नाकातून रक्त येणे (Nosebleed) :
नाकातून रक्त येण्याचा त्रास अनेकांना असतो. या त्रासाला घोळणा फुटणे असेही म्हणतात. अनेक कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील त्वचा कोरडी झाल्यामुळेही (ड्राय झाल्यामुळे) नाकातून रक्त येऊ शकते.
नाकातून रक्त का व कशामुळे येते..?
आपल्या नाकात नाजूक पातळ त्वचेखाली अनेक रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे त्याठिकाणी नख लागल्याने, जखम झाल्याने किंवा सर्दीमुळे नाकात सूज आल्यामुळे रक्त येऊ शकते. तसेच उन्हाळ्यात नाकातील त्वचा ड्राय झाल्याने, सर्दीसाठी घेतलेल्या औषधांमुळे आणि हाय ब्लडप्रेशरचा त्रास असल्यासही नाकातील त्वचा कोरडी होऊन रक्त येऊ शकते.
नाकातून रक्त येण्याची कारणे :
• नाकात जखम झाल्यामुळे,
• सायनसचा त्रास असल्यामुळे,
• एलर्जीमुळे,
• हाय ब्लडप्रेशरचा त्रास असल्यामुळे,
• ऍस्पिरिन सारख्या औषधांमुळे रक्त पातळ होऊन नाकातून रक्त येऊ शकते,
• उन्हाळ्यात हवेतील उष्णतेमुळे नाकातील त्वचा ड्राय होऊन घोळणा फुटण्याचा, नाकातून रक्त येण्याचा त्रास जास्त होत असतो.
• सतत एसीचा वापर केल्याने हवा कोरडी होऊन त्यामुळेही हा त्रास होतो.
तसेच काही वेळा नाकातून रक्तस्त्राव होणे हे कॅन्सरचेही लक्षण असू शकते.
घोळणा फुटणे यावर हे करा घरगुती उपाय :
• नाकातून रक्त आल्यावर जास्त हालचाल न करता एकाजागी शांतपणे बसावे.
• नाकातील रक्त घशात जाऊ नये यासाठी समोरच्या बाजूस थोडे वाकावे आणि नाक ओल्या कापडाने दाबून धरावे व तोंडाने श्वास घ्यावा.
• एकाच नाकपुडीतुन रक्त येत असल्यास ती नाकपुडी दाबून ठेवावी.
• नाकाला थंडगार पाणी किंवा बर्फ लावल्यानेही रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तस्राव थांबायला मदत होते.
• अशाप्रकारे नाक दाबून धरल्यास 5 ते 10 मिनिटांत रक्त येणे थांबते. मात्र त्यानंतरही रक्त येणे थांबत नसल्यास आपल्या डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपचार घ्यावेत.
Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 13, 2024.