गर्भावस्थेतील लक्षणे :
गर्भावस्थेत स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होत असतात. प्रामुख्याने गर्भावस्थेतील हार्मोन्समधील बदलांमुळे असे घडत असते. एकाद्या स्त्रीमध्ये गर्भावस्था सुरू झाल्यावर कोणकोणती लक्षणे जाणवू शकतात याविषयी माहिती येथे दिली आहे.
गर्भावस्था सुरू झाल्याची अशी असतात लक्षणे..
1) मासिक पाळी येणे थांबणे..
दर महिन्याला नियमित येणारी मासिक पाळी येणे थांबणे हे गर्भावस्था सुरू झाल्याचे मुख्य लक्षण असते. एखादी स्त्री गर्भवती होताच तिच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोन तयार होऊ लागते. या हार्मोनमुळे मासिक पाळी थांबते.
2) मूड स्विंग..
गर्भावस्था सुरू झाल्यावर त्या स्त्रीच्या शरीरात होणार्या हार्मोनल बदलांमुळे तिची मनःस्थिती सतत बदल असते. काहीवेळा तिला उदास वाटत असते, आळस येऊ शकतो किंवा आनंदही वाटू शकतो.
3) स्तनांमध्ये बदल जाणवतो..
गर्भावस्थेमुळे स्त्रीच्या स्तनामध्ये जडपणा जाणवू शकतो. तसेच तेथे सूज व वेदनाही होत असते. निप्पलचा भाग अधिक गडद झाल्याचे जाणवते.
4) थकवा जाणवणे..
गर्भावस्थेत सुरवातीच्या काळात स्त्रीला काहीही न करता थकल्यासारखे वाटू शकते. या वेळी तिला झोपेचाही त्रास होऊ शकतो.
5) वारंवार लघवीला होणे..
गर्भावस्थेमध्ये शरीरातील प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे, वारंवार लघवला होऊ शकते.
6) सकाळी उठल्यावर मळमळणे..
गर्भावस्था सुरू झाल्यास मळमळ, उलट्या आणि चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते. हा त्रास पाहिले तीन महिने जास्त होऊ शकतो.
7) बद्धकोष्ठता..
गर्भावस्थेतील प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या पातळीत वाढ झाल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते.
8) ओटीपोटात वेदना होणे..
गर्भावस्थेच्या सुरवातीच्या काळात गर्भाशयात गर्भ रोपण होत असते. यामुळे ओटीपोटात दुखण्याची तक्रार होऊ शकते. तसेच हलका रक्तस्रावही होऊ शकतो.
साधारणपणे वरील लक्षणे गर्भावस्थेची असतात. जर एखाद्या स्त्रीच्या शरीरात वरील लक्षणे जाणवत असतील तर लवकरात लवकर गर्भधारणा चाचणी करून घ्यावी. गर्भावस्था आहे की नाही याची चाचणी ती महिला स्वतःदेखील करू शकते किंवा डॉक्टरांद्वारे तपासणी करून याविषयी पुष्टी केली जाऊ शकते.
Last Medically Reviewed on February 27, 2024 By Dr. Satish Upalkar.