गर्भावस्था आणि संसर्गजन्य आजार :
गर्भावस्थेत रोग्रतिकारकशक्ती कमजोर होत असल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे गरोदरपणात अनेकदा फ्ल्यू सर्दी, खोकला यासारखे व्हायरल इन्फेक्शन होत असते. अशावेळी प्रेग्नन्सीमध्ये स्वच्छता व योग्य ती काळजी घेतल्यास असे संसर्गजन्य आजार होण्यापासून सहज दूर राहता येते.
गरोदरपणात इन्फेक्शन (संसर्ग) होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :
1) वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या..
आरोग्याच्या बाबतीत स्वच्छता खूप महत्त्वाची असते. गर्भवतीने शारीरिक स्वच्छता चांगली ठेवणे आवश्यक असते. हात साबणाने किंवा हँड वॉशने स्वच्छ धुवावेत. हातांच्या स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा वापर करावा. प्रेग्नन्सीमध्ये रोजच्यारोज अंघोळ करावी. अंघोळ करताना स्तनांची आणि योनी भागाची स्वच्छता करावी.
2) मूत्रमार्गात संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घ्या..
लघवीला झाल्यास लघवी थांबवून ठेऊ नका. शौचाच्यावेळी गुदभागातील बॅक्टेरिया मूत्रमार्गात पसरू नये यासाठी शौचानंतर समोरच्या बाजूने धुवावे. सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना जास्त काळजी घ्यावी. अशावेळी टॉयलेट सीटवर बसणे टाळावे. भारतीय पद्धतीचे टॉयलेट असल्यास त्याचा वापर करावा. दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. म्हणजे लघवीला साफ होण्यास मदत होते.
3) दूषित पदार्थ खाणे टाळा..
बाहेरील उघड्यावरील, माशा बसलेले पदार्थ जसे बटाटेवडा, भजी, पुरीभाजी, पाणीपुरी, शेवपुरी, चायनीज पदार्थ असे दूषित पदार्थ खाणे टाळावे. गरोदरपणात फिल्टरचे पाणी किंवा उकळवून गार केलेले पाणी प्यावे. बाहेरचे दूषित पाणी पिऊ नये. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होण्याचा धोका असतो.
4) स्वच्छ धुतल्याशिवाय फळे, भाज्या खाऊ नये..
बाजारातील फळे, भाज्या यांच्यावर हानिकारक केमिकल, कीटकनाशके फवारलेली असतात. त्यामुळे फळे, भाज्या स्वच्छ धुतल्याशिवाय खाऊ नयेत. मोड आलेली कडधान्येही कच्ची खाऊ नयेत. कारण त्यामध्ये साल्मोनेला, लिस्टेरिया आणि ई-कोलाईसारखे बॅक्टेरिया असू शकतात. त्यामुळे गरोदर स्त्रीला उलट्या किंवा अतिसाराची समस्या होऊ शकते.
5) कच्चे मांस व कच्चे अंडे खाऊ नये..
कच्चे मांस किंवा अर्धवट शिजलेले मांस खाण्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रेग्नन्सीत कच्चे मांस खाणे टाळा. तसेच कच्ची अंडी खाण्यामुळे साल्मोनेला इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. या इन्फेक्शनमुळे गर्भवती स्त्रीला उलट्या आणि अतिसार असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी कच्ची अंडी खाऊ नयेत.
6) आजारी व्यक्तींपासून लांब राहा..
गर्भावस्थेत गरोदर महिलेने सर्दी, खोकला किंवा ताप आलेल्या आजारी व्यक्तींपासून लांब राहावे. त्यांनी वापरलेला हातरुमाल, टॉवेल किंवा कपडे वापरणे टाळावे.
7) गरोदरपणात फ्लूची लस घ्या..
प्रेग्नन्सीमध्ये फ्लूची लस घेतल्यामुळे आई आणि गर्भाचे फ्लूपासून संरक्षण होते. तसेच बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला काही महिन्यांपर्यंत फ्लू, न्यूमोनिया सारख्या आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते.
अशाप्रकारे येथे गरोदरपणातील संसर्ग होण्याची कारणे व घ्यावयाची काळजी याची माहिती दिली आहे.
हे सुद्धा वाचा – गरोदरपणात आहार कसा असावा ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Prevent Infections During Pregnancy. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.