गर्भधारणेचा नववा महिना – Pregnancy 9th Month :

गरोदरपणाचा शेवटचा महिना..! गरोदरपणाच्या या शेवटच्या महिन्यात आपल्याला अधिक काळजी घेणे आवश्यक असते. नववा महिना हा 36 व्या आठवड्यापासून ते 40 व्या आठवड्यापर्यंत असतो.

नवव्या महिन्यात अनेक स्त्रियांना प्रसूतीची भीती वाटू लागते. अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत असतात. अशावेळी कोणतीही भीती वाटून घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित होईल. आनंदाने आपल्या बाळाच्या स्वागताची तयारी सुरू करावी.

नऊ महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे :

नवव्या महिन्यात गर्भाचे वजन चांगलेच वाढलेले असल्याने, गर्भिणीचेही वजन वाढते. त्यामुळे गर्भिणी स्त्रीला चालण्यामधे अवघडपणा जाणवतो. पोटातील बाळाच्या वजनाच्या भाराने शिरांवर दाब येऊन गर्भिणीच्या पायांवर सूज येते, पाय दुखतात. क्वचितप्रसंगी पायांच्या पेटऱ्यांमधे गोळे येतात.

स्तनांमधून पिवळसर स्त्राव (कोलोस्ट्रम) येऊ लागतो. योनिमार्गातून हलका रक्तयुक्त स्त्राव येऊ शकतो. ब्रेक्सटन हिक्स वेदना नवव्या महिन्यातही जाणवू लागतात. प्रसूतीच्या काही आठवड्यांपूर्वी बाळ खाली सरकत असते. अशावेळी त्याचा दाब आतड्यांवर व मूत्राशयावर पडतो. त्यामुळे मलावरोध किंवा पातळ शौचास होणे, सतत लघवीची संवेदना होणे अशी लक्षणे निर्माण होतात.

या महिन्यात शेवटच्या दिवसात कंबरेत व पोटात बारीक बारीक कळा येतात. या कळांबरोबरच पोटाचे स्नायु कडक होतात. यालाच बाळंतिणीच्या कळा – प्रसववेदना, असे म्हणतात. याच कळांमधे जेव्हा तीव्रता वाढते तेव्हा प्रसवकाल अगदी जवळ आला असे समजले जाते.

गरोदरपणातील नवव्या महिन्यात होणारी बाळाची वाढ आणि आकार :

गर्भधारणेच्या नवव्या महिन्यात पोटातील बाळ पूर्ण विकसित झालेले असते. नवव्या महिन्याच्या शेवटी बाळाचे वजन सुमारे 2.5 किलो असू शकते आणि त्याची लांबी 19 इंच असू शकते. गर्भाच्या सभोवतालचे पाणी (गर्भजल) थोडे कमी होते. गर्भाचे डोके खालच्या बाजूला होते व हळूहळू स्त्रीच्या pelvic भागात सरकत असते.

गरोदरपणाचा नववा महिना आणि आहार :

गरोदरपणाचा हा शेवटचा महिना खूपच नाजूक असतो, म्हणून गर्भवतीची विशेष काळजी घेणे यावेळी आवश्यक असते. यासाठी नवव्या महिन्यात गर्भवतींनी काय खावे आणि काय खाऊ नये, कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती खाली दिली आहे.

गरोदरपणात नवव्या महिन्यातील आहार असा असावा –
नवव्या महिन्यात बाळाची वाढ वेगाने झालेली असते. अशावेळी प्रोटिन्स, लोह, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम अशी पोषकतत्वे असणाऱ्या आहाराची त्याला गरज असते. यासाठी आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, हंगामी फळे, धान्य, कडधान्ये, सुखामेवा, मांस, मासे, अंडी यांचा समावेश करावा.

एकाचवेळी भरपेट न जेवता, दिवसातून तीन ते चार वेळा थोडाथोडा आहार घ्यावा. यामुळे सहजरीत्या अन्नाचे पोषण होते व अपचन व गॅसेसचा त्रास होत नाही. या महिन्यातही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यासाठी आहारात फायबर्सयुक्त पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्य, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश असणे आवश्यक असते. तसेच दिवसभरात 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाणीही वरचेवर थोडेथोडे पीत राहावे.

गर्भावस्थेतील नवव्या महिन्यात काय खाणे टाळावे..?
बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. तसेच वारंवार तेलकट, मसालेदार, खारट पदार्थ, जंकफूड, मैद्याचे पदार्थ, गोड मिठाईचे पदार्थ खाणे टाळावे. या महिन्यामधे पचनास जड असणारे पदार्थ खाणे टाळावेत. विशेषतः हरभरा, छोले, राजमा, वांगी, बटाटा, बेसनाचे पदार्थ, वाल असे पदार्थ पूर्णत: टाळावेत. सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे, चहा कॉफी वारंवार पिऊ नयेत. तसेच व्यसनांपासून दूर राहावे.

प्रेग्नन्सीचा नववा महिना आणि व्यायाम :

गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात असा करावा व्यायाम.
गरोदरपणात नवव्या महिन्यात घरातल्या घरात हळूहळू चालण्याचा व्यायाम करावा. पोटावर दाब आणणारा कोणताही व्यायाम, योगासने या महिन्यात करू नये.

गर्भधारणेचा 9वा महिना आणि वैद्यकीय तपासण्या :

नवव्या महिन्यात गरोदर स्त्रीने ह्या तपासण्या करून घ्याव्यात.
डिलिव्हरीच्यादृष्टीने, पुन्हा एकदा हिमोग्लोबीन तपासणे गरजेचे असते. जर हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असेल तर प्रसवाच्या वेळी बाहेरून रक्त देण्याची गरज भासू शकते. त्यादृष्टीने डिलिव्हरीच्यावेळी, ब्लडबँकेत रक्ताची सोय करून ठेवावी लागते. काहीवेळेस, NST व सोनोग्राफी या तपासण्या करावयाची गरज पडू शकते.

प्रेग्नन्सीमध्ये नवव्या महिन्यात अशी घ्यावी काळजी :

  • जड वस्तू उचलणे किंवा ढकलणे टाळावे,
  • काष्टाची कामे करणे टाळावे,
  • सुती व सैलसर कपडे वापरा,
  • थकवा जाणवल्यास पुरेशी विश्रांती घ्यावी,
  • दुपारी अर्धा ते एक तास विश्रांती घ्यावी.
  • डाव्या कुशीवर झोपावे,
  • प्रवास टाळावा,
  • मानसिक ताण आणि दगदग टाळा,
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका,
  • डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
  • प्रसवासाठी मानसिक तयारी करावी, जेणेकरून प्रसव कसाही झाला असल्यास फारसा त्रास जाणवत नाही.

हे सुद्धा वाचा..
डिलिव्हरीची तयारी कशी सुरू करावी ते जाणून घ्या.

Read Marathi language article about Nineth Month Pregnancy Symptoms, Diet plan & Care tips. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.