नवजात बाळाची बेंबी आणि नाळ :
प्रेग्नन्सीमध्ये आईच्या गर्भाशयात बाळ असताना त्याचे पोषण नाळेमार्फत होत असते. डिलिव्हरीनंतर ही नाळ कट केली जाते. तसेच या नाळेचा काही भाग बाळाच्या बेंबीजवळ ठेवून नाळ कट केली जाते. याला ‘umbilical cord stump’ असे म्हणतात. ही बाळाची नाळ काही दिवसात आपोआप गळून पडते व त्याठिकाणी बाळाची बेंबी तयार होत असते. त्यामुळे नवजात बाळाच्या बाबतीत नाळ पडेपर्यंत योग्य ती काळजी घ्यावी लागते.
बाळाची नाळ कधी पडते..?
साधारणपणे 5 ते 15 दिवसात आपोआप नाळ सुकत जाऊन पडत असते. मात्र जोर लावून नाळ ओढून काढू नये. नाळ पडल्यावर बाळाच्या बेंबीजवळ थोडी जखम होते. ती जखमही आठवड्यात बरी होते व तेथे बाळाची बेंबी आकाराला येते.
लहान बाळाची बेंबी फुगणे :
नाळ पडल्यानंतर काही बाळांची बेंबी फुगू शकते. ही एक नॉर्मल बाब असून यावर विशेष उपचाराची आवश्यकता नसते. बऱ्याचशा बाळांच्या बाबतीत दुसऱ्या वाढदिवसापर्यंत हा फुगवटा आपोआप दूर होतो. त्याला ‘अंबिलिकल हर्निया’ असे म्हणतात.
बाळाच्या नाळेची अशी घ्यावी काळजी :
बाळाच्या नाळेच्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो यासाठी नाळ आपोआप पडेपर्यंत विशेष काळजी घ्यावी लागते.
• आंघोळीच्या वेळी नाळ पाण्याने हळुवार स्वच्छ धुऊन सुती कापडाने कोरडी करा.
• नाळेवर तेल किंवा साबण लावणे टाळा.
• नाळेवर सुती कापड किंवा बँडेज काहीही बांधू नका.
• नाळ आपोआप पडू द्यावी. जोर लावून नाळ ओढून काढू नये.
डॉक्टरांकडे केंव्हा जाणे आवश्यक असेल..?
• चार आठवड्यांनंतरही जर नवजात बाळाची नाळ वाळून आपोआप खाली पडली नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.
• नाळ किंवा बेंबीजवळ दुर्गंधी येणे, तेथून पू व स्त्राव येत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
• नाळेच्या ठिकाणी पाणी येणे, जखम चिघळणे व बाळाला ताप येत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
• नाळ किंवा बेंबीजवळ रक्तस्राव होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
• नाळ गळून पडल्यानंतरही बरेच दिवस बेंबी ओली राहिल्यास डॉक्टरांकडे जावे.
हे सुद्धा वाचा..
नवजात बाळाची काळजी कशी घेतली पाहिजे याविषयी जाणून घ्या.
Read Marathi language article about Caring of newborn’s umbilical cord stump. Last Medically Reviewed on March 11, 2024 By Dr. Satish Upalkar.