स्तनपान : नवजात शिशुचा आहार

8008
views

स्तनपान : नवजात शिशुचा आहार –
नवजात बालकाचे प्रमुख अन्न हे मातेचे दुधच आहे. मातेच्या दुधातून नवजात बालकाचे पोषण तर होतेच शिवाय त्यामध्ये रोग प्रतिकारक घटक असल्याने बालकाचे अनेक रोगांपासून रक्षण होण्यास मदत होते. म्हणून नवजात शिशूंमध्ये स्तनपानाचे अत्यंत महत्व आहे.

मातेचे दुध हे नवजात बालकांसाठी एक प्रकारचे अमृतच आहे. मातेच्या दुधाशिवाय अन्य कोणताही आहार नवजात शिशुंसाठी योग्य नसतो. पहिल्या 6 महिन्यापर्यंत बालकास स्तनपान करणे गरजेचे आहे. नवजात बालके दगावण्याचा धोका हा वयाच्या पहिल्या महिन्यापासून ते पहिल्या वर्षापर्यंत अधिक असतो. या काळामध्ये स्तनपानामुळे हा धोका कमी होतो.

स्तनपानामुळे बालकाचे दमा, अतिसार, कुपोषण. पोटाचे विकार, रक्त कैन्सर होण्यासून रक्षण होते. मातेच्या दुधामध्ये कैन्सरपासून लढण्याचे अनेक घटक असतात. त्यामुळे स्तनपान केलेल्या बालकात भविष्यात कैन्सर होण्याची संभावना कमी होते.

एखाद्या बाळाला किती काळपर्यंत स्तनपान करवावे ?
पहिले सहा महिने केवळ स्तनपानच करवावे आणि त्यानंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपान चालू ठेवावे. लक्षात ठेवा किमान पहिल्या 6 महिन्यापर्यंत बालकास केवळ मातेचे दुधच द्यावे. पाणी, फळांचा रस किंवा अन्य द्रव्ये 6 महिन्यापर्यंत देऊ नयेत.

स्तनपान लवकर सुरु का करावे ?
बाळ हे पहिल्या 30 ते 60 दिवसांमधे अतिशय क्रियाशील असते. या काळात त्याची चोखण्याची भावना देखील अत्यंत क्रिय़ाशील असते. लवकर सुरु करण्यानं स्तनपान यशस्वी होण्याची शक्यता वाढते. स्तनातून येणारा पहिला पिवळसर घट्ट द्राव हा बाळाला संक्रमणापासून वाचवणा-या अनेक घटकांनी युक्त असतो, तो लसीसारखंच काम करतो. स्तनपान करवण्यानं स्तन सुजणे आणि वेदना टाळली जाते आणि प्रसुतीपश्चात रक्तस्त्राव कमी होतो.

सिझेरीयन पध्दतीने प्रसुती करवलेल्या स्त्रिया बाळाला स्तनपान करवू शकतात का ?
या शस्त्रक्रियेमुळं बाळाला स्तनपान करवण्याच्या आपल्या क्षमतेत काहीही फरक पडत नाही. स्तनपान हे शस्त्रक्रियेनंतर चार तासांनी सुरु करता येतं किंवा आपण भूलीच्या अमलाखालून बाहेर याल तेव्हा. सिझेरीयन शस्त्रक्रिया झालेल्या सर्व माता पहिले काही दिवस मदत घेऊन आपल्या बाळांना स्तनपान करवण्यात य़शस्वी झाल्या आहेत.

माता आजारी असेल तरीही ती स्तनपान करवू शकते का ?
होय. बहुतांश आजारांचा बाळावर परिणाम होत नाही. ताप, कावीळ, हिवताप असला तरी स्तनपान थांबवू नये.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.