बाळाच्या जन्मानंतर सुरवातीच्या काही महिन्यांपर्यंत बाळाच्या मानेला आधार देण्याची गरज असते. नवजात बाळाच्या मानेचे स्नायू हे खूप कमकुवत असतात. त्यामुळे पहिल्या काही महिन्यांपर्यंत बाळाला उचलून घेताना खूप काळजी घ्यावी लागते. अशावेळी आपल्या हाताने बाळाच्या डोक्याला आधार देणे आवश्यक असते.
बाळाला आपले डोके तोलता येण्यासाठी त्याची मान धरणे आवश्यक असते. बाळाची हळूहळू जसजशी वाढ होईल तसे मानेचे स्नायू मजबूत होत असतात आणि बाळाची मान धरत असते. बाळ कोणत्या महिन्यात आपले डोके व मान आधाराशिवाय वर उचलू किंवा तोलू शकते याची माहिती येथे दिली आहे.
लहान बाळाची मान कधी व कोणत्या महिन्यात धरते..?
साधारण सहा महिन्यांपर्यंत, आपल्या बाळाच्या मानेचे स्नायू मजबूत होत असतात. त्यामुळे बाळ आपले डोके वर करू शकते व मान वळवून बाजूला पाहू शकते.
पहिल्या दोन महिन्यात मानेचे स्नायू खूपच कमकुवत असतात. दुसऱ्या महिन्यात बाळास काहीवेळ पोटावर झोपवावे. त्यामुळे बाळ आपले डोके हळूहळू वर करण्याचा प्रयत्न करत असते.
तीन ते चार महिन्यात बाळाच्या मानेचे स्नायू लक्षणीयरित्या सुधारलेले असतात. यावेळी बाळाला पोटावर झोपवल्यावर ते आपले डोके हळूहळू वर उचलून स्थिर ठेऊ शकते.
पाच ते सहा महिने वयापर्यंत, मानेच्या मांसपेशी मजबूत झालेल्या असतात त्यामुळे ते डोक्याचा भार सहज पेलू शकतात. या काळात आपले बाळ आपले डोके योग्यरीत्या वर करते व स्थिर ठेवत असते. अशाप्रकारे बाळाची मान सहा महिन्यापर्यंत धरत असते.
बाळाने आपले डोके वर उचलावे हे शिकवण्यासाठी काय करावे..?
दुसऱ्या महिन्यापासून बाळाला काहीवेळ पोटावर झोपवावे व त्याच्यासमोर रंगीबेरंगी खेळणी ठेवावीत. त्यामुळे ते डोके हळूहळू वर करण्याचा प्रयत्न करते. छाती व डोके वर करण्यासाठी ते आपल्या बाहूंचाही वापर करू लागते. अशाप्रकारे बाळाचे पाठ, मान, हात आणि पायाचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे हळूहळू बाळ डोके वर करण्यास शिकत असते.
बाळाची मान मजबूत झाल्यावर बाळ पुढे काय शिकते..?
अशाप्रकारे सहाव्या महिन्यात बाळाची मान धरल्यानंतर म्हणजे बाळ आपले डोके स्थिर ठेवण्यास शिकल्यानंतर ते थोड्या दिवसात पालथे व्हायला शिकत असते. बाळ कोणत्या महिन्यात पालथे होण्यास शिकते ते जाणून घ्या..
Read Marathi language article about which month baby hold his neck? Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.