नैसर्गिक प्रसुतीसाठी खास टिप्स :
अनेक गरोदर स्त्रियांना आपली प्रसुती ही नैसर्गिक किंवा नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असे वाटत असते. मात्र नॉर्मल प्रसूती होण्यासाठी स्त्रीची प्रकृती, बाळाची स्थिती असे अनेक घटक जबाबदार असतात.
नैसर्गिक प्रसुती होण्यासाठी खालील तीन प्रमुख बाबी आवश्यक असतात.
1) गर्भाची पूर्ण वाढ होणे आवश्यक..
नॉर्मल डिलिव्हरीसाठी पूर्ण वाढ झालेला गर्भ असणे आवश्यक असते. म्हणजे गरोदरपणात 37 ते 42 आठवडे गर्भ हा गर्भाशयात राहणे आवश्यक असते.
2) गर्भाची स्थिती योग्य असावी..
गर्भाशयात गर्भाची स्थिती ही नैसर्गिक प्रसुतीसाठी योग्य अशी असणे आवश्यक असते. म्हणजे बाळाचे डोके खालील बाजूला असावे लागते. बाळ पायाळू किंवा आडवे असल्यास ते योनीमार्गातून बाहेर येण्यास अडचणी येत असते.
3) वैद्यकीय समस्या नसाव्यात..
नैसर्गिक प्रसुती होण्यासाठी अडथळा आणणाऱ्या आरोग्य समस्या आई आणि बाळ यांना नसाव्यात.
ह्या तीन बाबी असल्यास नैसर्गिक प्रसुती होणे शक्य होते.
नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी हे आहेत उपाय :
नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी गरोदरपणातचं सुरवातीपासून काळजी घेणे आवश्यक असते.
योग्य आहार घ्या –
प्रेग्नन्सीमध्ये आहाराचे खूप महत्त्व असते. तुम्ही कोणता आहार घेता याचा परिणाम हा गरोदरपण, गर्भाची वाढ आणि डिलिव्हरी यावर होत असतो. त्यामुळे गर्भावस्थेत पोषक आहार घेणे आवश्यक असते. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, मोसमी फळे, धान्ये व कडधान्ये, दूध, सुखामेवा, मांस, मासे अंडी यांचा समावेश प्रामुख्याने असावा.
या आहारामुळे गर्भ आणि गर्भिणीला फायबर्स, लोह, व्हिटॅमिन्स असे उपयुक्त पोषकघटक मिळत असतात. योग्य आहाराने आईची प्रकृती सुदृढ बनते, त्यामुळे ती प्रसुतीवेदना सहज सहन करू शकते. अशाप्रकारे योग्य आहार घेतल्याने नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते.
चुकीच्या आहारापासून दूर राहा –
चुकीचा आहार म्हणजे तेलकट, तुपकट पदार्थ, मिठाई, केक, चॉकलेट, बेकरी प्रोडक्ट, चरबीचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, खारट पदार्थ गरोदरपणात वारंवार खाणे टाळावे. कारण अशा पदार्थांमुळे प्रेग्नन्सीत अनावश्यक वजन वाढत असते.
तसेच अशा चुकीच्या आहारामुळे गरोदरपणातील मधुमेह होणे, उच्च रक्तदाब समस्या होणे, पायावर सूज येणे, वजन जास्त वाढणे असे त्रास होतात. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होणे कठीण बनते. त्यामुळे जर आपली नॉर्मल डिलिव्हरी व्हावी अशी इच्छा असल्यास अशा चुकीच्या आहारापासून दूर राहणे गरजेचे असते.
नियमित व्यायाम करा –
सारखी विश्रांती घेण्यासाठी गरोदरपण हा काही आजार नाही. गरोदरपणातही योग्य तो व्यायाम करणे आवश्यक असते. यासाठी गरोदरपण सुरू झाल्यावर आपल्या डॉक्टरांकडून व्यायाम करण्याविषयी माहिती जाणून घ्यावी व त्यांच्या सूचनेनुसार हळूहळू व्यायाम करावा. प्रेग्नन्सीमध्ये चालण्यास जावे, प्रेग्नन्सीतील सोपी योगासने करावीत.
व्यायामामुळे मांसपेशी बळकट होतात. बळकट झालेले स्नायू प्रसुती कळा सहन करू शकतात. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते. तसेच दीर्घ श्वास घेण्याचा व्यायामही करावा. यासाठी आपले डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे आणि दीर्घ श्वास घ्यावा.
तणावापासून दूर रहा –
गरोदरपणात मानसिक ताण-तणावापासून दूर राहावे. कारण तणावामुळे गर्भावस्थेत शरीरातील ऑक्सिटोसिन हार्मोन्स कमी होत असते. नैसर्गिक प्रसुती होण्यासाठी हे हार्मोन उपयोगी असते. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी व्हावे असे वाटत असल्यास तणावापासून दूर राहावे.
Read Marathi language article about Tips for Normal Delivery. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.