अकाली प्रसूती होणे (Preterm Delivery) :
गर्भावस्थेचा एकूण कालावधी हा 40 आठवडे इतका असतो. मात्र जर 37 आठवड्यांपूर्वीच म्हणजे सातव्या किंवा आठव्या महिन्यांत प्रसूती झाल्यास त्याला ‘प्रीटर्म लेबर’ किंवा ‘अकाली प्रसूती’ होणे असे म्हणतात.
मुदतपूर्व प्रसुती होण्याची कारणे :
- प्रेग्नन्सीमध्ये अचानक गर्भजलाची पिशवी (पानमोट) फुटणे,
- गरोदर स्त्रीच्या पोटावर आघात होणे,
- गर्भजलाचे प्रमाण जास्त असण्यामुळे,
- योनीमार्गातील इन्फेक्शनमुळे,
- गर्भाशय व सर्व्हिक्स यातील विकृतीमुळे,
- गरोदरपणात काही गंभीर समस्या झाल्यास जसे
- प्री-एक्लेमप्सिया, हाय-ब्लडप्रेशर, डायबेटीस, ऍनिमिया यांमुळे,
- मागील गरोदरपणात गर्भपात झालेला असणे,
- यापूर्वीसुद्धा मुदतपूर्व प्रसूती झालेली असल्यास,
- गरोदर स्त्रीने प्रेग्नन्सीमध्ये सिगारेट, तंबाखू, मद्यपान यासारखे व्यसन केल्यामुळे वेळेपूर्वी डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते.
अंगावरून स्राव जाणे, ओटीपोटात दुखणे, वारंवार शौचास होणे, जुलाब लागणे, कंबर दुखणे अशी लक्षणे यावेळी जाणवू शकतात. त्यामुळे गरोदरपणात गर्भजलाची पिशवी फुटणे, योनीतुन पाणी येणे किंवा 37 आठवड्यापूर्वीच प्रसुतीच्या कळा सुरू झाल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
प्री-टर्म डिलिव्हरीचे बाळावरील परिणाम :
बाळाच्या आरोग्याच्यादृष्टीने 37 ते 42 आठवड्यात बाळाचा जन्म होणे आवश्यक असते. कारण या आठवड्यात जन्मलेल्या बाळांच्या अंग अवयवांची पूर्ण वाढ झालेली असते.
अशा प्रकारच्या बालकांना अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार तातडीने मिळणे गरजेचे असते. मुदतपूर्व प्रसूतीत जन्मलेल्या बाळाचे वजन हे पूर्ण वाढ होऊन जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत खूप कमी असते. त्वचा अतिशय नाजूक असते. म्हणूनच अशा कमी वजनाच्या बाळांकडे जन्मल्यापासून विशेष लक्ष देण्याची, त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जाण्याची आणि विशेष काळजी घेण्याची गरज असते. जन्मल्याबरोबर त्यांना उपचाराकरिता नवजात अर्भकांकरिता खास बनविल्या गेलेल्या अतिदक्षता विभागात (NICU)मध्ये बाळाची तब्येत नॉर्मल होईपर्यंत ठेवण्यात येथे.
35 व्या आठवड्यात बाळांचा जन्म झाल्यास..
35 आठवड्यात जन्माला आलेल्या नवजात बाळास काही त्रास होण्याची शक्यता कमी असते. काहीवेळा अशा बालकांना श्वास घेण्यात थोडा त्रास होऊ शकतो.
28 ते 34 आठवड्यांच्या दरम्यान बाळांचा जन्म झाल्यास..
या कालावधीत बाळाचा अकाली जन्म झाल्यास काही अडचणी त्रास होऊ शकतो. कारण अशा बालकांचे अवयव अजूनही बरेच विकसित होणे आवश्यक असते. त्यामुळे या काळात जन्मलेली बालके खूप कमजोर असू शकतात. त्यांना आईचे दूध चोकण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशा नवजात मुलांची काळजी ‘निओनाटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट’मध्ये (NICU) घेतली जाते. योग्यप्रकारे वैद्यकीय काळजी घेतल्यास 28 आठवड्यात जन्मलेली बालकेही चांगल्या प्रकारे जीवित राहू शकतात.
28 व्या आठवड्यांपूर्वी बाळाचा जन्म झाल्यास..
दुर्दैवाने जर गर्भधारणेच्या 28 आठवड्यांपूर्वी बाळाचा जन्म झाल्यास अशा बाळांचे जगणे कठीण असते. तसेच त्यातूनही जगलेल्या बाळांना अनेक सौम्य ते गंभीर अशा आरोग्य समस्या उदभवू शकतात. कारण अजून बराच कालावधी बाळ गर्भाशयात राहणे आवश्यक असते. त्याचे विविध अवयव विकसित व्हावे लागतात.
मुदतपूर्व प्रसुतीमध्ये प्रामुख्याने सिझेरियन करून प्रसुती केली जाते. सिझेरियन डिलिव्हरी कशी करतात ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Premature delivery. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.