मान अवघडणे कारणे व उपाय (Stiff neck)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Stiff neck solution in Marathi, Stiff neck Causes, treatment, and Remedies in Marathi.

मान अवघडणे :

रात्री चुकीच्या स्थितीत झोपल्यामुळे किंवा झोपताना योग्य उशी न वापरल्याने सकाळी मान दुखू लागते. या त्रासाला मान आखडणे, मान जखडणे किंवा मान लचकणे असेही म्हणतात. मान अवघडल्यामुळे त्याठिकाणी दुखू लागते. अशावेळी मान वळवताना तीव्र वेदना जाणवू लागतात. मानेतील मांसपेशी व सॉफ्ट टिश्यू यांमध्ये ताण आल्याने हा त्रास होत असतो.

आजकालच्या डिजिटल युगात बहुतांश व्यक्ती मान खाली करून नजरा स्मार्टफोनवर ठेवून त्याचा वापर करत असतात. अशाप्रकारे स्मार्टफोन, लॅपटॉपचा वापर करणे हे मान अवघडून दुखण्याचे एक प्रमुख कारण ठरत आहे.

मान अवघडणे घरगुती उपाय :

जखडलेली मान मोकळी करण्यासाठीचे उपयुक्त उपायांची माहिती खाली दिली आहे.

थंड किंवा गरम शेक..
मान आखडून दुखत असल्यास त्याठिकाणी थंड किंवा गरम शेक द्यावा. जखडलेल्या मानेवर बर्फाचा शेक देणे उपयुक्त ठरते. यामुळे त्याठिकाणी आलेली सूज कमी होण्यास मदत होते. याशिवाय अंघोळ करताना मानेवर गरम पाणी घेण्यामुळेही मानेतील आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते.

स्ट्रेचिंगचा व्यायाम..
ज्या बाजूला मान दुखते त्याच्या विरुद्ध बाजूला आपली मान हळूहळू वळवण्याचा प्रयत्न करावा. तसेच मान आणि पाठीच्या वरच्या भागाला स्ट्रेचिंग द्यावे. असे केल्याने स्नायू हळूहळू मोकळे होण्यास मदत होईल. यामुळे जखडलेला भाग मोकळा होण्यास आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

मसाज..
मानेच्या ज्या भागावर वेदना होत आहेत त्यावर हाताने हलका मसाज करावा. यावेळी muscle relaxant gel किंवा स्प्रेचा वापरही करू शकता. यामुळेही आखडलेले स्नायू हळूहळू मोकळे होण्यास मदत होते. 

मान दुखत असल्यास कोणती काळजी घ्यावी..?

मान आखडलेली असल्यास मानेवर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. दुखणाऱ्या मानेला जोरात हिसका मारू नये. तसेच वजनदार वस्तू उचलणे टाळावे.

डॉक्टरांकडे कधी जावे..?

वरचेवर मान अवघडून मानेचे दुखणे होत असल्यास डॉक्टरांकडून निदान व योग्य उपचार घेणे गरजेचे असते. याशिवाय मानेवर इंज्युरी झाल्याने मान दुखत असल्यास, जास्त प्रमाणात मान दुखत असल्यास, मानेच्या वेदना हाताकडे पसरत असल्यास किंवा हातापायात अशक्तपणा जाणवत असल्यास डॉक्टरांकडे जाणे अत्यंत गरजेचे आहे.

मान अवघडू नये यासाठी हे करा..

आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल केल्यास तसेच काही सवयी बदलल्यास या त्रासापासून दूर राहता येणे शक्य आहे.
• झोपताना जास्त उंच असणारी उशी वापरणे टाळावे.
• झोपताना कुशीवर किंवा पाठीवर झोपावे. यामुळे मानेवर जास्त ताण येत नाही. मात्र पोटावर झोपणे टाळावे. यामुळे मानेवर अधिक ताण पडत असतो.
• वजनदार वस्तू उचलताना मानेवर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
• लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापर करताना खुर्चीत योग्य स्थितीत बसावे. पायांचे तळवे जमिनीला टेकलेले असावेत. मान व नजर समोर असावी.
• ड्रायव्हिंग करतानाही योग्य स्थितीत बसावे. दूरचा प्रवास करताना मध्येमध्ये थांबून शरीर रिलॅक्स करावे.
• स्मार्टफोनचा मर्यादित वापर करावा. माना खाली घालून तासनतास स्मार्टफोनचा वापर करणे टाळावे.
• मानेचे साधेसोपे व्यायाम नियमित करावेत.

मानाचे व्यायाम कसे करावेत..?

आरामदायी बसावे किंवा उभे राहावे. मान समोर खाली व वर हळूहळू न्यावी. त्यानंतर मान अनुक्रमे डाव्या आणि उजव्या बाजूला हळूहळू खांद्याकडे न्यावी. त्यानंतर मान सावकाशपणे डावी व उजवीकडे वळवावी. अशाप्रकारे मानेचे हे व्यायाम दिवसातून 5 ते 10 वेळा करावेत. यामुळे मानेतील स्नायूंना बळकटी व आराम मिळण्यास मदत होते.

Neck stiffness in Marathi, Stiff neck meaning in Marathi.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.