गर्भावस्था आणि गर्भाचे वजन :
गरोदर स्त्री जर अशक्त असेल किंवा तिला पुरेसा पोषक आहार न मिळाल्यास गर्भाची वाढ योग्यप्रकारे होत नाही. त्यामुळे गर्भाचे वजनही योग्य भरत नाही. अशा बाळांचे जन्मल्यानंतरही वजन कमी असते. आईच्या आहारावरच गर्भाची वाढ होत असते. त्यामुळे पोटातील बाळाचे वजन वाढण्यासाठी आईने आपल्या आहाराकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असते.
जर गर्भाचे वजन हे आवश्यक वजनापेक्षा कमी राहिल्यास प्रेग्नन्सीमध्ये काही समस्या होऊ शकतात. अशावेळी गर्भपात होण्याची, बाळ दगावण्याची किंवा जन्मणारे बाळ हे कमी वजनाचे असण्याची समस्या होत असते. तसेच अशी कमी वजनाची बालके ही सारखी आजारी पडण्याची शक्यता असते. यासाठी येथे गरोदरपणात गर्भाशयातील बाळाचे वजन कसे वाढवावे याविषयी माहिती दिली आहे.
गर्भातील बाळाचे वजन योग्यप्रकारे न वाढण्याची कारणे :
• आईने पुरेसा पोषक आहार न घेतल्यामुळे,
• आईची प्रकृती अशक्त असल्यामुळे,
• गरोदरपणात प्री-एक्लेम्पसियाची स्थिती निर्माण झाल्याने बाळास पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन व पोषकघटक न मिळाल्याने,
• प्लेसेंटामधील विकृतीमुळे बाळाला रक्ताचा पुरवठा योग्यप्रकारे न झाल्याने,
• गर्भाला जन्मजात विकृती असल्याने,
• गर्भातील बाळाला इन्फेक्शन झाल्याने गर्भाची योग्यप्रकारे वाढ होत नाही. त्यामुळे गर्भातील बाळाचे वजन अपेक्षितपणे वाढत नाही.
गरोदरपणात पोटातील बाळाचे वजन वाढवण्यासाठी हे आहेत उपाय :
ज्या स्त्रियांचे वजन गर्भावस्थेत कमी असते त्यांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक असते. विशेषतः त्यांनी प्रोटिन्स, कर्बोदके, व्हिटॅमिन, खनिजे, फायबर्स अशी पोषकतत्वे असणारा पोषक आहार घेणे गरजेचे असते.
• आहारात दूध व दुधाचे पदार्थ समाविष्ट करावेत.
• सुकामेवा, विविध फळे, कडधान्ये, धान्ये, पालेभाज्या, फळभाज्या आहारात असाव्यात.
• मांसाहार करत असल्यास मांस, मासे, अंडी यांचा आहारात समावेश करावा.
• आहार वेळच्यावेळी व पुरेसा घ्यावा.
• दिवसातून 3 ते चार वेळा थोडाथोडा आहार घ्यावा.
• दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
• डॉक्टरांनी दिलेली पूरक औषधे, लोह व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या वेळेवर घ्याव्यात.
• डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून गर्भाची वाढ योग्यरीत्या होत आहे की नाही ते पाहावे.
• पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. दुपारच्या वेळेसही थोडे झोपावे.
Read Marathi language article about Weight gain during pregnancy. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.