प्रसुतीची तयारी (Preparing for Delivery) :
बाळंतपणासाठी दवाखान्यात ऍडमिट होताना योग्य ती तयारी करणे आवश्यक असते. कारण जर नॉर्मल प्रसुती होणार असल्यास तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दोन ते तीन दिवस रहावे लागू शकते आणि जर सिझेरियन झाल्यास पाच ते सात दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागत असते. याशिवाय तुम्हाला किंवा तुमच्या बाळास काही आरोग्य समस्या झाल्यास यापेक्षाही अधिक काळ हॉस्पिटलमध्ये रहावे लागू शकते. अशावेळी त्यादृष्टीने आधीच काही तयारी केल्यास ऐनवेळी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होते.
प्रसूतीसाठी दवाखान्यात जाताना आपल्याबरोबर काही सामानांची बॅग घेऊन जावी. या बॅगेत कोणकोणते साहित्य आवश्यक असेल याची सोपी यादी खाली दिली आहे.
मॅटर्निटी बॅगेत हे साहित्य भरावे :
- गरोदरपणातील तपासण्या व मेडिकल रेकॉर्डची कागदपत्रे,
- आरामदायक चप्पल, ते सपाट आणि त्याची पकड देखील मजबूत असावी, जेणेकरुन हॉस्पिटलच्या गुळगुळीत फरशीवरून घसरून पडता कामा नये.
- टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, कंगवा, टॉवेल, रुमाल, शाल, अंथरुण, मैटरनिटी सैनिटरी पॅड्स इत्यादी.
- कपडे, गाऊन, सैल व आरामदायक अंडरवेअर्स.
असे साहित्य बॅगेत भरलेले असावेत.
मॅटर्निटी बॅग कधी भरून ठेवावी..?
साधारणपणे 37 ते 42 आठवड्यात कधीही प्रसूतीच्या कळा येऊ शकतात. त्यामुळे 36 व्या आठवड्यांपासून बॅग भरून तयार ठेवावी.
डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये केंव्हा ऍडमिट व्हावे..?
प्रसूतीची तारीख जवळ आल्यास व कळा चालू झाल्यावर दवाखान्यात दाखल व्हावे. पानमोट फुटल्यामुळे योनीतुन पाणी जात असल्यास, योनीतुन रक्तस्राव होत असल्यास तसेच जर प्रसुतीची तारीख होऊनही कळा न आल्यास दवाखान्यात दाखल व्हावे.
हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी ऍडमिट झाल्यावर अशी घ्यावी काळजी :
प्रसुतीसाठी दवाखान्यात अॅडमिट होताना स्त्रीबरोबर पती, आई, वडील, सासू किंवा बहीण अशा जवळच्या व्यक्तीपैकी कोणीतरी असावे. मात्र अनेक नातलगांना दवाखान्यात बोलावून अनावश्यक गर्दी करू नये.
प्रसूती होण्यापूर्वी भरपेट आहार खाऊ नये, शक्यतो पातळ द्रवपदार्थ प्यावेत. प्रसुती होण्यापूर्वी एनिमा दिला जातो. त्यामुळे पोट साफ होऊन डिलिव्हरीमध्ये मलविसर्जन होणे टळते व जखमात इन्फेक्शन होत नाही. प्रसुतीच्या वेळी सैल असणारे गाऊन घालावेत.
प्रसूतीची दुसरी स्टेज येण्यापूर्वी थोडे चालावे. गर्भाशयाचे तोंड पूर्णपणे उघडेपर्यंत पायी चकरा माराव्यात. यामुळे गुरुत्वाकर्षणमुळे प्रसूती लवकर मदत होते. नैसर्गिक प्रसूतीच्या वेळी आपणास आराम वाटेल अशी योग्य स्थिती निवडावी.
बाळंतपणाची मानसिक तयारी :
प्रसुती होण्यापूर्वी स्त्रीच्या मनावर भीती, ताण येण्याची शक्यता असते. विशेषतः पाहिलीच वेळ असल्यास ती स्त्री जास्त दडपणाखाली असू शकते. अशावेळी कुटुंबातील जवळच्या व्यक्ती आई, पती व नर्स यांनी तिला भावनिक व मानसिक आधार दिला पाहिजे.
हे सुध्दा वाचा..
Read Marathi language article about Preparing for Delivery. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.