणात वरचेवर रक्तस्त्राव होतो. होणारा रक्तस्राव जर थोडासा असेल तर ठीक; परंतु त्याचे प्रमाण जास्त असेल तर तातडीने वैद्यकीय उपचार करावे लागतात. यासाठी ‘Placenta previa’ असल्यास गरोदरपणात रक्तस्राव झाल्यास तात्काळ हॉस्पिटलमध्ये जावे.
प्लेसेंटा प्रिव्हियामध्ये अशी घ्यावी काळजी :
गरोदरपणात प्लेसेंटा प्रिव्हियाची स्थिती असणाऱ्या गरोदर स्त्रियांनी रक्तातील हिमोग्लोबीन कायम बारा ग्रॅमच्या पुढे राहील याची काळजी घेणे गरजेचे असते. शरीरात फॉलिक अॅसिडची कमतरता राहणार नाही याची काळजी घ्यावी.
- डॉक्टरांनी दिलेल्या लोह आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या वेळेवर घ्याव्यात.
- आहारात मांस, मासे, अंडी, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये यांचा प्राधान्याने समावेश असावा.
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
- पूर्णपणे विश्रांती द्यावी.
- अशावेळी प्रवास पूर्णपणे टाळला पाहिजे.
Placenta previa असल्यास डिलिव्हरीच्यावेळी रक्तस्राव जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाची वाढ झाल्याबरोबर तातडीने सिझेरिअन डिलिव्हरी करणे गरजेचे असते.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात कोणती लक्षणे जाणवत असल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जावे ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Placenta Previa causes and treatment. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.