हिरड्यांतून रक्त येणे (Bleeding gums) :
अनेक कारणांमुळे हिरड्यांतून रक्त येत असते. यामध्ये तोंडातील अस्वच्छता, हिरड्यातील बॅक्टेरिअल इन्फेक्शन, दातांची मुळे सैल झाल्याने, दात किडल्यामुळे तसेच पायरिया हा दात व हिरड्यांसंबंधित आजार झाल्यानेही रक्त येऊ शकते. अशावेळी तेथे वेदना होऊ लागतात. विशेषतः अन्न चावताना जास्त त्रास होत असतो.
हिरड्यातून रक्त येण्याची ही आहेत कारणे :
• हिरड्या व दातांवरील बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे,
• हिरड्यांना आलेली दीर्घकालीन सूज – पायोरियामुळे (Pyrohoea),
• ब्रशमुळे हिरड्यांना दुखापत झाल्यामुळे किंवा अयोग्य पद्धतीने प्लॅसिंग करण्यामुळे,
• ऍस्पिरिन सारख्या काही ठरावीक औषधांमुळे,
• आहारातील ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव असल्यास,
• रक्तातील प्लेटलेट्सच्या) कमतरतेमुळे,
• ल्युकेमिया किंवा रक्ताचा कर्करोग झाला असल्यास,
तसेच प्रेग्नन्सीमध्ये हार्मोन्समधील बदलामुळेही हिरड्यातून रक्त येऊ शकते.
हिरडीतून रक्त येऊ नये यासाठी काय करावे?
• तोंडाची स्वच्छता ठेवावी.
• दिवसातून सकाळी व रात्री असे दोनवेळा दात घासावेत.
• चुकीच्या पद्धतीने दात स्वच्छ करू नका व फार जोर देऊन दात घासू नये.
• आहारात ‘क’ जीवनसत्त्वयुक्त आवळा, लिंबूपाणी, संत्री, मोसंबी यासारख्या पदार्थांचा समावेश करा.
• मद्यपान, धूम्रपान, गुटखा, पानमसाला खाणे ताबडतोब बंद करा.
• काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरा.
• मिठाच्या पाण्याने गुळणी करा. मिठामुळे जंतूंची वाढ थोपवली जाते.
• तोंड धुताना हिरड्यांना बोटाने चोळावे, त्यामुळे रक्तपुरवठा वाढतो.
• मिठाई व चॉकलेटस कमी प्रमाणात खावे व खाल्ल्यास लगेच दात घासा.
हिरड्यातून रक्त येत असल्यास हे 5 घरगुती उपाय करा :
1) लवंग –
लवंग तेल कापसाच्या बोळ्याने दुखणाऱ्या हिरड्यांच्या ठिकाणी लावल्यास त्यांतील इन्फेक्शन, सूज व दातांतून रक्त येणे थांबण्यास मदत होते.
2) पेरूची पाने –
पेरूची ताजी पाने चावत राहिल्याने हिरड्यांतून रक्त येणे थांबते व हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.
3) मध आणि लिंबू रस –
अर्धा चमचा मधात 2 थेंब लिंबू रस मिसळून मिश्रण तयार करावे. हिरड्यांतून रक्त येत असल्यास बोटाने हे मिश्रण त्याठिकाणी लावावे.
4) मोहरीचे तेल आणि हळद –
मोहरीच्या तेलात हळद मिसळून मिश्रण तयार करावे. ह्या मिश्रणाने रोज रात्री झोपण्यापूर्वी हिरड्यांना हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे हिरड्या दुखणे, हिरड्यांतून रक्त येणे थांबते व हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.
5) व्हिटॅमिन C –
हिरड्यातून रक्त येत असल्यास आहारात ‘क’ जीवनसत्त्वयुक्त आवळा, लिंबूपाणी, संत्री, मोसंबी यासारख्या पदार्थांचा समावेश करा. तसेच कॅल्शियम असणारे दूध, दुधाचे पदार्थ खावेत.
Marathi language article about Bleeding gums causes and home remedies. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 13, 2024.