नैसर्गिक प्रसूती :

एखाद्या प्रेग्नंट स्त्रीची डिलिव्हरी झाल्यास, नॉर्मल डिलिव्हरी झाली की सिझेरियन झाली असा पहिला प्रश्न विचारला जातो.

नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय..?

नॉर्मल डिलिव्हरीची व्याख्या डॉक्टर आणि लोकांच्या नजरेत वेगवेगळी असते. डॉक्टरांच्या मतानुसार, जर डिलिव्हरीमध्ये कोणतीही गुंतागुंत न होता आई आणि बाळ यांचे आरोग्य उत्तम राहिल्यास त्याला ‘नॉर्मल डिलिव्हरी’ होणे असे म्हणतात. मग अगदी सिझेरियन ऑपरेशन झाले तरीही आणि जर आई आणि बाळ यांचे आरोग्य उत्तम असल्यास त्यालाही ‘नॉर्मल डिलिव्हरी’चं म्हंटले जाते.

तर लोकांच्या मतानुसार, योनीमार्गातुन डिलिव्हरी होणे व सिझेरियन करावे न लागणे याला ‘नॉर्मल डिलिव्हरी’ होणे असे मानले जाते. अशाप्रकारे योनीमार्गातूनन डिलिव्हरी होत असल्यास त्याला ‘नैसर्गिक प्रसुती’ होणे असे संबोधले पाहिजे. याठिकाणी बाळंतपण कसे होते याविषयी माहिती खाली दिली आहे.

नैसर्गिक प्रसूती कशी होते..?

नॉर्मल डिलिव्हरी (किंवा नैसर्गिक प्रसूतीचे) प्रामुख्याने चार टप्पे (stages) असतात.
1) पहिल्या टप्प्यात – गर्भाशयाचे तोंड उघडते
2) दुसऱ्या टप्प्यात – बाळ बाहेर येते
3) तिसरा टप्प्यात – प्लेसेंटा (वार) बाहेर येते
4) चौथ्या टप्यात – आई आणि बाळ यांच्यावर विशेष देखरेख ठवली जाते.

बाळंतपणातील या सर्व टप्यांची (stages) सविस्तर माहिती खाली दिली आहे.

पहिला टप्पा (First stage) –

प्रसुती कळा सुरू झाल्यावर आतील दाब वाढत असतो. त्यामुळे गर्भाशयाचे तोंड हळूहळू उघडत असते. त्यानंतर बाळ ज्या गर्भजलाच्या पिशवीत असते ती पिशवी (पाणमोट) फुटते. त्यानंतर बाळाच्या डोक्याचा दबाव गर्भाशयाच्या तोंडावर येतो व हळूहळू गर्भाशयाचे तोंड उघडू लागते.

पूर्णपणे गर्भाशयाचे तोंड उघडण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. अगदी तीन तास ते 12 तासापर्यंतचा वेळ यासाठी लागू शकतो. जर प्रसुतीच्या कळा जोराने येत असतील तर काही वेळातचं गर्भाशयाचे तोंड उघडते. मात्र बारीक कळा येत असल्यास वेळ जास्त लागू शकतो.

पाहिले बाळंतपण असल्यास गर्भाशय तोंड उघडण्यासाठी 12 तास लागू शकतात. इतर स्त्रियांमध्ये सहा ते लागू शकतात. या टप्यात स्त्रीने नर्स किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या हाताला धरून चालावे. यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे बाळ लवकर खाली सारकण्यास व गर्भाशयाचे तोंड लवकर उघडण्यास मदत होते. गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडल्यावर पहिला टप्पा पूर्ण होतो.

दुसरा टप्पा (Second stage) –

दुसऱ्या टप्प्यात गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडते व बाळाचे डोके बाहेर दिसू लागते. त्यानंतर हळूहळू बाळाचे हात, छाती, पाय बाहेर येतात. अशाप्रकारे बाळ आणि गर्भाशयातील पाणी बाहेर येते. प्रसूतीची पहिलीच वेळ असल्यास यासाठी 2 तासांचा कालावधी लागू शकतो. तर इतर स्त्रियांमध्ये यापेक्षा कमी वेळात ही अवस्था पूर्ण होते.

काहीवेळा योनीमार्ग लहान असल्यास योनीच्याठिकाणी छोटा चिरा देऊन मार्ग मोठा करावा लागतो. तसेच काही वेळा बाळाचे डोके बाहेर दिसत असल्यास व बाळ बाहेर येण्यास उशीर लागत असल्यास फॉर्सेप्स (चिमटा) किंवा व्ह्याकुम यांचा वापर केला जातो. बाळ बाहेर आल्यावर म्हणजे बाळ जन्मल्यावर ते रडते. बाळाच्या रडण्यामुळे त्याचा श्वासोच्छ्वास ठीक आहे असे समजते. त्यानंतर बाळाची नाळ चिमटा लावून योग्यप्रकारे कट केली जाते. अशाप्रकारे दुसरा टप्पा पूर्ण होतो.

तिसरा टप्पा (Third stage) –

तिसऱ्या टप्प्यात वार (प्लासंटा आणि मेम्बरेन्स) बाहेर काढणे आवश्यक असते. वार बाहेर काढण्यासाठी डॉक्टर नाळेला थोडा ताण देऊन ओढतात. यामुळे गर्भाशयापासून वार सुटून बाहेर येते. साधारणपने बाळाच्या जन्मानंतर 10 ते 20 मिनिटात वार बाहेर पडणे आवश्यक असते. यापेक्षा अधिक काळ लागत असल्यास जास्त रक्तस्राव होण्याचा धोका असतो. वार पूर्णपणे बाहेर पडल्यावर तिसरा टप्पा पूर्ण होतो.

चौथा टप्पा (Fourth stage) –

चौथा टप्पा हा ऑब्झर्वेशनचा असतो. वार बाहेर आल्यानंतर बाळ आणि बाळंतिण यांच्यासाठी पाहिला एक तास महत्वाचा असतो. या कालावधीत बाळ आणि बाळंतिण यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाते. या काळात जर गर्भाशयाचे आकुंचन कमी झाले तर खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. बाळंतिणमध्ये रक्तस्राव होत असल्यास तो थांबवण्यासाठी उपचार या कालावधीत केले जातात. बाळाचे श्वासक्रिया वैगेरे सुरळीत आहे याची तपासणी केली जाते. अशाप्रकारे चौथा टप्पा पूर्ण होतो.

वरील चार टप्पे पूर्ण झाल्यावर नैसर्गिक प्रसूती किंवा नॉर्मल डिलिव्हरी पूर्ण होते.

नॉर्मल प्रसुतीनंतर होणाऱ्या समस्या व घ्यावयाची काळजी :

नैसर्गिक प्रसुती झाल्यानंतरही सुरवातीचे काही दिवस स्त्रीमध्ये काही समस्या जाणवत असतात. येथे नॉर्मल डिलिव्हरीनंतर जाणवणाऱ्या तक्रारी घ्यावयाची काळजी याची माहिती खाली दिली आहे.

1) प्रसूतीनंतरही माझ्या पोटात का दुखत आहे..?

बाळाचा जन्म झाल्यानंतर गर्भाशय पुन्हा आपल्या स्थितीत म्हणजे प्रेग्नंट होण्यापूर्वी जसे गर्भाशय होते त्या स्थितीत येत असते. त्यामुळे प्रसूतीनंतरही या वेदना होत असतात. या वेदनांना ‘आफ्टरपेन्स’ असे म्हणतात. या वेदना बाळाच्या जन्मानंतर 2 ते 3 दिवस होत असतात. गरज वाटल्यास यासाठी सुरक्षित अशी वेदनाशामक औषधे आपले डॉक्टर देतील. प्रसुतीनंतर काही दिवसात डॉक्टर आपल्या गर्भाशयाची हाताने तपासणी करतील. त्यावेळी कोठे जास्त दुखत असल्यास डॉक्टरांना सांगावे.

2) प्रसुतीनंतर माझे टाके किती दिवसात बरे होतील..?

प्रसूतीच्या वेळी योनीमार्ग लहान असल्यास त्याठिकाणी चिरा दिला जातो तसेच काही वेळा प्रसूतीच्यावेळी योनी व गुदाच्या ठिकाणाचा भाग फाटू शकतो. अशावेळी तेथे जखम होऊ शकते. अशावेळी तेथे टाके घातले जातात. हे टाके बरे होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. याठिकाणी वेदना होत असते.

यासाठी आपले डॉक्टर सुरक्षित असे वेदनाशामक औषधे देतील. तसेच या टाके पडलेल्या भागाची अधिक स्वच्छता व काळजी घेणे आवश्यक असते. रोज आंघोळ करताना एंटिसेप्टिक औषध मिसळलेल्या पाण्याने ती जागा धुवून घ्यावी. टाके पडलेल्या ठिकाणी किंवा जखमेच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी तेथे एंटिसेप्टिक औषधे किंवा क्रीम लावावी.

3) प्रसूतीनंतर मला शौचावेळी त्रास का होत आहे..?

प्रसूतीच्या वेळी योनीमार्ग लहान असल्यास त्याठिकाणी चिरा दिला जातो तसेच काही वेळा प्रसूतीच्यावेळी योनी व गुदाच्या ठिकाणाचा भाग फाटू शकतो. अशावेळी जखम झालेली असते तसेच तेथे टाके घातले जातात. त्यामुळे शौचावेळी त्रास होत असतो. हा त्रास काही आठवडे सहन करावा लागू शकतो. बद्धकोष्ठता किंवा मलाचा खडा धरत असल्यास त्यासाठीची औषधेही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

4) डिलिव्हरीनंतर स्तनात वेदना का होत आहेत..?

प्रसूतीनंतर स्तनपानासाठी शरीर तयार होत असते. सुरवातीचे काही दिवस स्तन हे दुधाने अधिक भरलेले असतात. त्यामुळे त्याठिकाणच्या उतींमधील रक्तप्रवाह वाढलेला असतो. अशावेळी स्तन हे जड व वेदनायुक्त वाटत असतात. एक दोन दिवसात स्तन नरम होऊन वेदना कमी होतील.

तसेच बाळाने योग्यप्रकारे दूध न ओढल्यास दुध कमी न झाल्याने त्याठिकाणी गाठ होऊ शकते. ही गाठ हाताला जाणवते तसेच ती दुखतही असते. अशावेळी स्तन दाबून हे दूध काढून टाकावे लागते. याकरिता मेडिकल स्टोअरवर स्तनाचा पंपही मिळतो. त्यानेही हे दूध काढता येते. दिवसातून तीन ते चार वेळा अशाप्रकारे दूध काढून टाकावे. जर दुधाच्या गाठीमध्ये पु धरल्यास ते दूध बाळाला पाजू नये. यावर उपचारासाठी डॉक्टरांकडे जावे.

5) प्रसूतीनंतर किती दिवस योनीतुन रक्तस्त्राव जात राहील..?

बाळाच्या जन्मानंतर लगेचच तुमच्या योनीतून रक्तस्त्राव होत राहील. हा रक्तस्त्राव (लोकिया) सुरवातीच्या दिवसात खूप जास्त असू शकतो. मात्र नंतर हळूहळू कमी कमी होत जाईल. सुरवातीला लालसर स्त्राव असतो तर हळूहळू तो तपकिरी रंगाचा होत जाईल. साधारणपणे बाळाच्या जन्मानंतर 6 आठवड्यापर्यंत हे ब्लीडिंग बंद होईल.

काहीवेळा होणारा रक्तस्राव हा अधिक प्रमाणातही होऊ शकतो. याला पोस्टपार्टम हेमरेज (पीपीएच) असे म्हणतात. यामध्ये काळजी घेणे आवश्यक असते.

पोस्टपार्टम हेमरेजची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात.

  • योनीतुन अचानक अधिक प्रमाणात रक्तस्राव होणे,
  • एका तासामध्ये एकापेक्षा जास्त पॅड बदलावे लागणे,
  • स्त्रावातून रक्ताच्या गुठळ्या बाहेर येणे,
  • अशक्तपणा किंवा चक्कर येणे,
  • हृदयाचा ठोके वाढणे अशी लक्षणे असल्यास ताबडतोब दवाखान्यात जावे.

हे सुध्दा वाचा..

Read Marathi language article about natural and Normal delivery process. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.