नवजात शिशु (Newborn baby care) :
नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास तीन ते पाच दिवसात हॉस्पिटलमधून नवजात बाळ व बाळंतीण घरी पाठवले जाते. तर सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास साधारणपणे आठवड्याभरात नवजात बाळ व बाळंतीण घरी येत असतात. हॉस्पिटलमधून नवजात बाळ घरी आल्यावर त्याची विशेष काळजी व देखभाल घेणे आवश्यक असते.
नवजात बाळाची काळजी अशी घ्यावी :
नवजात बाळाचा सांभाळ करणाऱ्यांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. जेणेकरून बाळाला इन्फेक्शन होणार नाही. नवजात बाळाला रोज कोमट पाण्याने अंघोळ घालावी. बाळाला अंघोळ घालताना बाळाची नाळ साबणाने व पाण्याने धुऊन स्वच्छ करावी. बाळाला सहा महिने होईपर्यंत केवळ आईचे दूध पाजावे. अशी
स्वच्छतेची काळजी –
नवजात बाळाला पहिल्या महिन्यात जंतुसंसर्गाचा (इन्फेक्शनचा) सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे नवजात बाळाचा सांभाळ करणाऱ्यांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. बाळाला इन्फेक्शन होण्याचा धोका असल्याने बाळाला पाहण्यासाठी पै-पाहुण्यांनी जाऊ नये. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींनी साबणाने हात स्वच्छ धुवूनचं बाळाला हाताळावे. आजारी व्यक्तींनी बाळाजवळ जाणे टाळावे.
अंघोळीच्यावेळी घ्यायची काळजी –
नवजात शिशूला रोज कोमट पाण्याने अंघोळ घालावी. बाळाच्या आंघोळीसाठी कुठलाही सौम्य साबण (Baby Soap) वापरू शकता. मात्र हळद, चणाडाळ वैगेरे वापरू नये. त्यामुळे बाळाच्या त्वचेवर अॅलर्जी व पुरळ येऊ शकतात. अंघोळीच्यावेळी बाळाच्या अंगावरील लव काढण्याचा प्रयत्न करू नये. ही लव आपोआप हळूहळू निघून जात असते.
आंघोळीच्या वेळी हळुवार बाळाची नाळ आणि बेंबी साबणाने व पाण्याने धुऊन स्वच्छ करावी. त्यावर कोणतीही पावडर किंवा क्रीम लावू नये. आंघोळीनंतर बाळास स्वच्छ व मऊ टॉवेलने सावकाश पुसून घ्यावे व बाळास स्वच्छ व सुती कपडे घालावेत.
बाळाच्या कानात, नाकात, बेंबीत तेल घालू नये. तसेच बाळाच्या डोळ्यात काजळ घालू नये. नवजात बाळामध्ये काजळ वापरणे हानिकारक असते. याशिवाय बाळाच्या टाळूवर जोरजोरात तेल थापणेही टाळावे. बाळाची टाळू साधारण 18 महिन्यात आपोआप भरून येत असते. टाळूवर तेल घालण्याची गरज नसते
आहाराच्या बाबतीत घ्यायची काळजी –
नवजात बालकाचा सुरवातीचा आहार म्हणजे आईचे दूध हेचं असते. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाला स्तनपान करावे. नवजात बाळास दुसरा कोणताही आहार देऊ नये. त्यामुळे नवजात बाळास पाणी, ग्राईप वॉटर, ग्लुकोजचे पाणी, फळांचा रस, गुटी वैगरे काहीही देऊ नये.
नवजात बाळातील काही सामान्य बाबी :
नवजात शिशु हा मूलगा असो किंवा मुलगी असो त्याच्या स्तनातून काहीवेळा दूध येत असते. हे दूध पिळून बाहेर काढू नये. असे केल्यास बाळाच्या दुग्धग्रंथी आणखी वाढतात व त्यात पू तयार होऊन इन्फेक्शनचा धोका असतो. तसेच बालिकांच्या बाबतीत एक ते दोन दिवस योनीमार्गातून रक्तस्राव किंवा चिकट पदार्थ बाहेर येण्याची शक्यता असते. असे स्त्राव येत असल्यास पालकांनी काळजी करू नये कारण ही सामान्य बाब असते.
काहीवेळा पहिल्या दोन तीन दिवसामध्ये बाळास सर्दी होणे किंवा उलट्या होणे हे सुद्धा नॉर्मलच असते. तसेच दुध पित असताना किंवा पिऊन झाल्यावर काही बालके शी करतात. यावेळीही काळजी करण्याचे कारण नसते. तसेच काही जन्मानंतर बाळाची बेंबी फुगणे ही सामान्य बाब आहे. पण जर बेंबीतून दुर्गंधीयुक्त पू किंवा स्त्राव येत असल्यास त्यावर उपचार होणे आवश्यक असते.
तसेच जन्मल्यानंतर बाळाला कावीळ होणे हे सुद्धा एक नॉर्मल बाब असते. साधारण 2 ते 3 आठवड्यांत म्हणजे दहा ते पंधरा दिवसात आपोआप ती कावीळ कमी होते. मात्र जर 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ कावीळ नवजात बाळाला असल्यास त्यावर उपचार होणे आवश्यक असते.
हे सुद्धा वाचा..
नवजात बाळाला कोणता आहार द्यावा ते जाणून घ्या.
Read Marathi language article about After birth Newborn baby care tips. Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.