रक्तातील साखर (Blood sugar) :
रक्तातील साखरेला ‘ब्लड ग्लुकोज’ असेही म्हणतात. आपण खाल्लेल्या अन्नातून आपल्या शरीराला साखर मिळत असते. शरीराच्या कार्यासाठी ही रक्तातील साखर खूपच महत्वाची असते. आपले शरीर ऊर्जेसाठी ही रक्तातील साखर वापरत असते. या ऊर्जेवरच शरिक्रिया चालत असतात. तसेच आपले शरीर हे नंतरच्या वापरासाठी थोडीफार साखर ही पेशींमध्ये साठवत असते. आपले शरीर हे इन्सुलिनमुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवत असते. तसेच व्यायाम सारख्या कृतीमुळे आपले शरीर ऊर्जेसाठी अधिक साखर वापरत असते. त्यामुळे देखील साखर नियंत्रित राहण्यास मदत होत असते.
रक्तातील साखर महत्वाची असली तरीही ती योग्य प्रमाणातच असावी लागते. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे टाइप 2 मधुमेह यासारखे आजार होत असतात. तसेच रक्तातील साखर कंट्रोल मध्ये न ठेवल्याने त्याचा विपरीत परिणाम हृदय, किडनी, डोळे आणि रक्तवाहिन्या यावर होत असतो. यासाठी रक्तातील साखर योग्य प्रमाणातच असणे आवश्यक असते.
रक्तातील साखरेचे प्रमाण किती असावे..?
उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण हे 70 ते 99 mg/dL पर्यंत असावे लागते. तर जेवणानंतर दोन तासांनी रक्तातील शुगर 140 mg/dL च्या आत असली पाहिजे. टेस्टमध्ये असे प्रमाण असेल तर शुगर लेव्हल नॉर्मल आहे हे समजले जाते.
रक्तातील साखरेची तपासणी (ब्लड शुगर टेस्ट) :
रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी खालिल चाचण्या कराव्या लागतात. या ब्लड टेस्ट द्वारे मधुमेह आहे की नाही ते तपासले जाते.
1) फास्टिंग शुगर टेस्ट
2) पीपी शुगर टेस्ट
उपाशीपोटी रक्तातील साखर किती असावी लागते..?
फास्टिंग शुगर टेस्ट करून उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले जाते. ह्या चाचणीसाठी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण तपासण्यापुर्वी किमान 8 तास उपाशी असणे गरजेचे असते.
- रक्तातील साखर 70 ते 99 mg/dL यामध्ये असल्यास नॉर्मल शुगर असल्याचे समजले जाते.
- रक्तातील साखर 100 ते 126 mg/dL यामध्ये असल्यास मधुमेहपुर्व अवस्था (प्री-डायबिटीज) असते.
- रक्तातील साखर 126 mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेह असल्याचे निदान होते.
जेवणानंतर ब्लड शुगर किती असावी लागते..? –
जेवणानंतर 2 तासांनी पीपी शुगर टेस्ट चाचणी करून ब्लड शुगर तपासली जाते.
- जेवणानंतर 140 mg/dL च्या आत रक्तातील शुगर असल्यास नॉर्मल प्रमाण समजावे.
- जेवणानंतर 140-200 mg/dL या दरम्यान साखर असल्यास ती मधुमेहाची पूर्वावस्था आहे असे समजावे.
- जेवणानंतर रक्तातील साखर 200 mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेहाचे निदान होते.
ग्लुकोमीटर आणि ब्लड शुगर तपासणी :
डायबेटीसचा त्रास असल्यास साखर नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण वेळोवेळी तपासणे गरजेचे असते. दरवेळी रक्तातील साखरेची तपासणी करण्यासाठी लॅबमध्ये जाणे योग्य ठरत नाही. यापेक्षा आपण घरच्याघरी ग्लुकोमीटरद्वारे शुगर तपासणी करू शकतो. त्यामुळे साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.
हे सुद्धा वाचा –मधुमेहसंबंधी माहिती जाणून घ्या..
Read Marathi language article about Fasting Plasma Glucose and Casual Plasma Glucose test. Last Medically Reviewed on February 15, 2024 By Dr. Satish Upalkar.