मूळव्याध ही एक सामान्य आरोग्य समस्या असून याचा अनेक लोकांना त्रास होत असतो. मूळव्याधाच्या आजारात गुदाच्या ठिकाणी सूज येणे, वेदना होणे, जळजळ होणे, काहीवेळा शौचातुन रक्त पडणे अशी लक्षणे असतात. मूळव्याध हा वेदनादायी आणि चिवट असा आजार आहे. मूळव्याध कधी व कसा बरा होतो, मूळव्याध लवकर बरा होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती येथे सांगितली आहे.
मूळव्याधमध्ये गुदाजवळील नसा सूजतात. मूळव्याधची समस्या बद्धकोष्ठता, अयोग्य आहार, तिखट व मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे, फायबरयुक्त आहार कमी घेण्यामुळे, लठ्ठपणा, गर्भधारणा, बैठे काम आणि एकाचं जागी अधिकवेळ बसणे किंवा उभे राहणे यामुळे होऊ शकते.
मूळव्याध कधी व कसा बरा होत असतो..?
मुळव्याधचा आजार एकदा सुरू झाल्यास तो बरेच दिवस त्रास देत असतो. मुळव्याध आजार कधीच बरा होत नाही, असा अनेक लोकांचा गैरसमज असतो. मात्र जर मूळव्याधीत योग्य औषध उपचार, योग्य आहार आणि काळजी घेतल्यास त्रास लवकर कमी होऊ शकतो.
मात्र जर आजाराकडे दुर्लक्ष केल्यास किंवा योग्य ती काळजी न घेतल्यास मूळव्याधचा त्रास वाढू शकतो. मूळव्याध बरा होण्यासाठी काही दिवस योग्य औषधे व पथ्य व्यवस्थित सांभाळणे आवश्यक असते.
मूळव्याध लवकर बरा होण्यासाठी अशी काळजी घ्यावी :
• मुळव्याध असल्यास पुरेसे फायबरयुक्त पदार्थ खाण्यात असावेत. आहारात हिरव्या भाज्या, फळे, फळभाज्या यांचा समावेश करावा.
• वारंवार तिखट, खारट व मसालेदार पदार्थ, मांसाहार, अंडी, चिकन व पचनास जड पदार्थ खाणे टाळावे.
• दररोज पुरेसे म्हणजे किमान आठ ग्लास पाणी प्यावे.
• सैल-फिटिंग कॉटनच्या अंडरवेअर आणि सैल पँट घालाव्यात.
• नखे वेळच्यावेळी कमी करावीत. जेणेकरून शौचाच्यावेळी खाज येऊन नखे लागून जखम होणार नाही.
• जास्त वेळ एकाचजागी बसणे टाळावे.
• वजन आटोक्यात ठेवावे. यासाठी नियमित व्यायाम करावा. अशी काळजी घेतल्यास मुळव्याधच्या त्रासापासून लवकर बरे होण्यास मदत होईल.
Last Medically Reviewed on February 27, 2024 By Dr. Satish Upalkar.