जोखमीची गर्भावस्था (High risk Pregnancy) :

गरोदरपणात जर गरोदर स्त्रीला किंवा पोटातील गर्भाला काही धोका पोहचण्याची शक्यता असल्यास त्या स्थितीला जोखमीचे गरोदरपण किंवा high risk pregnancy असे म्हणतात. जास्त जोखीम असणाऱ्या म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये गरोदर स्त्रीला विशेष काळजीची आवश्यकता असते. अशावेळी तिच्या आहारापासून ते उठण्या-बसण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे आवश्यक असते, जेणेकरून प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांच्या दीर्घ कालावधीत आई आणि गर्भ दोन्हीही सुखरूप राहतील. 

जोखमीचे गरोदरपण कोणत्या स्त्रियांमध्ये असते..?

गरोदर स्त्रीला काही आजार असल्यास.. 
गरोदर होण्यापूर्वीचं स्त्रीला काही आरोग्य समस्या असल्यास हाय रिस्क प्रेग्नन्सीचा धोका असतो. गरोदर स्त्रीला जर मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, दमा, हृदयविकार, अपस्मार, आमवात, थायरॉईड प्रॉब्लेम, रक्ताल्पता, गर्भाशयाचे तोंड कमजोर असणे ह्यापैकी समस्या असल्यास त्या स्त्रीची गरोदरपणात जास्त काळजी घ्यावी लागते. कारण याचा परिणाम गर्भावस्थेत त्या गरोदर स्त्री बरोबरच गर्भावरही होण्याची अधिक शक्यता असते.

गर्भधारणा कमी किंवा जास्त वयात झाल्यास..
गरोदर स्त्रीच्या वयानुसारही हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे की नाही ते ठरते. विशेषतः वयाच्या 18 वर्षापेक्षा कमी वयात प्रेग्नन्सी झाल्यास ते गरोदरपण जास्त जोखमीचे असते. तसेच वयाच्या 35 नंतर होणाऱ्या प्रेग्नन्सीमध्येही जास्त जोखीम असते. अशावेळीही जास्त काळजी घ्यावी लागते.

वजन जास्त असणाऱ्या स्त्रिया..
वजन जास्त असणाऱ्या महिलांना गरोदरपणात उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्याचा परिणाम गर्भिणी आणि पोटातील गर्भावर होत असतो. त्यामुळे स्त्रियांमध्ये लठ्ठपणा असल्यास प्रेग्नन्सीमध्ये धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी जास्त काळजी घ्यावी लागते.
 
गर्भवती स्त्री मधुमेही असल्यास..
गरोदर होण्यापूर्वी मधुमेह असल्यास किंवा अयोग्य आहार-विहारामुळे गर्भारपणात मधुमेह झाल्यास अशावेळी जास्त काळजी घ्यावी लागते. वाढलेल्या साखरेचा विपरीत परिणाम गर्भिणी आणि बाळ दोन्हींवर होऊ शकतो.

जुळी बाळे होणार असल्यास..
जर स्त्री जुळ्या किंवा अधिक बाळासह गर्भवती असेल तर ते गरोदरपण जास्त जोखमीचे असते. अशावेळी जास्त काळजी घ्यावी लागते.

गर्भामध्ये आरोग्य समस्या असल्यास..
जर पोटातील गर्भाला जेनेटिक प्रॉब्लेम, डाउन सिंड्रोम किंवा हृदय, फुफ्फुस किडनी संबंधित समस्या असल्यास त्या गर्भाला धोका पोहचू शकतो. अशावेळी जास्त काळजी घ्यावी लागते.

गरोदर स्त्रीला इन्फेक्शन झाल्यास..
गरोदर स्त्रीला जर एचआयव्ही किंवा हिपॅटायटीस सी, चिकनपॉक्स, रुबेला, टॉक्सोप्लाज्मोसिस आणि सिफिलीसयापैकी कशाचेही इन्फेक्शन झाल्यास जास्त काळजी घ्यावी लागते.
 
वारंवार गर्भपात होण्याची समस्या असल्यास..
जर यापूर्वीच्या गरोदरपणात दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा गर्भपात झालेला असल्यास जास्त काळजी घ्यावी लागते.

मागील प्रसूती जोखमीची असल्यास..
यापूर्वीच्या गरोदरपणात मुदतीपूर्वी प्रसूती होणे, सिझेरियन प्रसूती होणे किंवा प्री-एक्लेम्पसियाचा त्रास झालेला असल्यास अशावेळी जास्त जोखीम असते. तसेच जर यापूर्वीच्या प्रसूतीवेळी डाऊन सिंड्रोमसारख्या जेनेटिक समस्या असणाऱ्या बाळाला जन्म दिल्यास अधिक काळजी घ्यावी लागते.

गरोदर स्त्रीला काही व्यसने असल्यास..
गरोदर स्त्रीला जर धूम्रपान, तंबाखू किंवा मद्यपान अशी व्यसने असल्यास गरोदरपणात जोखीम वाढते. कारण या व्यसनाचा विपरीत परिणाम आई आणि गर्भावर होत असतो. अशावेळी जास्त काळजी घ्यावी लागते.

काही विशिष्ट औषधे घेत असल्यास..
लिथियम, फेनिटोइन, व्हॅल्प्रोइक ऍसिड किंवा कार्बमाझेपाइन अशी काही विशिष्ट औषधे गरोदर स्त्री घेत असल्यास गरोदरपणात धोका वाढतो. अशावेळी जास्त काळजी घ्यावी लागते.

जोखमीचे गरोदरपण असल्यास डॉक्टर आपली अशी घेतात काळजी :

• जोखमीचे गरोदरपण असल्यास डॉक्टर तुम्हाला अधिकवेळा तपासणीसाठी बोलावू शकतात. तसेच पोटातील गर्भाची वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही हे पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंड तपासण्या अधिकवेळा कराव्या लागू शकतात.
• उच्च रक्तदाबाची समस्या आहे की नाही हे पाहण्यासाठी रक्तदाब तपासणी करतात. जर उच्च रक्तदाब समस्या असल्यास त्यासाठी योग्य औषधे देतात. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करायला सांगतात.
• रक्ताची तपासणी करून ब्लड शुगर, हिमोग्लोबिन यांची तपासणी करतात. त्या चाचणीतून मधुमेह किंवा ऍनिमिया असल्याचे निदान झाल्यास त्यासाठी योग्य औषध गोळ्या दिल्या जातात.
• लघवीची तपासणी करून त्यातील प्रोटिन्सचे प्रमाण, साखरेचे प्रमाण किंवा इन्फेक्शन आहे का ते तपासले जाते.
• गरोदर होण्यापूर्वी काही आजार असल्यास त्यासाठी योग्य ती औषधे डॉक्टर देतात. अशाप्रकारे जास्त जोखमीच्या गरोदरपणात आपले डॉक्टर काळजी घेतात. जेणेकरून आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते.

जोखमीच्या मातांनी गरोदरपणात अशी काळजी घ्यावी :

• नियमित डॉक्टरांकडे तपासणीसाठी जावे. डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या किंवा चाचण्या जबाबदारीने करून घ्याव्यात.
• गरोदर होण्यापूर्वी एखादा आजार किंवा आरोग्य समस्या असल्यास त्याची कल्पना आपल्या डॉक्टरांना द्यावी. तसेच एखादे औषध सुरू असल्यास त्याबाबतही सांगावे.
• पौष्टिक आहार घ्यावा. आहारात प्रोटिन्स, दूध आणि दुधाचे पदार्थ, विविध फळे आणि भाज्यांचा समावेश असावा. मांसाहार करत असल्यास अंडी, मांस, मासे यांचा आहारात समावेश करू शकता.
• आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे, फोलिक ऍसिड व लोहाच्या गोळ्या वेळेवर घ्याव्यात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर कोणतेही औषध घेऊ नये.
• जोखमीचे गरोदरपण असल्यास कोणती कामे करावीत, व्यायाम करावा का, प्रवास करू शकतो का याविषयी आपल्या डॉक्टरांकडून मार्गदर्शन घ्यावे.
• जोखमीचे गरोदरपण असल्यास जास्त कष्टाची, थकवा आणणारी कामे करू नयेत. अशावेळी शक्यतो दूरचा प्रवास करणे टाळावे. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय स्वतःहून व्यायाम सुरू करू नये.
• सिगारेट, तंबाखू, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे. तसेच इतर लोक धूम्रपान करीत असताना त्या धुराच्या संपर्कात राहू नये.

डॉक्टरांकडे कधी तात्काळ जावे..?

• योनीतून अधिक रक्तस्त्राव किंवा पाणी जात असल्यास,
• पोटात किंवा ओटीपोटाचा तीव्र वेदना (क्रॅम्पिंग) होत असल्यास,
• चेहरा, हात किंवा पायावर अचानक सूज आल्यास,
• अंधुक किंवा अस्पष्ट दिसत असल्यास,
• तीव्र डोके दुखत असल्यास,
• ताप, अतिसार आणि अशक्तपणा आल्यास,
• आपल्या पोटातील गर्भाची हालचाल थांबली आहे किंवा सामान्यपेक्षा खूपच कमी हालचाल होत आहे असे वाटत असल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Understanding a High Risk Pregnancy in Marathi.


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...