लहान मुलांमधील लठ्ठपणा – Childhood obesity :
सध्या लहान मुलांमध्ये जाडीचे प्रमाण अधिक वाढत आहे. विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांमधील लठ्ठपणा ही चिंताजनक बाब आहे. मुलांमध्ये जाडी निर्माण होण्याची कारणे, त्यामुळे होणारे परिणाम व लहान मुलांचे वजन कसे कमी करावे याविषयी माहिती येथे दिली आहे.
मुलांचे वजन अधिक वाढण्याची कारणे :
- अनुवंशिकता म्हणजे कुटुंबात आई-वडील लठ्ठ असल्याने,
- जन्मतः वजन जास्त असणे,
- व्यायामाचा अभाव,
- मैदानी खेळ न खेळणे,
- अभ्यास आणि करिअरच्या वाढत्या स्पर्धेमुळे खेळाकडे दुर्लक्ष करणे,
- बैठी जीवनशैली,
- बराचवेळ टीव्ही पाहत बसणे किंवा कॉम्प्युटरवर खेळत राहणे,
- स्मार्टफोनचा अतिवापर,
- अयोग्य आहार खाणे,
- फास्टफूड, जंकफूड, बेकरी पदार्थ, मिठाई, चॉकलेट, आईस्क्रीम यासारखे पदार्थ खाणे यामुळे लहान मुलांचे वजन अधिक प्रमाणात वाढत आहे.
जाडी वाढल्यामुळे मुलांना होणाऱ्या समस्या :
लहान वयातील लठ्ठपणामुळे मुलांमध्ये कमी वयातच हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड प्रॉब्लेम, हाडांचे आजार आणि सांधेदुखी यासारखे अनेक आजार जडतात. याशिवाय लठ्ठपणामुळे मुलींमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी, PCOS सारखे त्रास होऊ लागतात.
याव्यतिरिक्त लठ्ठपणामुळे मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. याचा परिणाम मुलांच्या मनावरही होत असतो.
लहान मुलांचे वजन आटोक्यात ठेवण्याचे उपाय :
- मुलांना योग्य आहार द्यावा.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, ताजी फळे, दूध व दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी यांचा समावेश असावा.
- मुलांना फास्टफूड, जंकफूड, चिप्स, स्नॅक्स, पिज्जा, चॉकलेट, आईस्क्रीम, बिस्किटे, मिठाई, मैद्याचे बेकरी प्रोडक्ट, बर्गर, वडापाव, तेलकट पदार्थ, कोल्ड्रिंक्स यापासून दूर ठेवावे.
- मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यावे.
- आपल्याबरोबर मुलांनाही सकाळी फिरायला घेऊन जावे.
- सायकलिंग, पोहणे, डांसिंग, दोरीउड्या, पायऱ्या चढणे-उतरणे, योगासने, प्राणायाम यासारख्या व्यायामाचा समावेश करावा.
अशाप्रकारे हेल्दी लाइफस्टाइलचा अंतर्भाव मुलांच्या जीवनात केल्यास, मुलांचे वजन आटोक्यात राहील, तसेच त्यांचा शारीरिक व मानसिक विकास योग्यरीत्या होण्यास मदत होईल.
Read Marathi language article about Childhood obesity.