गरोदरपणात ग्रहण पाळावे की नाही..?
आपल्याकडील जुनाट समजुतीप्रमाणे गरोदरपणात ‘ग्रहण पाळण्याची’ चुकीची पद्धत रूढ झाली आहे. ग्रहणकाळात गरोदर स्त्रीला दिवसभर उपाशी ठेवण्यात येते. काही ठिकाणी तर 10 तास पाणीसुद्धा प्यायला देत नाहीत! तसेच तिला बराचवेळ एकाचजागी बसवून ठेवले जाते. मुळात गर्भावस्थेत ग्रहण पाळणे हिचं अत्यंत चुकीची अशी पद्धत आहे.
बराच वेळ गर्भवती स्त्री अन्न आणि पाण्याशिवाय राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम तिच्या आणि पोटातील बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो. कारण आईने घेतलेल्या आहाराचे रूपांतर आहार रस आणि रक्तात होऊन त्याद्वारेच पोटातील बाळाचे पोषण होत असते. त्यामुळे गरोदरपणात आईने वेळेवर आणि पुरेसा पोषक आहार घेणे आवश्यक असते. जर आईच उपवासी राहत असल्यास पोटातील बाळाचे पोषण होईल का?
त्यामुळे आईने गरोदरपणात ग्रहण पाळणे किंवा व्रत, उपवास धरणे साफ चुकीचे आहे.
गरोदर स्त्रीने ग्रहण न पाळल्यास काही वाईट घडते का..?
गर्भावस्थेत ग्रहण न पाळल्यास काहीही विपरीत घडत नाही. अनेक चुकीच्या समजुती समाजात रूढ झालेल्या आहेत. गरोदर स्त्रीने जर ग्रहण पाळले नाही तर बाळामध्ये व्यंग निर्माण होते, ही खूप चुकीची समजूत आहे. गर्भामध्ये दोष असणे हे पूर्णपणे वेगळ्या कारणांवर अवलंबून असते. त्याचा आणि ग्रहणाचा काडीमात्र संबंध नसतो. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्या भ्रमणादरम्यान होणाऱ्या काही गोष्टींमुळे ग्रहण होते. ती एक नैसर्गिक प्रक्रिया असते.
ग्रहणाचे कोणतेही वाईट परिणाम गरोदर स्त्रीवर होत नाहीत. मात्र जर गरोदर स्त्रीने ‘ग्रहण पाळून’ उपवासी राहिल्यास, ते पोटातील बाळासाठी व तिच्यासाठीही धोकादायक ठरू शकते. तसेच एकाजागी बराचवेळ बसल्यामुळेसुद्धा अनेक गुंतागुंती होतात. पाणी न प्यायल्यामुळे डिहायड्रेशन, अशक्तपणा, थकवा, चक्कर येऊ शकते.
त्यामुळे ग्रहणाचे वैज्ञानिक कारण समजून घ्या व चुकीच्या अंधश्रद्धा बाळगू नका. तसेच गरोदर स्त्रीला ग्रहण पाळण्याची बळजबरी करू नका.
Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.