नखांवर पांढरे डाग पडणे –
बऱ्याच जणांच्या नखांवर पांढरे डाग किंवा ठिपके असतात. अनेक कारणांनी नखांवर पांढरे डाग पडू शकतात. प्रामुख्याने शरीरात पोषक घटकांची कमतरता असल्यास नखांवर असे पांढरट ठिपके पडत आसतात.
नखांवर पांढरे डाग पडण्याची कारणे (Causes) :
1) ऍलर्जी (Allergy) –
ऍलर्जीमुळे नखावर पांढरे डाग पडू शकतात. नेल पेंट, नेल पॉलिशची ऍलर्जी यासाठी कारणीभूत ठरू शकते.
2) ल्युकोनीचिया (Leukonychia) –
नखांसंबधित ल्युकोनीचिया या समस्येत नखावर पांढरे डाग पडू शकतात. यामध्ये नेल प्लेटचे गंभीर नुकसान होते. यावर डॉक्टरांकडून उपचार होणे आवश्यक असते.
3) हिमोग्लोबिनची कमतरता –
हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास त्यामुळेही नखांवर पांढरट डाग पडतात.
4) पोषक घटकांची कमतरता –
विविध पोषक घटकांची कमतरता जसे की प्रोटीन, बायोटिन, फॉलिक एसिड वगैरे नखांवर परिणाम करू शकतात. चुकीच्या आहारामुळे शरीरात लोह, झिंक, कॅल्शियम, प्रोटीन्स अशा पोषक घटकांची कमतरता झाल्यास नखावर पांढरे डाग पडू शकतात.
5) झिंकची कमतरता –
नखांच्या वाढीसाठी झिंक हे महत्वपूर्ण ट्रेस मिनरल आहे. त्याची कमतरता असल्यास पांढरे डाग दिसू शकतात.
6) नखांच्या ठिकाणी झालेल्या दुखापती –
नखांना दुखापत झाल्याने नखावर पांढरे डाग पडू शकतात. तसेच हाताच्या किंवा पायाच्या मागच्या बाजूला इजा झाल्यास तेथील नवीन नखे वाढताना पांढरे डाग येऊ शकतात.
7) त्वचा विकार –
नेल सोरायसिस आणि एक्जिमा ह्या त्वचारोगामुळेही नखावर पांढरे डाग पडू शकतात.
8) इन्फेक्शन –
नखाला बुरशीचा संसर्ग (फंगल इन्फेक्शन) झाल्यास देखील नखावर पांढरे डाग पडू शकतात.
नखांवर पांढरे डाग पडणे यावर घरगुती उपाय –
1) नखांना व्हिटॅमिन-E युक्त तेल लावावे.
नखावर पांढरे डाग असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी नखांना खोबरेल तेल लावून नखे चोळावीत. यासाठी व्हिटॅमिन-E युक्त तेल जास्त उपयोगी पडते. ऑलिव्ह ऑईलचा यासाठी वापर करावा.
2) नखांना लिंबाची फोड चोळावी.
नखावर पांढरे डाग असल्यास नखांना लिंबाची फोड चोळावी.
3) संतुलित आहार घ्यावा.
शरीरात पोषक घटकांची कमतरता झाल्यास नखावर पांढरे डाग पडू शकतात. यासाठी योग्य आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा समावेश करावा.
नखावर पांढरे डाग असल्यास घ्यायची काळजी –
- नखांना नेल पॉलिश, नेलपेंट करू नका.
- नखे दातांनी कुरतडू नयेत.
- नखांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. पायांची आणि हातांची स्वच्छता ठेवा.
- संतुलित आणि पोषक आहार घ्या.
- झिंक, लोह युक्त सप्लिमेंट्स घेऊ शकता.
कधी डॉक्टरकडे जावे?
- नखामध्ये फंगल इन्फेक्शन झाले असल्यास डॉक्टरांकडून बुरशीविरोधी औषधे घ्या.
- नखांवरील पांढरे डाग जात नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डाग लहान नसून मोठे असतील आणि संपूर्ण नखावर पसरले असतील तर डॉक्टरकडे जावे.
- नखे खराब होणे, रंग बदलणे किंवा सूज येणे असे त्रास होत असल्यास डॉक्टरकडे गेले पाहिजे.
डॉक्टर नखांची तपासणी करून योग्य निदान करू शकतात आणि त्यानुसार उपचार सुचवू शकतात.
Read Marathi language article about White spots on nails causes and treatment. Last Medically Reviewed on March 6, 2024 By Dr. Satish Upalkar.