काळजी गर्भाशयातील बाळाची :

गरोदरपणात गर्भाचे पोषण हे आईच्या माध्यमातूनचं होत असते. त्यामुळे गर्भाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आईने काळजी घेणे आवश्यक असते. प्रेग्नन्सीमध्ये जर आईने योग्य ती काळजी घेतल्यास पोटातील बाळाचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते. याठिकाणी गर्भावस्थेत पोटातील गर्भाची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिली आहे.

गरोदरपणात पोटातील गर्भाची अशी घ्यावी काळजी :

योग्य आहार घ्या..
गरोदरपणात आहाराचे खूप महत्त्व असते. कारण आई जो आहार घेईल त्यातूनच पोटातील गर्भाचे पोषण होत असते. त्यामुळे पोटातील बाळाची योग्यरीत्या वाढ होण्यासाठी प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, आयर्न, कॅल्शियम अशी पोषकतत्वे असणारा आहार घ्यावा. यासाठी गर्भवतीच्या आहारात दुध व दुग्धजन्य पदार्थ, विविध फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, डाळी, धान्ये, सुखामेवा तसेच मांस, मासे, अंडी यांचा जरूर समावेश असावा. यामुळे गर्भाची वाढ योग्यप्रकारे होण्यास मदत होते. आहार वेळच्यावेळी घ्यावा. उपवासी राहणे टाळावे. गर्भावस्थेत आहार कसा असावा ते जाणून घ्या..

पुरेसे पाणी प्यावे..
गरोदरपणात दिवसभरात वरचेवर थोडेथोडे पाणी पीत राहावे. यामुळे डिहायड्रेशन होत नाही. कुठेही बाहेर जाताना उकळलेल्या पाण्याची बाटली सोबत असावी. बाहेरचे दुषित पाणी पिणे टाळावे. यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

कामे करताना पुरेशी काळजी घ्या..
गरोदरपणात कामे किंवा व्यायाम करताना गर्भातील बाळाला धोका निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. यासाठी जास्त कष्टाची व थकवा आणणारी कामे करू नयेत. जड वस्तू उचलणे टाळावे. सहज करता येणारी घरातील कामे करावीत. तसेच चालताना, उठताना तोल जाऊन पडणार नाही याची काळजी घ्यावी.

व्यायाम करताना काळजी घ्या..
गरोदरपणात डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय व्यायाम सुरू करू नका. गर्भावस्थेत हलका व्यायाम करावा. थोडावेळ सकाळी किंवा संध्याकाळी फिरण्यास जावे. यामुळे रक्तसंचारण व्यवस्थित होऊन आई आणि गर्भ दोघांचेही आरोग्य सुधारते. तसेच दीर्घ श्वसन जरूर करावं, त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते व गर्भाशयातील बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो.

प्रवास करताना काळजी घ्या..
प्रेग्नन्सीमध्ये पोटात गर्भ वाढत असल्याने प्रवास करताना थोडी जास्त काळजी घेणे आवश्यक असते. प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो लांबचा प्रवास करू नये. विशेषतः पहिल्या तीन महिन्यात जास्त काळजी घ्यावी. कारण या काळात गर्भ हा अस्थिर असतो त्यामुळे जास्त प्रवासामुळे गर्भपात होण्याचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे शेवटच्या तीन महिन्यातही जास्त प्रवास करणे टाळावे. कारण या काळात मुदतपूर्व प्रसुती किंवा pre-mature डिलिव्हरीचा धोका असतो. त्यामुळे नववा महिना लागल्यानंतर प्रवास टाळावा. गरोदर काळात दुचाकीवरून प्रवास करू नये. कारमधून प्रवास करताना सीटबेल्टचा जरुर वापर करा. खड्डे असणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना जास्त काळजी घेणे आवश्यक असते. गर्भावस्थेत प्रवास कसा करावा ते जाणून घ्या..

पुरेशी विश्रांती घ्या..
आईच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाच्या वाढीसाठी प्रेग्नन्सीत पुरेशी झोप व विश्रांती घेणे आवश्यक असते. यासाठी रात्रीच्या वेळी पुरेशी म्हणजे किमान आठ तास झोप घ्यावी व दुपरीही काहीवेळ थोडी झोप घ्यावी.

स्वच्छतेची काळजी घ्या..
गर्भवतीने स्वच्छतेची काळजी न घेतल्यास गर्भाला इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. यासाठी अंघोळ करताना योनी भागाची स्वच्छता करावी. शौचानंतर गुदाच्या ठिकाणी धुताना समीरच्या बाजूने मागे धुवावे. यामुळे गुद भागातील इन्फेक्शन योनीमार्गात जाणे टळते. सार्वजनिक शौचाललयाचा वापर करताना पुरेशी काळजी घ्यावी. जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. बाहेरचे उघड्यावरील दूषित पदार्थ खाणे टाळावे. दूषित पाणी पिणे टाळावे.

नियमित तपासणी करून घ्या..
गरोदरपणी डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेतल्याने गर्भाची वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही ते समजते. यासाठी तिसरा महिना सुरु होण्यापूर्वी दवाखान्यात जाऊन पहिली तपासणी करून घ्यावी. त्यानंतरच्या चौथ्या ते आठव्या महिन्यापर्यंत दर महिन्यातून एकदा तपासणीसाठी जावे. आणि शेवटच्या महिन्यात दर पंधरा दिवसाला तपासणी करून घ्यावी. तसेच गरोदरपणात काही त्रास जाणवल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं औषधे घ्या..
अनेक औषधे अशी आहेत की त्यांचा अत्यंत घातक असा परिणाम गर्भावर होत असतो. यासाठी गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध परस्पर घेऊ नये. तसेच गरोदर होण्यापूर्वी एखादा आजार किंवा आरोग्य समस्या असल्यास व त्यावरील औषध सुरू असल्यास त्याबाबतही सांगावे. कारण औषधांचा साईड-ईफेक्ट पोटातील गर्भावर होण्याची अधिक शक्यता असते. गरोदरपणात अॅलर्जी असणारी व एक्सपायरी तारीख निघून गेलेली (एक्सपायर झालेली) औषधे चुकूनही घेऊ नयेत.

व्यसनांपासून लांब राहा..
प्रेग्नन्सीमध्ये व्यसनांचा अत्यंत घातक परिणाम गर्भावर होत असतो. वेळेपूर्वी बाळाचा जन्म होणे किंवा बाळ दगावण्याची शक्यताही व्यसनांमुळे वाढते. यासाठी प्रेग्नन्सीमध्ये सिगारेट, धूम्रपान, तंबाखू, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर रहावे. तसेच इतर व्यक्ती सिगारेट स्मोकिंग करीत असताना त्या धुराच्या संपर्कात राहू नये.

गर्भावस्थेत अशी काही लक्षणे दिसत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे :

गरोदरपणात खालिल लक्षणे व्यक्त झाल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
• पोटातील बाळाची हालचाल कमी झाल्यासारखी वाटणे,
• ‎गरोदरपणात योनीतून अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होणे,
• ‎अशक्तपणा जाणवणे,
• ‎रक्तपांढरी (अॅनेमिया) होणे,
• ‎ताप येणे, अतिसार होणे, ओटीपोटात दुखणे,
• लघवी करताना जळजळ होणे, दुर्गंधी येणे,
• ‎पायावर सूज येणे, रक्तदाब वाढल्यामुळे अशी सूज येऊ शकते. त्यावर उपचार न केल्यास बाळ व आईच्या जीवाला धोका पोहचू शकतो.

यासारखी लक्षणे जाणवत असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा त्यामुळे आई आणि गर्भाशयातील बाळाचे आरोग्य सुरक्षीत राहण्यास मदत होते. अशाप्रकारे गर्भावस्थेत काळजी घेतल्यास गर्भाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...