डोळे कोरडे पडणे –
डोळे कोरडे पडण्याचा त्रास अनेकांना होत असतो. या त्रासाला वैद्यकीय भाषेत dry eye syndrome असे म्हणतात. यामध्ये आपल्या डोळ्यांत पुरेशा प्रमाणात अश्रू तयार होत नाही. अश्रू हे प्रामुख्याने तेल, पाणी आणि म्युकस यापासून बनलेले असते. डोळ्यांच्या सामान्य आरोग्यासाठी डोळ्यात पुरेसे पाणी असणे आवश्यक असते. कारण त्यामुळे डोळ्यात आलेली धूळ, कचरा अश्रूवाटे निघून जाण्यास मदत होते.
तसेच अश्रू डोळ्यांचे रक्षण करतात व डोळ्यांतील ओलावाही टिकवून ठेवतात. मात्र डोळ्यांतून अश्रू येणे बंदच होऊन डोळे कोरडे पडल्यास डोळ्याच्या अनेक तक्रारीही निर्माण होतात.
डोळे कोरडे होणे याची कारणे –
- अधिक काळ स्मार्टफोन, कॉम्प्युटर किंवा टीव्ही यांचा वापर केल्यामुळे डोळे कोरडे पडतात.
- अधिक काळ डोळ्यांची उघडझाप न करण्याने डोळे कोरडे पडू शकतात.
- वाढते वय आणि हार्मोनमधील बदलांमुळे डोळे कोरडे पडू शकतात.
- ऍलर्जीमुळे,
- कोरडी हवा किंवा प्रखर उन्हात फिरल्यामुळे,
- अधिक काळ कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यामुळे,
- थायरॉईड प्रॉब्लेम, व्हेरिकोज व्हेन्स, मधुमेहासारखे आजार असल्यामुळे डोळे कोरडे पडणे हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
- तसेच काही औषधे जसे, antihistamines, सर्दीवरील औषधे, गर्भनिरोधक गोळ्या, antidepressants या औषधांच्या परिणामामुळेही डोळे कोरडे पडण्याची समस्या होत असते.
डोळे कोरडे पडणे यावर उपाय –
डोळे कोरडे पडत असल्यास वरचेवर डोळ्यांची उघडझाप करावी. यामुळे डोळ्यात ओलावा कायम राहण्यासाठी मदत होते. दिवसातून 3 ते 4 वेळा डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. तसेच दिवसभरात पुरेसे पाणी देखील प्यावे. यामुळे डोळे कोरडे पडत नाहीत. हे घरगुती उपाय डोळे कोरडे पडणे यावर उपयुक्त असतात.
डोळे कोरडे पडू नयेत यासाठी काय करावे..?
1) डोळ्यांची उघडझाप करावी..
डोळ्यांची उघडझाप करत राहावी. डोळ्यांचा ओलावा कायम ठेवण्यासाठी वरचेवर थोड्याथोड्या वेळाने डोळ्यांची उघडझाप करत राहावी.
2) डोळे पाण्याने धुवावेत..
दिवसातून 3 ते 4 वेळा डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. यामुळे डोळ्यातील धूळ, कचरा निघून जाईल तसेच पाण्यामुळे डोळ्यात ओलावा निर्माण होईल.
3) पुरेसे पाणी प्यावे..
दिवसभरात साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरात पुरेसे पाणी राहील त्यामुळे डोळे कोरडे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
4) डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी..
अधिकवेळ स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर वापरणे, टीव्ही पाहणे टाळावे. जागरण करणे टाळावे. तसेच डोळ्यात कॉन्टॅक्ट लेन्सही अधिक काळ वापरणे टाळावे. उन्हात फिरताना गॉगल्स किंवा छत्रीचा वापर करावा.
डोळे कोरडे होणे यावरील उपचार –
डोळे कोरडे पडण्याच्या समस्येवर डोळ्यात घालण्यासाठी अनेक चांगले ड्रॉप्स उपलब्ध आहेत. यासाठी आय स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करून त्यांनी दिलेले ड्रॉप्सचा वापर करावा.
हे सुध्दा वाचा – डोळ्यात खाज सुटत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या..
Read Marathi language article about Dry eye syndrome Causes, Treatments and Home remedies. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.
मला हा त्रास आहे उपाय सांगा
चांगली माहिती
डोळे कोरडे पडत असल्यास सांगितलेले उपाय करून बघा. यामुळे तुमचा त्रास निश्चितच कमी होईल.