गर्भधारणेचा चौथा महिना (Pregnancy 4th Month) :
गरोदरपणाच्या सुरवातीच्या तीन महिन्यात मळमळ आणि उलट्या हे त्रास अधिक होत असतात. चौथ्या महिन्यानंतर हे त्रास कमी होतात. या महिन्यापासून प्रेग्नन्सीचे दुसरे त्रैमासिक (2nd Trimester) सुरु होते. दुसरे त्रैमासिक हे 4 ते 6 महिन्यांचे असते.
एकूण गर्भावस्थेचा काळ हा साधारण 40 आठवड्यांचा असतो. त्यापैकीचौथा महिना हा 14 ते 17 व्या आठवड्यापर्यंत असतो. याठिकाणी गरोदर महिलेमध्ये चौथ्या महिन्यात कोणती लक्षणे असतात, गर्भाची वाढ या महिन्यात कशी झालेली असते, या महिन्यात आहार कसा असावा, कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती येथे दिली आहे.
चार महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे :
गरोदरपणाचा चौथा महिना चालू झाल्यावर सुरुवातीच्या काळात होणारे त्रास, जसे की मळमळ, उलट्या इत्यादी कमी होतात. त्यामुळे एकप्रकारे उत्साह वाटत असतो. तसेच या काळात छातीत जळजळ होणे, भूक वाढणे, अपचन व बद्धकोष्ठता होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यात आईच्या शरीरात होणारे बदल –
चौथ्या महिन्यात स्तनांची वाढ होऊन स्तन अधिक पुष्ट होत असतात. त्यामुळे स्तनांच्या ठिकाणी थोडे जड वाटू लागते. निप्पलभोवतीचा भाग गडद होतो.
त्वचेत बदल जाणवू लागतो. या काळात इस्ट्रोजेन हार्मोनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे तुमच्या त्वचेवर खूप परिणाम होतो. पोटाच्या त्वचेवर गडद रेषा दिसतात. उन्हात फिरल्यास त्रास जास्त होऊ शकतो. यासाठी सनस्क्रीनचा वापर करू शकता.
इस्ट्रोजेन हार्मोन्समुळे, गर्भधारणेच्या चौथ्या महिन्यात नाकावर सूज येऊन नाकातही रक्तस्त्राव होऊ शकतो.
या काळात पोट साफ न होण्याची समस्या वाढीस लागू शकते. यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक असते.
गरोदरपणातील चौथ्या महिन्यात होणारी बाळाची वाढ आणि आकार :
या महिन्यात गर्भाची त्वचा अद्यापही पातळ असते, परंतु हाडे ठोस आकार घेत असतात. तसेच या महिन्यात डोके, भुवया आणि पापण्यांचे केस येऊ लागतात. गर्भाचे कान वाढू लागतात. तसेच या काळात आपणास बाळाची थोडीफार हालचाल जाणवू शकते.
याकाळात गर्भाशयातल्या बाळाची लांबी सुमारे सहा इंच असते आणि त्याचा आकार मोठ्या संत्र्याच्या आकाराइतका असतो. तर बाळाचे वजन 113 ग्रॅम इतके असू शकते. या महिन्यात बाळाच्या विविध अवयवांची निर्मिती होत असते. अवयवांच्या निर्मितीमध्ये काही दोष आहेत का ते पाहण्यासाठी या महिन्याच्या शेवटी एकदा सोनोग्राफी केली जाते.
गरोदरपणाचा चौथा महिना आणि आहार :
गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यातील आहार :
प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यात आपल्या पोटातील बाळ अधिक वेगाने विकसित होत असल्याने या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी चौथ्या महिन्यात गर्भवतींनी काय खावे आणि काय खाऊ नये, कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती खाली दिली आहे.
गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यातील आहार असा असावा –
चौथ्या महिन्यानंतर बाळाची वाढ वेगाने होत असते. अशावेळी गरोदर स्त्रीने योग्य व सकस आहार घेणे आवश्यक असते. यासाठी आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, हंगामी फळे, धान्य, कडधान्ये, सुखामेवा, मांस, मासे, अंडी यांचा समावेश करावा.
दिवसातून तीन ते चार वेळा थोडाथोडा आहार घ्यावा. यामुळे सहजरीत्या अन्नाचे पोषण होते व अपचनाचा त्रास होत नाही. या महिन्यानंतर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यासाठी आहारात फायबर्सयुक्त पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्य, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश असणे आवश्यक असते. तसेच दिवसभरात 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाणीही वरचेवर थोडेथोडे पीत राहावे.
प्रेग्नन्सीच्या 4थ्या महिन्यात काय खाणे टाळावे..?
बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. तसेच वारंवार तेलकट, मसालेदार, खारट पदार्थ, मैद्याचे पदार्थ, गोड मिठाईचे पदार्थ खाणे टाळावे.
प्रेग्नन्सीचा चौथा महिना आणि व्यायाम :
गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यात असा करावा व्यायाम.
गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यात असा करा व्यायाम..
गरोदरपणात व्यायाम करणे हे गर्भवती आणि बाळासाठी फायदेशीर असते. यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण कोणता व्यायाम करू शकता याविषयी माहिती जाणून घ्या व त्यानुसार व्यायाम सुरू करा.
गरोदरपणात चौथ्या महिन्यात आपण चालण्याचा व्यायाम करू शकता. चालणे हा एक सुरक्षित असा व्यायामप्रकार आहे. यासाठी आपण सकाळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत 10 त 15 मिनिटे फिरण्यास जाऊ शकता.
गर्भधारणेचा चौथा महिना आणि वैद्यकीय तपासण्या :
चौथ्या महिन्यात गरोदर स्त्रीने ह्या तपासण्या करून घ्याव्यात.
गरोदरपणात वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक असते, जेणेकरून काही अडचण असल्यास त्यावर वेळेत उपचार केले जाऊ शकतात. तसेच तापसणीमुळे बाळाची योग्य वाढ होत आहे की नाही ते कळण्यास मदत होत असते. चौथ्या महिन्यात प्रामुख्याने खालील तपासण्या करू शकतात.
- गर्भवतीचे वजन
- ब्लडप्रेशर (रक्तदाब)
- लघवीतील साखर आणि प्रथिने यांचे प्रमाण तपासण्यासाठी लघवीची चाचणी
- अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी
- अल्फा-फेट्रोप्रोटीन (एएफपी) चाचणी.
अशा विविध टेस्ट व तपासणी या महिन्यात करू शकतात.
अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी –
साधारण चौथ्या महिन्यानंतर एकदा अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करावी लागते. यामध्ये गर्भाच्या अवयवांची तपासणी केली जाते. तसेच प्लेसेंटाची स्थिती तपासली जाते.
प्रेग्नन्सीमध्ये चौथ्या महिन्यात अशी घ्यावी काळजी :
- जड वस्तू उचलणे किंवा ढकलणे टाळावे,
- सुती व सैलसर कपडे वापरा,
- थकवा जाणवल्यास पुरेशी विश्रांती घ्यावी,
- शक्यतो डाव्या कुशीवर झोप घ्या,
- लांबचा प्रवास टाळावा,
- मानसिक ताण आणि दगदग टाळा,
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका,
- टी.टी.चे पाहिले इंजेक्शन चौथ्या महिन्यात घेऊ शकता,
- डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
हे सुध्दा वाचा – गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात घ्यायची काळजी.
Read Marathi language article about Fourth month Pregnancy Symptoms, care tips andDiet plan. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.