लठ्ठपणा (Obesity) :

बैठे काम, व्यायाम व शारीरिक श्रमाचा अभाव आणि चुकीच्या आहारामुळे आजकाल अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. प्रामुख्याने शरीरातील चरबीची जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.

स्थूलता किंवा ओबेसिटी ही अशी समस्या आहे की, ज्यामुळे पुढे अनेक धोकादायक आजार होऊ शकतात. त्यामुळेच लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक, पॅरालिसिस, डायबिटीस, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, स्त्रियांमधील पीसीओडी समस्या यासारखे आजार होण्याचा जास्त संभावना असते.

लठ्ठपणा आणि बीएमआय :

लठ्ठपणाचे प्रमाण BMI (Body Mass Index) द्वारे मोजले जाते. बीएमआय नुसार उंची आणि वजनाचे प्रमाण तपासले जाते. 18 वर्षांवरील व्यक्तींच्या वजन आणि उंचीच्या प्रमाणातून बीएमआय काढले जाते. यामधून उंचीच्या तुलनेत शरीराचे अपेक्षित वजन कमी किंवा जास्त आहे का? हे ओळखता येऊ शकते. बॉडी मास इंडेक्स जर 30 पेक्षा जास्त असेल तर ते लठ्ठपणाचे लक्षणे समजले जाते.

बीएमआय आणि वजन स्थिती :
• BMI 18.5 पेक्षा कमी असल्यास अंडरवेट म्हणजे नॉर्मलपेक्षा कमी वजन असते.
• ‎BMI 18.5 ते 25 पर्यंत असल्यास त्याला नॉर्मल वजन मानले जाते.
• जेंव्हा BMI हा 25.0 ते 29.9 पर्यंत असतो तेंव्हा त्याला नॉर्मलपेक्षा वजन जास्त आहे असे मानले जाते.
• ‎30.0 ते 39.9 पर्यंत BMI असल्यास त्याला लठ्ठपणा असे मानले जाते.
• ‎तर 40 पेक्षा अधिक BMI दर्शवत असल्यास त्याला अतिलठ्ठपणा असे मानले जाते.

बीएमआयची अचूकचा किती..?
बीएमआय हा 100% अचूक असेलच असे नाही कारण बीएमआय काढताना केवळ उंची आणि वजनाचा विचार केला जातो. मात्र यामध्ये बॉडी फ़ॅट किंवा मसल्सचा विचार केला जात नाही. शरीरात मसल्स (स्नायू), हाडे आणि बॉडी फ़ॅट (चरबी) यांमुळे वजन वाढते. उदाहरणार्थ खेळाडूंमध्ये मसल्स आणि हाडांचे वजन हे जास्त असते तर बॉडी फ़ॅटचे प्रमाण कमी असते. असे असूनही त्यांचा जेंव्हा BMI काढला जातो तेंव्हा तो ओव्हरवेट येत असतो..! तेंव्हा बीएमआय हा 100% अचूक असेलच असे नाही. लठ्ठपणाची साधी सोपी व्याख्या म्हणजे शरीरात बॉडी फ़ॅट किंवा चरबीचे प्रमाण जास्त असणे ही आहे.

पोटाचा घेर आणि लठ्ठपणा :

पोटाजवळील चरबी जास्त प्रमाणात वाढल्यास हृद्यविकार, उच्च रक्तदाब, पक्षाघात, टाईप 2 मधुमेह हे विकार होण्याचा धोका अधिक वाढतो. यासाठी पुरुषांचा पोटाचा घेर हा 90 सेमी पेक्षा जास्त असू नये तर स्त्रियांचा पोटाचा घेर हा 80 सेमी पेक्षा जास्त असू नये.

लठ्ठपणाची कारणे (Obesity causes) :

शरीरात स्थुलता निर्माण होण्यास, वजन अतिप्रमाणात वाढण्यास अनेक करणे जबाबदार असतात.
• गरजेपेक्षा जास्त आहार घेण्याची सवय, सतत काहीतरी खात राहण्याची सवयीमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.
• ‎जास्त कॅलरी असणारे पदार्थ, साखरेचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, चॉकलेट्स, तळलेले पदार्थ, हवाबंद पदार्थांच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.
• ‎दिवसा झोपणे, शारीरीक श्रमाचा अभाव, बैठी आरामदायी जीवनशैली यांमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.
• ‎व्यायाम न करणे यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. व्यायामाच्या अभावाने आहारातून घेतलेल्या कॅलरीज वापरल्या जात नाहीत त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज चरबीच्या रुपात वाढू लागतात.
• ‎वजन वाढीस अनुवंशिकता हा घटक कारणीभूत ठरू शकतो. आई-वडील जाड असल्यास अनुवंशिकतेमुळे मुलांमध्येसुद्धा लठ्ठपणा आढळतो.
• ‎शरीरामधील चयापचय संबंधी विकृतीमुळे किंवा हायपो-थायरॉइडिझम सारख्या आजारामुळेही वजन वाढू शकते.

लठ्ठपणाची लक्षणे (Obesity signs) :

• पोट, नितंब, स्तन, मांड्या या ठिकाणी चरबी वाढणे.
• ‎पोटाचा घेर अधिक असणे.
• ‎बीएमआय 40 पेक्षा जास्त असणे.
• ‎थोडे काम केले असता थखवा जाणवणे.
• दम लागणे.
• ‎अनुत्साह, आळस येणे, झोप, सुस्ति अधिक येणे.
• ‎स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित न येणे यासारखी लक्षणे स्थुलतेमध्ये सामान्यतः असतात.

लठ्ठपणामुळे होणारे दुष्परिणाम (Obesity complications) :

चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेल्या चरबीमुळे पुढे अनेक गंभीर आजार निर्माण होतात. यामध्ये,
• लठ्ठपणामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो,
• धमनीकाठिन्यता व हृद्यविकार होण्याचा धोका वाढतो, .
• ‎हाय ब्लडप्रेशरची समस्या होते,
• ‎पक्षाघात किंवा लकवा याचा धोका असतो,
• ‎टाइप-2 डायबेटीस होतो,
• ‎विविध कॅन्सर होऊ शकतात,
• ‎पित्ताशयातील खडे होण्याची तक्रार सुरू होते,
• ‎संधिवात, गुडघेदुखी, पाठदुखीचे दुखणे सुरू होते,
• ‎स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी, अनियमित पाळी, वंध्यत्व, पीसीओडी समस्या लठ्ठपणामुळे होऊ शकतात. त्यामुळे वजन आटोक्यात असणे अत्यंत गरजेचे असते.

लठ्ठपणा असणे कोणासाठी जास्त धोकादायक असते..?
• वयाच्या चाळिशीनंतर लठ्ठपणा असणे धोकादायक असते.
• ‎लठ्ठ व्यक्तींना सिगारेटचे व्यसन असणे धोकादायक असते.
• ‎लठ्ठ व्यक्तीच्या अनुवंशिकतेमध्ये हृद्यविकार असणे धोकादायक असते,
• ‎लठ्ठ व्यक्तिस हृद्यरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, धमनीकाठिन्यता असणे धोकादायक असते.
• ‎लठ्ठ व्यक्तींमध्ये LDL कोलेस्टेरॉलचे (बॅड कोलेस्टेरॉल) प्रमाण अधिक असणे धोकादायक असते.
• ‎हार्ट अटॅक आलेला असल्यास किंवा बायपास झालेली असल्यास लठ्ठपणा असणे धोकादायक असते.

लठ्ठपणा कमी करण्याचे हे आहेत उपाय :

योग्य आहार, नियमित व्यायाम आणि दृढ इच्छाशक्ती याद्वारे वजन आटोक्यात आणणे शक्य आहे.

लठ्ठपणा दूर करण्यासाठी असा करावा व्यायाम –

नियमित व्यायाम करण्यामुळे लठ्ठपणा दूर होण्यास मदत होते. व्यायामाने शरीरातील चरबी कमी होते, मांसपेशी मजबूत होतात. तसेच शरीरातील रक्त संचरण व्यवस्थित होते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास, आजपासूनच व्यायामाला सुरुवात करा. 

यासाठी आपण चालण्याचा व्यायाम, एरोबिक व्यायाम, सायकलिंग, पायऱ्या चढणे-उतरणे, योगासने करू शकता. लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम करावा.

अर्ध्या तासाचा व्यायाम आणि बर्न होणारी कॅलरी :
• अर्धा तास चालणे – 200 कॅलरी
• ‎अर्धा तास सायकलिंग – 330 कॅलरी
• ‎एरोबिक व्यायाम – 260 कॅलरी
• ‎मैदानी खेळ – 250 कॅलरी
• ‎पोहण्याचा व्यायाम – 280 कॅलरी

साधारण 3500 कॅलरीज म्हणजे एक पाऊंड. एका आठवड्यात एक पाऊंड वजन कमी करायचं असेल तर दिवसाला 500 कॅलरीज कमी होतील इतका व्यायाम करणे गरजेचे असेल. वजन कमी करण्यासाठी दररोज 45 मिनिटे चालण्याचा व्यायाम किंवा एरोबिक व्यायाम करावा तसेच 20 मिनिटे सायकलिंगचा व्यायाम करावा.

स्थूलता कमी करण्यासाठी असा असावा आहार :

चुकीच्या आहारामुळे वजन अतिप्रमाणात वाढत असते. त्यामुळे वजन आटोक्यात ठेवायचे असल्यास योग्य आहार घेणे आवश्यक असते.

लठ्ठपणा असल्यास काय खावे..?
वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे हा काही उपाय नाही. कारण आपण जो आहार घेत असतो त्यातूनच शरीराला ऊर्जा मिळत असते. त्यामुळेचं शरीरक्रिया व्यवस्थित चालत असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याचा विचार करत असाल तर, तो अत्यंत चुकीचा पर्याय आहे. यामुळे शरीराला फायदा होण्यापेक्षा नुकसानच होऊ शकते.

वजन कमी करायचे असल्यास योग्य आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, विविध फळे, सुखामेवा, मोड आलेली कडधान्ये, विविध धान्ये, दूध, मांस, मासे, अंडी यांचा समावेश करावा. कारण या पदार्थांतून आवश्यक अशी पोषकतत्वे म्हणजे फायबर्स, खनिजे, व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स मिळते.

लठ्ठपणा कमी करायचे असल्यास काय खाऊ नये..?
चरबी वाढवणारे पदार्थ, मांसाहारी पदार्थातील चरबी, अंड्यातील पिवळा भाग, साखर आणि गोड पदार्थ, तेलकट पदार्थ, तुपाचे पदार्थ, साय, लोणी, मिठाई, बेकरी पदार्थ, मैद्याचे पदार्थ, केक, आईस्क्रीम, चॉकलेट्स, स्नॅक्स, चिप्स, चहा, कॉफी, शीतपेये, जंकफूड, फास्टफूड इ. पदार्थ खाणे टाळावे.

Read Marathi language article about Obesity Causes, Signs and Treatment. Last Medically Reviewed on February 19, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.