गरोदरपणातील गर्भाची हालचाल :
गर्भावस्थेत आईच्या गर्भाशयात बाळाची वाढ होत असते. पोटात वाढणारे बाळ हे प्रत्येक गरोदर स्त्रीसाठी खासच असते आणि जेंव्हा पोटातील बाळाच्या हालचाली जाणवू लागतात तेव्हा त्या गर्भवतीला खूपच आनंद होत असतो. याठिकाणी प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांच्या काळात पोटातील बाळ हालचाल कशी करत असते याविषयी माहिती दिली आहे.
गर्भावस्थेत बाळाची हालचाल कधीपासून जाणवू लागते..?
गरोदरपणाच्या सुरवातीच्या काही महिन्यांत बाळाची हालचाल जाणवत नाही. कारण या दिवसात गर्भाची वाढ नुकतीच होऊ लागलेली असते. जसजशी प्रेग्नसी पुढे सरकत जाईल तसतशी गर्भाची वाढ व विकास होऊ लागतो. त्यानंतर गरोदर मातेला पोटातील बाळाच्या हालचाली जाणवू लागतात. साधारणपणे काही गर्भवती स्त्रियांना गर्भधारणेच्या 20 व्या आठवड्यादरम्यान बाळाच्या काही हालचाली जाणवू शकतात. तसेच 24 व्या आठवड्यातनंतर गर्भाशयात बाळाच्या किक (लाथा मारणे) जाणवू शकते.
एका दिवसात गर्भाची किती वेळा हालचाल जाणवू शकते..?
साधारणपणे 20 ते 24 आठवड्यांनंतर बाळाच्या हालचाली जाणवू लागतात. दिवसभरात प्रत्येकवेळी आपल्याला बाळाची हालचाल जाणवत राहील असेही नसते. कारण जेव्हा तुम्ही काही कामांमध्ये व्यस्त असता तेव्हा कदाचित आपले लक्ष त्याकडे लागले नसेल तर आपणास कदाचित बाळाची हालचाल जाणवणार नाही. तसेच बाळ काही काळ झोपतही असते त्यामुळे अशावेळीही बाळाची हालचाल जाणवत नाही.
प्रेग्नन्सीच्या 24 ते 28 आठवड्यात गर्भातील बाळाची हालचाल अधिक जाणवत असते. अशावेळी एका तासात 15 ते 40 वेळा हालचाली जाणवू शकतात. साधारणपणे दोन तासांत जर बाळाची हालचाल 10 वेळा जाणवली तर काळजी करण्याचे काही कारण नसते.
आठवड्यानुसार बाळाची हालचाल कशी जाणवते..?
20 ते 24 आठवड्यात – या काळात आपणास बाळाच्या हालचाली जाणवू लागतात. बाळाचे हातपाय हलवणे जाणवते.
24 ते 28 आठवड्यात – यादरम्यान आपल्या बाळाच्या हिचकीकडे लक्ष द्या. जेव्हा बाळाला हिचकी येते तेंव्हा तुम्हाला ती जाणवू लागते. तसेच या आठवड्यात बाळ फिरत असल्याचेही जाणवू शकते. याशिवाय बाहेरच्या मोठ्या आवाजाला ते प्रतिसाद देऊ शकते.
29 ते 31 आठवड्यात – गर्भधारणेच्या शेवटच्या काही आठवड्यात बाळाची हालचाल कमी होत असते. ही एक सामान्य बाब आहे. या आठवड्यानंतर बाळाच्या आकारात वाढ झाल्याने गर्भाशयात त्याला हालचाल करण्यास पुरेशी जागा नसल्याने बाळाची हालचाल कमी जाणवत असते. परंतु जेव्हा जेव्हा बाळाची हालचाल होईल तेव्हा ती आपणास स्पष्ट जाणवेल.
गर्भाशयातील बाळाची स्थिती आणि होणारी हालचाल :
प्रेग्नन्सीमध्ये शेवटच्या तिमाहीत बाळाची वाढ जलदरीत्या होत असते. त्यामुळे बाळाचा आकार या काळात अधिक वाढलेला असतो. सातव्या महिन्यानंतर गर्भाशयामध्ये बाळाला हालचाल करायला पुरेशी जागा उरत नाही. बाळाचे डोके खाली व पाय वर असलेल्या स्थितीमध्ये बाळ गर्भाशयात राहत असते. त्यामुळे सात महिने झाल्यावर बाळ आपल्या हातापायांची फक्त हालचाल करत असते.
जर गर्भाशयात बाळाची हालचाल जाणवत नसेल तर काय करावे..?
जर गर्भधारणेच्या 24 व्या आठवड्यापर्यंत आपल्या बाळाची कोणतीही हालचाल जाणवत नसेल तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
प्रेग्नन्सीमध्ये बाळ हालचाल कमी करीत असल्यास डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते..?
24 ते 28 आठवड्यापर्यंत बाळाची हालचाल जास्त प्रमाणात जाणवू शकते. त्यानंतर मात्र बाळाची हालचाल कमी होते कारण, बाळास हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्याची हालचाल कमी होत असते. त्यामुळे बाळाची हालचाल कमी झाली असे वाटले तरी काळजी करू नका. तसेच जर दोन तासांत बाळाची हालचाल 10 वेळा जाणवली नसल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Read Marathi language article about Baby movements in pregnancy. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.