गरोदरपणी वजन जास्त वाढणे :
प्रेग्नन्सीमध्ये आईच्या गर्भाशयात गर्भाची वाढ होत असते. त्यामुळे गर्भारपणात आईचे वजन वाढणे स्वाभाविक असते. मात्र जर अधिक प्रमाणात गरोदर स्त्रीचे वजन वाढल्यास ते काळजीचे कारण ठरत असते. कारण अशा जास्त वजनाच्या प्रेग्नंट स्त्रियांमध्ये गरोदरपणातील मधुमेह होणे, ब्लडप्रेशर वाढणे यांसारखे त्रास होऊ शकतात. तसेच त्यांच्यामध्ये सिझेरियन डिलिव्हरी होण्याची शक्यताही वाढत असते.
गरोदरपणात साधारण किती वजन वाढले पाहिजे..?
ज्या स्त्रिया अगदी साधारण प्रकृतीच्या असतात, त्यांच्यात बारा किलो वाढ अपेक्षित असते; पण ज्या स्त्रिया अगदी बारीक किंवा ‘अंडर वेट’ असतात, त्यांच्यामध्ये 13 ते 15 किलो वजन वाढले पाहिजे. आणि ज्या स्त्रिया प्रेग्नन्सीपूर्वी जाड असतात, त्यांच्यात गरोदरपणामध्ये वजन दहा किलोपर्यंत वाढणे अपेक्षित असते.
• साधारण प्रकृतीच्या स्त्रिया – 10 ते 12 किलो
• कमी वजन असणाऱ्या स्त्रिया – 13 ते15 किलो
• जाड असणाऱ्या स्त्रिया – 10 किलो
गर्भावस्थेत अनावश्यक वजन वाढू नये यासाठी अशी घ्यावी काळजी :
गरोदरपणात अनावश्यक वजन वाढू नये यासाठी योग्य आहार घेणे खूप आवश्यक असते. अशावेळी तेलकट व तुपकट पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, साखरेचे पदार्थ, मिठाई, केक, चॉकलेट असे चरबी वाढवणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजेत.
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, डाळी, धान्ये, दूध व दुधाचे पदार्थ, सुकामेवा, मांस, मासे, अंडी अशा पौष्टिक आहाराचा समावेश आहारात असावा. या पदार्थात फायबर्स, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, खनिजे यांचे मुबलक प्रमाण असते. यामुळे बाळाचे पोषण होते, आईचे आरोग्य चांगले राहते, मांसयुक्त हेल्दी वजन वाढते व अतिरिक्त चरबीयुक्त वजन वाढत नाही.
एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे. दिवसभरात थोडाथोडा आहार घ्यावा. यामुळे घेतलेल्या आहाराचे योग्यप्रकारे पचन होते. याशिवाय दिवसभरात वरचेवर थोडेथोडे पाणी पीत राहावे. दिवसभरात साधारण 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाण्याशिवाय शहाळ्याचे पाणी आपण पिऊ शकता. मात्र सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.
वजन वाढते म्हणून गरोदरपणात उपवासी राहणे, भूक लागूणही खाणे टाळणे असले प्रकार करू नयेत. आपण घेतलेल्या आहारावरच बाळाचे आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे उपवासी राहू नये. तसेच वजन कमी करण्यासाठीचा व्यायामही गरोदरपणात करू नये. डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे हलका व्यायाम करावा. यासाठी 15 ते 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करू शकता. अशाप्रकारे आपण प्रेग्नन्सीमध्ये वाढणारे अनावश्यक वजन आटोक्यात ठेऊ शकता.
Read Marathi language article about Tips to avoid gaining too much pregnancy weight. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.