नवजात बाळाची कावीळ (Newborn Jaundice) :
बहुतेक बाळांना जन्माच्या वेळी कावीळ झालेली आढळते. साधारणपणे 10 पैकी 6 नवजात बाळांना कावीळ होत असते. असे असले तरीही जेमतेमचं बाळांना उपचाराची आवश्यकता भासते. तर इतर अनेक बाळांची कावीळ दोन ते तीन आठवड्यांत आपोआप बरी होत असते. कावीळ झाल्याने बाळाची त्वचा आणि डोळे पिवळसर होतात. बाळाच्या शरीरात बिलीरुबिनचे प्रमाण अधिक वाढल्याने कावीळ होत असते.
लहान बाळाला झालेली कावीळ ही नॉर्मल आहे की धोकादायक आहे ते कसे समजते..?
नवजात बाळाला झालेली कावीळ नॉर्मल असल्यास ती 2 ते 3 आठवड्यांत म्हणजे दहा ते पंधरा दिवसात आपोआप कमी होते. मात्र जर 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ कावीळ नवजात बाळाला असल्यास ते काळजीचे कारण होऊ शकते. तसेच रक्तातील बिलीरुबीनचे प्रमाण तपासूनही कावीळ कावीळ नॉर्मल आहे की नाही ते ओळखता येते.
सामान्यत: बाळाच्या जन्मानंतर 24 तासांनंतर कावीळ झाल्याचे दिसून येते. त्यानंतर पुढील तिसर्या किंवा चौथ्या दिवशी काविळीचे प्रमाण (बिलीरुबीनची पातळी) अधिक वाढलेले आढळते. बिलीरुबीनचे प्रमाण 15 mg/dl पेक्षा अधिक झाल्यास उपचार सुरू करणे आवश्यक असते. कारण बिलीरुबीनचे प्रमाण 18 ते 20 mg/dl पर्यंत पोहोचल्यास मेंदूसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे बहिरेपणा किंवा सेरेब्रल पाल्सी होण्याचाही धोका वाढतो.
नवजात बाळामध्ये कावीळ होण्याचे कारणे :
नवजात बाळाचे यकृत व्यवस्थित विकसित झाले नसल्याने बिलीरुबिनचे फिल्टर न झाल्यामुळे बाळाच्या रक्तात बिलिरुबीनचे प्रमाण वाढते व त्यामुळे बाळाला कावीळ होते. याशिवाय वेळेपूर्वी बाळाचा जन्म होणे (प्रिमॅच्युअर), आई आणि बाळाचा रक्तगट वेगवेगळा असणे, बाळाला इन्फेक्शन होणे अशा अनेक कारणांनी बाळाला कावीळ होत असते.
बाळाला कावीळ झाल्यास अशी लक्षणे दिसतात :
बाळास कावीळ होण्याचे पहिले लक्षण म्हणजे बाळाच्या शरीरावर पिवळेपणा दिसून येऊ लागतो. चेहरा, छाती, पोट, हात आणि पाय पिवळसर होतात. तसेच कावीळ झाल्यावर बाळाच्या डोळ्यातील पांढरा भागही पिवळसर होतो. याशिवाय बाळास ताप येणे, बाळ अशक्त वाटणे अशी लक्षणेही असू शकतात. कावीळ झालेले बाळ शी व शु कमी करते व दूधही कमी पीत असते.
बाळाच्या काविळवर असे उपचार करतात :
फोटोथेरपी –
नवजात बाळामध्ये होणाऱ्या कावीळसाठी फोटोथेरपी ही एक प्रसिद्ध पद्धत आहे. या थेरपी दरम्यान, बाळाला बेडवर एका प्रकाशाखाली ठेवले जाते. बाळाला तीन-चार तास या निळ्या-पांढऱ्या लाईटखाली ठेवल्यानंतर बाळाला आराम देण्यासाठी अर्धा तास ही प्रक्रिया थांबविली जाते. या अर्ध्या तासात आई बाळाला स्तनपान करू शकते. स्तनपानामुळे बाळ हायड्रेटेड झाले की पुन्हा तीन ते चार तासांसाठी लाईटखाली बाळाला ठेवले जाते. यामुळे बाळाची कावीळ दोन-तीन दिवसांत हळूहळू कमी होऊ लागते.
मात्र काविळीचे प्रमाण जास्त असल्यास किंवा फोटोथेरपी करूनही कावीळ कमी होत नसल्यास, बाळाच्या शरीरातील संपूर्ण रक्त बदलण्यात येते. मात्र बहुतांश बाळांना झालेली कावीळ ही फोटोथेरपीने बरी होत असते.
Read Marathi language article about Newborn Jaundice causes, symptoms & treatment. Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.