बाळ दुसऱ्या बाजूवर कोणत्या महिन्यात पलटी होते ते जाणून घ्या – When do baby roll over in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

बाळाची मान धरल्यावर म्हणजे बाळाने आपले डोके वर उचलण्याची, डोके स्थिर ठेवण्याची क्षमता विकसित केल्यानंतर बाळ पालथे होण्यास शिकत असते.

बाळ पालथे होणे (babies roll over) :

जर बाळास पाठीवर झोपवल्यास ते स्वतःच्या स्वतः बाजूला वळून पोटावर झोपू शकते. तसेच ते पोटावर झोपल्यास ते वळून पाठीवर झोपू शकते. याला बाळ पालथे किंवा पलटी होण्यास शिकले असे म्हणतात. बाळाच्या विकासामधील पालथे होण्यास शिकणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. यातूनच पुढे ते बसण्यास शिकत असते.

कितव्या महिन्यात बाळ पालथे पडत असते ..?

सहा महिन्यापर्यंत बाळाची मान धरत असते. त्यानंतर साधारणपणे सातव्या महिन्यापर्यंत बाळ पालथे होण्यास शिकू शकते. काही बालके याआधीही पालथे होण्यास शिकू शकतात.

पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यात बाळाचे स्नायू कमकुवत असतात. दुसऱ्या महिन्यापासून बाळाला काही मिनिटे खेळण्यासाठी पोटावर झोपवावे. त्याच्यासमोर वेगवेगळी खेळणी ठेवावीत. यामुळे ते हळूहळू आपली मान वर करू लागते. तसेच त्याच्या पोटाजवळील मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

तीन ते चार महिन्यात बाळ पोटावर झोपवल्यास ते हातांच्या साहाय्याने हळूहळू डोके वर उचलू लागते, आपले हात, पाय हलवू लागते. आजूबाजूला होण्याचा प्रयत्न करत असते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

पाच ते सात महिन्यात आपले बाळ पोटावर झोपवल्यास मान वर करू लागते, डोके स्थिर ठेवू लागते तसेच ते पालथे होण्यासही शिकलेले असते. त्याला पोटावर झोपवल्यास ते पालथे होऊन पाठीवर येत असते. तर पाठीवर झोपवल्यास ते पालथे होऊन पोटावर येत असते.

बाळाला पलटी होण्यास शिकवण्यासाठी काय करावे..?

दुसऱ्या महिन्यानंतर बाळाला काहीवेळ पोटावर झोपवावे. त्याच्यासमोर रंगीबेरंगी खेळणी ठेवावीत. त्यामुळे ते डोके हळूहळू वर करण्याचा प्रयत्न करते. छाती व डोके वर करण्यासाठी ते आपल्या बाहूंचाही वापर करू लागते. अशाप्रकारे बाळाचे पाठ, मान, हात आणि पायाचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे हळूहळू बाळ डोके वर करणे व बाळ पालथी होण्यासही शिकत असते.

पालथे होण्यास शिकल्यानंतर बाळ पुढे कोणती क्रिया करण्यास शिकते..?

पालथे होण्यास शिकत असताना आपल्या बाळाचे मान, पाठ, हात आणि पायाचे स्नायू मजबूत झालेले असतात. यामुळे बाळ पुढे आधाराने बसण्यास शिकू लागते. बाळ कोणत्या महिन्यात बसण्यास शिकते ते जाणून घ्या..

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.