मूळव्याधची समस्या :
तिखट व मसालेदार पदार्थ अधिक प्रमाणात खाणे, मांसाहार, बेकरी प्रोडक्ट, बैठी जीवनशैली, सततचा प्रवास ह्यासारख्या कारणांमुळे मुळव्याधचा त्रास सुरू होतो. मूळव्याधमध्ये शौचाच्या ठिकाणी सूज येते तसेच त्याठिकाणी भयंकर वेदना होणे, आग होणे, खाज येणे, शौचाच्या वेळेस रक्त पडणे अशी लक्षणे जाणवतात.
मूळव्याधीच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते.
मूळव्याधसाठी हे करा घरगुती उपाय :
लिंबू आणि सैंधव मीठ –
सकाळ व सायंकाळी जेवणापूर्वी सैंधव मीठ लावून लिंबू चोखून खाणे मूळव्याधसाठी चांगला उपाय आहे. याशिवाय ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात चिमूटभर सैंधव मीठ टाकून ते मिश्रण सकाळी उटल्यावर उपाशीपोटी प्यावे. 15 दिवस हा मूळव्याधसाठी घरगुती उपाय केल्यास त्रास लवकर कमी होण्यास मदत होईल.
जिरेपूड –
जिरे भाजून त्याची बारीक पूड करावी. एक चमचा बारीक केलेली जिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. सकाळी हे मिश्रण पिल्यानंतर कमीत कमी एक तास तरी काही खाऊ नये.
कच्चा मुळा –
कच्चा मुळा खाणे हा मूळव्याधसाठी एक उपयुक्त घरगुती उपचार आहे. यासाठी मुळ्याचा रस काढून त्यात थोडेसे सैंधव मीठ घालून ते मिश्रण दिवसातून दोन वेळेस प्यावे. तसेच किसलेला मुळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट मूळव्याध वर लावल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
सुरण कंदमुळ –
आयुर्वेदानुसार सुरण हे कंदमुळ मूळव्याधसाठी एक उत्तम असे औषध मानले आहे. सुरण वाफवून ते आहारात घ्यावे. सुरण बरोबरच ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो.
दुर्वा –
दुर्वा बारीक कुटून त्या गायीच्या एक कप दुधात उकळाव्यात. त्यानंतर मिश्रण गाळून घेऊन थोडे थंड झाल्यावर प्यावे. मूळव्याधसाठी हा उपायही लाभदायक ठरतो.
लोणी व खडीसाखर –
मूळव्याधमध्ये रक्त पडत असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर दिवसातून तीन वेळा खावी.
साजूक तूप –
मूळव्याध असल्यास व पोट साफ होत नसल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून ते पाणी प्यावे. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होईल.
ताक –
जिरेपूड घालून ताक पिण्यामुळेही मूळव्याधचा त्रास लवकर कमी होतो.
मूळव्याधसाठी गुणकारी औषध उपचार :
एरंडाची दोन पाने थोडे मीठ घातलेल्या कोमट पाण्यातून स्वच्छ धुवून ती पाने बारीक कापून मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात अर्धा कप पाणी घालून मिश्रण तयार करावे. स्वच्छ फडक्याच्या साहाय्याने मिश्रण गाळून घ्यावे. हा तयार केलेला रस सलग चार दिवस सकाळी उपाशीपोटी घ्यावा. मूळव्याधसाठी हे गुणकारी व खात्रीशीर आयुर्वेदिक औषध आहे.
Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.