प्रवासात उलटी होणे (Motion sickness) :
आपल्यापैकी अनेकांना प्रवासादरम्यान मळमळ किंवा उलट्या होण्याची समस्या होते. लहान मुले आणि गरोदर स्त्रियांना हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. या त्रासामुळे अनेकजण प्रवास करणेही टाळतात. या त्रासाला मोशन सिकनेस, गाडी लागणे अशा नावानेही ओळखले जाते.
गाडी लागणे यावर हे करा घरगुती उपाय :
आले (अद्रक) –
प्रवासात मळमळ होत असल्यास आल्याचा तुकडा चघळत राहावा. आले अँटी-एमेटिक गुणांचे असल्याने प्रवासात आले खात राहिल्याने ओकारी आणि मळमळीपासून आराम मिळतो. त्यामुळे प्रवासाला जाताना आल्याचा तुकडा बरोबर घेऊन जावे.
लिंबू –
लिंबू हे उलट्या आणि मळमळीवर खूप उपयोगी असते. लिंबवाच्या वासानेच मळमळ होणे दूर होते. यासाठी प्रवास करताना जेव्हा मळमळ होते असे वाटते तेव्हा लिंबाचा वास घ्यावा. याशिवाय एका बाटलीतून लिंबू रस, पाणी आणि सैंधव मीठ घालून लिंबूपाणीही नेऊ शकता.
लवंग –
प्रवास करताना लवंग दाढेत धरून चघळत राहिल्याने मळमळीपासून आराम मिळतो. त्यामुळे प्रवासात नेहमी लवंग सोबत ठेवावी.
वेलदोडे –
प्रवासात करताना वेलदोडे चघळत राहावे. यामुळेही मळमळ व ओकारी होत नाही.
प्रवास करताना मळमळ किंवा ओकारी येऊ नये यासाठी काय करावे?
• दूरचा प्रवास करताना हलका आहार घ्यावा.
• पाणी पुरेसे प्यावे त्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही.
• तेलकट, तिखट, मसालेदार, जड पदार्थ खाणे टाळावे.
• कार किंवा बस यांच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात त्यामुळे गाडीच्या आत स्वच्छ हवा येईल.
• प्रवास करताना शक्यतो खिडकीतून बघणे टाळावे. प्रवास करताना नजर समोर ठेवावी,
• विमान किंवा जहाजातून प्रवास करताना डोळे बंद करावे आणि शांतपणे झोप घ्यावी.
• प्रवास करताना पुस्तक वाचणे टाळावे.
• प्रवास करताना च्युइंगगम, लवंग किंवा वेलदोडे चघळत राहावे.
लहान मुलांना प्रवासात उलट्या होऊ नये यासाठी गोळी किंवा औषधे द्यावीत का..?
प्रवासामध्ये उलट्या होऊ नयेत यासाठी अनेक औषधे, गोळ्या मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत. अनेकजण सर्रास ही औषधे वापरतात. या औषधांमुळे तोंड कोरडे पडणे, गुंगी येणे, झोप, ग्लानी येऊ शकते. त्यामुळे अशाप्रकारची कोणतीही औषधे घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 13, 2024.