प्रसुतीच्या कळा :
प्रेग्नन्सीचा कालावधी साधारण 40 आठवड्यात पूर्ण होतो. यादरम्यान प्रसूतीच्या कळा सुरू होतात. बहुतांशवेळा प्रसुतीच्या कळा ह्या 37 ते 42 आठवड्यात आपोआप सुरू होतात. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेली प्रसूतीची निर्धारित तारीख होऊन गेली याविषयी चिंता करू नये.
मात्र जर 42 आठवड्यांपेक्षा अधिक दिवस होऊनही प्रसुती कळा येत नसतील तर त्याला विलंबित प्रसुती (Delayed labor) असे म्हणतात. अशावेळी दवाखान्यात दाखल होणे आवश्यक असते. याशिवाय बाळंतपणाच्या कळा सुरू होण्यासाठी खाली काही नैसर्गिक उपाय दिले आहेत. हे उपाय नैसर्गिक असले तरीही यातील कोणताही उपाय वापरण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
प्रसुती कळा सुरू होण्यासाठी उपाय :
फेरफटका मारणे..
डिलिव्हरीच्या कळा सुरू होण्यासाठी चालणे हे खूप उपयुक्त ठरते. चालण्याने गर्भाशयातील बाळाच्या डोक्याचा दाब सर्विक्सवर पडत असतो त्यामुळे प्रसुती कळा सुरू होण्यासाठी मदत होते. तसेच गुरुत्वाकर्षणमुळे बाळ खाली ओटीपोटाकडे सरकते.
अननस खावे..
अननसमध्ये असणाऱ्या ब्रोमेलियाड या एंजाइममुळे गर्भाशयाचे मुख मऊ होते व प्रसुती कळा सुरू होण्यास मदत होते. यासाठी ताजे अननस खावेत.
केळे खावे..
केळ्यात मुबलक प्रमाणात पोटॅशियमचे प्रमाण असते. पोटॅशियममुळे गर्भाशयाच्या स्नायूंचे आकुंचन होण्यासाठी मदत होते. त्यामुळे प्रसुतीच्या वेदना सुरू होण्यासाठी केळे खाणे उपयोगी पडू शकेल.
आपल्या निप्पलला उत्तेजित करा..
आपल्या स्तनाग्रांना (निप्पलला) बोटांनी हळुवार मसाज करावा. यामुळे निप्पल उत्तेजित होऊन आॅक्सीटॉसिन हॉर्मोन रिलीज होतो. यामुळे लेबर पेन सुरू होण्यास मदत होते.
मसालेदार आहार घ्या..
प्रसुती कळा सुरू होण्यासाठी बहुतेकवेळा मसालेदार पदार्थ खाण्यास सांगितले जाते. मसाल्यामुळे पोटात उत्तेजना निर्माण होऊन प्रसुतीच्या वेदना सुरू होण्यास मदत होऊ शकते. मात्र मसाल्यामुळे पोटात जळजळ होण्याची, पोट बिघडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.
एरंडेल तेल..
एरंडेल तेल सारक गुणांचे असते. त्यामुळे पोट साफ होत नसल्यास ते उपयोगी पडत असते. तसेच त्यामुळे पोट उत्तेजित होत असल्याने प्रसूतीच्या वेदना सुरू होण्यासाठी एरंडेल तेल घेण्याचा अनेकजण सल्ला देत असतात. मात्र एरंडेल तेल घेतल्यास प्रसूतीच्यावेळी अतिसार (डायरिया) होऊ शकतो. त्यामुळे याचा उपयोग आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं करावा.
Read Marathi language article about Labour induction – How to start labour pain naturally? Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.