गर्भधारणेचा तिसरा महिना (Pregnancy 3rd Month) :
प्रेग्नन्सीमध्ये सुरवातीच्या तीन महिन्यात गर्भाची वाढ अतिशय वेगाने होत असते. पहिल्या तीन महिन्यात, गर्भ हा अस्थिर असल्याने, जराशा चुकीनेही गर्भस्त्राव (Abortion) होऊ शकतो. म्हणूनच गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात, गर्भिणीला खूपच जपावे लागते. तिच्या आहार, विहार, मानसिक स्थिती, या सर्वांवर लक्ष ठेवावे लागते.
प्रेग्नन्सी ही एकूण चाळीस आठवड्यांची असते. त्यापैकी तिसऱ्या महिन्यात 9 ते 13 आठवड्यांचा समावेश असतो. गरोदरपणातील तिसऱ्या महिन्यात गर्भवती आणि पोटातील गर्भावर होणारे बदल आणि तीन महिन्यांच्या गर्भारपणात घ्यावयाची काळजी, आहार, विहार याविषयीची माहिती येथे दिली आहे.
गरोदरपणातील तिसऱ्या महिन्यात गर्भामध्ये होणारे बदल :
तिसऱ्या महिन्यात पोटातील बाळाचे डोळे, कान, नाक, हात, पाय असे अंग-अवयव तयार होऊन त्यांची वाढ होऊ लागते. त्याच्या डोक्यावर केस येत असतात व संपूर्ण अंगावर लव येत असते. गर्भाशयातील गर्भजलात सुरक्षितपणे आपले बाळ तरंगत असते. गर्भजलामुळे त्याचे धक्क्यापासून संरक्षण होत असते. तिसऱ्या महिन्यात गर्भ हा अगदी तळ हातात मावेल एवढ्या लहान आकाराचा असतो. सोनोग्राफी केल्यास, एखाद्या छोट्या बाहुलीप्रमाणे बाळाचा आकार दिसतो.
तिसरा महिना संपत असताना, नाळ (Placenta) पूर्णपणे तयार झालेली असते. या नाळेमार्फतच गर्भाचे संपूर्ण पोषण होत असते. त्यामुळे या नाळेतील रक्तपुरवठा योग्य रीतीने होत असणे गरजेचे असते. त्यासाठी गरोदर मातेचा आहार, विहार, औषधी योग्य असणे गरजेचे असते.
तीन महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे :
दुसऱ्या महिन्यात जाणवणारी उलट्या होणे, मळमळणे, अशक्तपणा वाटणे यासारखी लक्षणे तिसऱ्या महिन्यात थोडी कमी होतात. तिसऱ्या महिन्यात गरोदर महिलेची भूक जरा वाढू लागते. मात्र याही महिन्यात वजन फारसे वाढलेले दिसत नाही. कंबर व स्तनांभोवती कपडे जरा घट्ट होत असल्याचे जाणवेल. तिसऱ्या महिन्यानंतर गरोदर असल्यामुळे पोटावर एक लहानसा उंचवटा दिसू लागेल.
गरोदरपणाचा तिसरा महिना आणि आहार :
तिसऱ्या महिन्यात मळमळणे, उलट्या होणे यासारख्या समस्या थोड्याफार कमी होतात. तसेच अचानक वरचेवर भूक लागल्याचे जाणवते. यासाठी दिवसातून तीन ते चार वेळा थोडा-थोडा आहार घ्यावा. एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे. ताजा व संतुलित आहार घ्यावा.
तिसऱ्या महिन्यात गर्भवती स्त्रीचा आहार असा असावा –
आहारात पोळी, भात, डाळी, भाज्या, विविध फळे यांचा समावेश असावा. कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असणारे दूध व दूधाचे पदार्थही आहारात असावेत. त्यामुळे बाळाचे हाडे मजबूत होण्यास मदत होईल.
गरोदरपणात शरीराला ताकद देणारे प्रोटिन्सयुक्त पदार्थही आहारात असणे आवश्यक असते. यामध्ये दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, सुकामेवा, अंडी, मटण, मासे, चिकन यांचा समावेश करावा. आहारात आयोडिनयुक्त मीठचं वापरावे. आयोडिनमुळे बाळाची वाढ सशक्त व निरोगी होते. मात्र मीठ अधिक प्रमाणात खाणे टाळावे. तसेच गरोदरपणात तेलकट, चरबीयुक्त पदार्थ, शिळे अन्न, अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे.
गर्भधारणेचा तिसरा महिना आणि वैद्यकीय तपासण्या :
तिसऱ्या महिन्यात गरोदर स्त्रीने ह्या तपासण्या करून घ्याव्यात.
गरोदरपणात बऱ्याचशा तपासण्या ह्या तिसरा महिना झाल्यानंतर केल्या जातात. तसेच ज्या गरोदर स्त्रीचे वय 35 च्या पुढे असेल व त्यांचे हे पहिलेच गर्भारपण असेल किंवा ज्यांना आनुवंशिक आजाराची पाश्र्वभूमी असल्यास अशा गर्भिणी स्त्रीच्या, रक्ताची एक तपासणी (Double Marker associated with ultrasonography) तिसऱ्या महिन्याचा शेवटी केली जाते. यातून गर्भाला व्यंग किंवा जीवावर बेतणारे कोणते आजार नाहीत ना हे समजून घेण्यास मदत होते.
गर्भावस्थेचा 3रा महिना आणि औषधे :
प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या महिन्यात औषधे घेताना अशी घ्यावी काळजी.
आपल्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत. गरोदरपणात लोह वाढीसाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला दररोज लोहाची गोळी घ्यायला सांगू शकतात. अशा गोळ्या किंवा औषधे घेणे गरोदर माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे.
प्रेग्नन्सीमध्ये तिसऱ्या महिन्यात अशी घ्यावी काळजी :
तिसऱ्या महिन्यात गर्भाचे स्वरूप हे अस्थिर असल्याने, जास्त काळजी घ्यावी लागते.
- ताजा व संतुलित आहार घ्यावा.
- एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे. दिवसातून तीन ते चार वेळा थोडा-थोडा आहार घ्यावा.
- इन्फेक्शन (जंतुसंसर्ग) होऊ नये म्हणून बाहेरील उघड्यावरील खाणे टाळावे.
- तिखट, मसालेदार व तेलकट पदार्थ टाळावेत.
- जास्त थकवा आणणारी कामे करू नयेत.
- जड वस्तू उचलू नयेत.
- पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. रात्री 8 ते 9 तास व दुपारी 1 तास झोप किंवा विश्रांती घ्यावी.
- लांबचा प्रवास करणे टाळावे. तसेच दुचाकीवरून प्रवास करणे टाळावे.
- आपल्या डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करावेत. चालण्याचा व्यायाम व काही सोपी योगासने करू शकता.
- मानसिक ताण, दगदग, जागरण करू नये.
- इन्फेक्शन होऊ नये यासाठी अस्वच्छ सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळावा.
- डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
हे सुध्दा वाचा – गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यात घ्यायची काळजी.
Read Marathi language article about Third month Pregnancy Symptoms, Diet plan & Care tips. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.