मधुमेहाचे प्रकार :
मधुमेहाचे तीन मुख्य प्रकार आहेत.
(1) टाइप-1 डायबिटीज
(2) टाइप-2 डायबिटीज
(3) गर्भावस्थेतील मधुमेह (गॅस्टेशनल डायबिटीज)
(1) टाइप-1 डायबिटीज –
या प्रकारचे मधुमेही रुग्ण हे पुर्णपणे इन्सुलिन इंजेक्शनवर अवलंबुन असतात. म्हणून या प्रकारास इन्सुलिन डिपेन्डेंट डायबिटीज मेलिटस असेही म्हणतात. या प्रकारच्या डायबिटीजचं प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त आढळते. या प्रकारातील रुग्णांच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत नाही यासाठी बाहेरुन इन्सुलिन इंजेक्शनाद्वारे इन्सुलिनची गरज भागवली जाते. ह्या प्रकारातील रुग्ण मधुमेहापासून पुर्णपणे बरे होत नाहीत. रक्तातील साखर नियंत्रणात राखण्यासाठी त्यांना दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. मधुमेहाचा हा प्रकार स्थायी आणि गंभीर स्वरुपाचा असतो. परिणामतः जन्मभर या मधुमेही रूग्णांना इन्सुलीनचं इंजेक्शन घ्यावेचं लागते.
(2) टाइप-2 डायबिटीज –
टाईप 2 प्रकारचेच रुग्ण अधिक असतात. हा प्रकारचा मधुमेह वयस्कामध्ये अधिक आढळतो. हा मधुमेह साधारणतः 30 वर्षं वयापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना होऊ शकतो. प्रामुख्याने अतिस्थुलतेमुळे इन्सुलिन निर्मितीवर परिणाम झाल्याने हा प्रकार होतो.
या प्रकारास नॉन इन्सुलिन डिपेन्डेट डायबिटीज असे म्हणतात. टाइप-2 मधुमेहाचे बहुतांश रुग्ण हे योग्य आहार आणि नियमित व्यायाम या उपायांनी मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतात. तसेच त्यांना गोळ्यांची किंवा इन्सुलिनचीही गरज भासू शकते.
(3) गर्भावस्थेतील मधुमेह (गॅस्टेशनल डायबिटीज) –
गरोदरपणात रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक झाल्यास गर्भावस्थेतील मधुमेह होण्याची समस्या निर्माण होते. हा डायबेटीस प्रकार फक्त स्त्री गर्भवती असतानाच होतो. गर्भवती स्त्रियांना होणाऱ्या त्रासांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने गर्भारपणाच्या मधल्या टप्प्यात म्हणजे 24 ते 28 आठवडे या काळात हा त्रास निर्माण होतो. यावर इन्सुलिनच्या इंजेक्शनद्वारे नियंत्रण ठेवले जाते.
साधारण 80% गर्भारपणात मधुमेह झालेल्या स्त्रियांची ग्लुकोज लेव्हल बाळाच्या जन्मासोबत नॉर्मलला येते. परंतु त्यांना भविष्यात मधुमेह होऊ शकतो. यासाठी त्यांनी दर सहा महिन्यांनी आपली ग्लुकोज तपासून घ्यावी. तर 20% स्त्रियांना कायमस्वरूपी मधुमेह होऊ शकतो.
प्री-डायबेटिस किंवा मधुमेहपुर्व अवस्था म्हणजे काय..?
अनेकदा मधुमेहाची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत मात्र बहुतांश रुग्णामध्ये डायबिटीज हा सुप्तावस्थेत असतो. सुप्तावस्थेत असलेल्या डायबिटीजला मधुमेहपुर्व अवस्था (प्री-डायबेटिस) असे म्हणतात. मधुमेहपुर्व अवस्थेमध्ये जर रुग्णाने योग्य आहार, व्यायाम, औषधोपचारांचा अवलंब केल्यास मधुमेहापासून दूर राहता येते. मात्र मधुमेहपुर्व अवस्था (प्री-डायबेटिस) असूनही अयोग्य आहार, विहाराचे अवलंब केल्यास कायमस्वरुपी मधुमेही रुग्ण होण्याचा धोका अधिक असतो.
सुप्तावस्थेतील मधुमेह लक्षणांवरून ओळखता येत नसल्यामुळे रक्तातील साखरेची तपासणी करावी लागते. यासाठी प्रत्येकाने वयाच्या तिशीनंतर वर्षातून एकदा उपाशीपोटी आणि दीड ते दोन तासांनी जेवणानंतर रक्तातील ग्लुकोज साखरेचे प्रमाण पाहावे. उपाशीपोटी साखरेचे प्रमाण 126 मिलिग्रॅम व जेवणानंतर 200 मिलिग्रॅम पेक्षा जास्त असेल तर मधुमेह झाला आहे असे समजावे. आणि जर उपाशीपोटी 110 ते 126 मिग्रॅ व जेवणानंतर 140-200 मिलिग्रॅम या दरम्यान साखर असल्यास ती मधुमेहाची पूर्वावस्था आहे असे समजावे.