प्रेग्नन्सीमध्ये गर्भजल कमी होण्याची कारणे व त्यावरील उपाय जाणून घ्या..

गर्भजल म्हणजे काय आणि त्याचे कार्य काय आहे..?

प्रेग्नन्सीमध्ये गर्भाशयाच्या आत तरल पाण्याच्या पिशवीत गर्भ हा तरंगत असतो. या पाण्याला गर्भजल किंवा अ‍ॅम्निओटिक फ्लुईड असे म्हणतात. तर त्या पिशवीला गर्भजलाची पिशवी (किंवा अ‍ॅम्निओटिक सॅक) असे म्हणतात. गर्भजलाची पिशवी ही कोरियान आणि एमनियॉन आशा दोन पडद्यांची (membrane) बनलेली असते. यामुळे या गर्भजलाच्या पिशवीत आपले बाळ सुरक्षित राहत असते.

सुरवातीला हे गर्भजल आईच्या रक्ताद्वारे होत असते त्यांनतर साधारण 20 आठवड्यानंतर गर्भाच्या मूत्राद्वारे गर्भजल तयार होत असते. जेव्हा बाळाचा जन्म होणार असतो तेंव्हा ही गर्भजलाची पिशवी फुटते व त्यात असणारे पाणी हे योनीतून बाहेर येऊ लागते. याला पानमोट फुटणे असेही म्हणतात.

आईच्या पोटात गर्भाची वाढ आणि विकास होत असताना या गर्भजल आणि गर्भजलाच्या पिशवीचे पुढीलप्रमाणे महत्वाचे कार्य असते.
• आईच्या पोटावर आघात, दुखापत झाल्यास गर्भजलाच्या पिशवीमुळे बाळाचे रक्षण होण्यास मदत होते.
• बाळाची फुफ्फुसे आणि पाचक प्रणाली क्रियाशील होण्यासाठी तसेच मांसपेशी आणि हाडे विकसित होण्यासाठी गर्भजलामुळे मदत होते.
• गर्भजलाच्या पिशवीमुळे बाळाला विविध प्रकारच्या इन्फेक्शनपासून (संसर्गापासून) रक्षण होते.
• गर्भाचे तापमान योग्य ठेवण्यास मदत होते.

गर्भजलाचे प्रमाण किती असते..?

गर्भाशयातील बाळ हे थोडेथोडे गर्भजल पीत असते तसेच बाळ लघवीवाटे पुन्हा बाहेर सोडत असतो. त्यामुळे गर्भजलाची पातळी कमी जास्त होत असते. गरोदरपणाचा काळ जसजसा वाढत जातो तसे गर्भजलाचे प्रमाणही वाढत असते. 36 व्या आठवड्यात गर्भजलाचे साधारण प्रमाण 800 ते 1000 ml इतके असू शकते. मात्र त्यानंतर प्रसूतीचा काळ जसा जवळ येईल तसे हे प्रमाण कमीकमी होत जाते.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

गर्भजल कमी किंवा अधिक वाढणे :

गर्भजल कमी होण्याची स्थिती अनेक गरोदर स्त्रियामध्ये होते. गर्भजलाचे प्रमाण कमी झाल्यास त्या स्थितीला Oligohydramnios असे म्हणतात. तर गर्भजलाचे प्रमाण अधिक वाढल्यास त्या स्थितीला Polyhydramnios असे म्हणतात. गर्भजल प्रमाणापेक्षा जास्त असणे तसेच प्रमाणापेक्षा कमी असणे दोन्ही स्थितीमध्ये काळजीचे कारण असते. सोनोग्राफी तपासणीतून गर्भजलाचे प्रमाण कमी आहे की जास्त आहे ते कळत असते.

गर्भजलाचे प्रमाण कमी होण्याची कारणे :

• गर्भजलाची पिशवी फुटण्यामुळे,
• वार (placenta) मधील दोषांमुळे बाळास योग्यरीत्या पोषण मिळत नाही अशावेळी गर्भजल कमी होऊ शकते. विशेषतः जर हाय ब्लडप्रेशर, प्री-एक्लेमप्सिया, मधुमेह असे त्रास आईला असल्यास placenta मध्ये दोष निर्माण होऊ शकतात.
• प्रसूतीची नियोजित तारीख होऊन गेल्यामुळे,
• काही विशिष्ट औषधांच्या परिणामामुळे,
• बाळ योग्य मात्रेत लघवी करत नसल्याने गर्भजल कमी होऊ शकते. विशेषतः जर बाळास मूत्रप्रणाली संबंधित काही समस्या असल्यास अशी स्थिती होऊ शकते.
वरील कारणामुळे गर्भजलाचे प्रमाण कमी होऊ शकते.
गर्भजलाचे प्रमाण कमी झाल्यास बाळावर होणारे

गर्भजल कमी झाल्यास होणारे परिणाम :

गर्भजल किती प्रमाणात कमी झाला आहे, कशामुळे कमी झाला आहे आणि प्रेग्नन्सीचा कोणता महिना चालू आहे यानुसार त्या कमी झालेल्या गर्भजलाचा परिणाम बाळावर होणार की नाही ते ठरत असते. सामान्यता गर्भजल कमी झाल्यास, त्याचा विपरीत परिणाम बाळाच्या विकासावर होत असतो.

पहिल्या आणि दुसऱ्या त्रैमासिकमध्ये गर्भजल अधिक प्रमाणात कमी झाल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते. मात्र अधिकांश स्त्रियांमध्ये तिसऱ्या त्रैमासिकमध्ये गर्भजलाचे प्रमाण कमी होत असते. याचे प्रमुख कारण म्हणजे अकाली गर्भजलाची पिशवी फाटणे हे असते. अशावेळी नियोजित वेळेपूर्वीचं प्रसुती करावी लागू शकते. अशावेळी सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी करावी लागते.

गर्भजलाचे प्रमाण कमी असल्यास हे करा उपाय :

• आपल्या डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्यावी.
• दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. साधारण 8 ग्लास पाणी वरचेवर थोडेथोडे प्यावे.
• शहाळ्याचे पाणी पिऊ शकता.
• पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या.
• पुरेशी विश्रांती घ्या.

गर्भजलाचे प्रमाण वाढण्याची कारणे :

अनेक कारणांनी गर्भजल वाढू शकते. जसे जुळी किंवा तिळी बाळे असल्यास, गरोदरपणात आईला मधुमेह असल्यास गर्भजलाचे प्रमाण अधिक वाढते. गर्भजलाचे प्रमाण जास्त वाढल्यास काहीवेळा यामुळे गर्भजलाची पिशवी फुटते व त्यामुळे पाणी जाऊ लागते. हे बाळासाठी धोक्याचे असते अशावेळीही अकाली प्रसूती करावी लागू शकते.

त्यामुळे गर्भजलाचे प्रमाण कमी होणे किंवा अधिक वाढणे ह्या दोन्हीही स्थिती धोकादायक ठरू असू शकतात.
© लेखक- डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.