स्वमग्नता (Autism) :
आज लहान मुलांच्या विविध आजारात ऑटिझमचे प्रमाण वाढत आहे. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. स्वत:मध्येच गुंतून असणे असे या स्वमग्न मुलांची वर्तणूक असते. हा एक न्यूरो-डेवलपमेंटल डिसऑर्डर असून ऑटिझममुळे मुलांच्या मनोबौद्धिक विकासात अनेकदा अडथळे निर्माण होतात. या आजारास Autism spectrum disorder (ASD) या नावाने ओळखले जाते.
ऑटिझम आजार असणाऱ्या किंवा स्वत:मध्येच मग्न असणाऱ्या मुलांची वाढती संख्या ही चिंतनीय बाब ठरत आहे. एका पाहणीनुसार आपल्या देशात दर हजारामागे सरासरी सात मुले अशी आढळून येत आहेत. याबाबत पालकांनी जागरूक राहून अशा मुलांच्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे. मुलींपेक्षा मुलांमध्ये ऑटिझमचे प्रमाण जास्त आहे. मुलांमध्ये 75 टक्के तर मुलींमध्ये 25 टक्के प्रमाण या आजाराचे असते.
ऑटिझम आजाराविषयी आजही आपल्या समाजामध्ये पुरेशी माहिती किंवा जागृती झालेली नाही. यासाठीचं जागतिक आरोग्य संघटनेने ऑटिझमविषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी, ऑटिझमविषयी असणारे गैरसमज दूर व्हावेत म्हणून 2 एप्रिल हा दिवस ‘जागतिक ऑटिझम दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
साधारणपणे एक ते तीन वर्षे वयातील मुलांमध्ये ऑटिझमची लक्षणे स्पष्टपणे दिसत असतात. सामान्य आणि ऑटिस्टीक मुले यांच्यातील फरक सुरवातीला जाणवणे कठीणच असते. अशा मुलांचे हावभाव, त्यांचे वागणे हे वेगळ्या प्रकारचे असते. एकाच प्रकारचे कपडे घालणे, एकाच प्रकारचे खाणे अशी कृती करतात. ही मुले अत्यंत आक्रमक असू शकतात. एखादी वस्तू विशिष्ठ पध्दतीनेच लावणे हे त्यांच्यात रूजलेले असते. इतर कोणताही बदल झाला की ती प्रचंड चिडतात. आपल्याच विचारात मग्न असणे अशी काही लक्षणे त्यांमध्ये असू शकतात.
ऑटिझमची काही लक्षणे (Symptoms of autism) :
• अशा मुलांना हाक मारल्यास त्या हाकेला प्रतिसाद न देणे. विचारलेली उत्तरे देत नाहीत, आपले बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे करतात.
• अशी मुले दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्यास घाबरतात.
• एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. नेहमी तोच-तोच खेळ खेळायला त्यांना आवडते. दररोज ठरलेलीचं कामे करतात. त्यांना बदल केलेला आवडत नाही.
• असंबद्ध बडबड करणे, पुन्हा पुन्हा तेच शब्द बोलत राहणे.
• तीन वर्षे पुरे होऊनही अशी मुले अर्थपूर्ण शब्द बोलू शकत नाहीत.
• अजिबात न बोलणे.
• वारंवार सूचना द्याव्या लागणे.
• संवादात अडथळे असणे.
• अशी मुले एकटी राहण्यास प्राधान्य देतात, इतर लहान मुलांमध्ये मिसळून न खेळणे.
सामान्य मुलांच्या तुलनेने ह्या मुलांचा विकास खूप मंद असतो.
ऑटिझमची कारणे (Autism causes) :
ऑटिझमचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. हा आजार होण्यासाठी विशेषतः आनुवांशिकता आणि जेनेटिक फॅक्टर हे प्रमुख कारण असते.
याशिवाय 26 आठवडे होण्यापूर्वीचं बाळंतपण झाल्यास, कमी वजनाचे बाळ, गर्भावस्थेत झालेल्या गंभीर समस्या, गरोदर स्त्रीचे वय अधिक असल्यास, ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, मेंदूतील संसर्ग किंवा व्हॅलप्रोइक ऍसिड व थालीडोमाइड अशी औषधे प्रेग्नन्सीत घेणे अशी अनेक करणे बाळाला ऑटिझम होण्यासाठी जबाबदार ठरू शकतात.
ऑटिझमवर हे आहेत उपचार (Autism treatments) :
ऑटीझम हा औषध उपचारांनी पुर्णपणे बरा करता येत नाही. उपचाराच्या मदतीने ऑटिझमसह मुलांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठीचे उपयुक्त उपाययोजना करता येऊ शकतात. त्यामुळे जर वर दिलेली लक्षणे मुलामध्ये दिसत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
यासाठी ऑटिझमवर उपचारामध्ये स्क्रीनिंग टूल (screening tools), बिहेवियर प्रोग्राम (behaviour therapy), ऑक्युपेशनल थेरपी (occupational therapy), प्ले थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच अॅण्ड लँग्वेज थेरपी आणि औषधे यांचा वापर करून या मुलांमध्ये आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रेरित केले जाते.
ऑटिझम व्यक्तींसाठी असा असावा आहार :
ऑटिझम असलेल्या व्यक्तींसाठी कोणताही विशिष्ट असा आहार द्यावा याचे बंधन नाही. आपण जो आहार खातो तो आहार त्यांच्यासाठीही योग्य असतो. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे, सुखामेवा, दूध व दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी, चिकन असा व्हिटॅमिन्स, खनिजे व प्रोटिन्सयुक्त पदार्थ यांचा समावेश असावा.
मात्र चरबी वाढवणारे पदार्थ व ग्लूटेनयुक्त पदार्थ देणे टाळावे. गहू, बार्ली अशा धान्यांमध्ये ग्लूटेन प्रथिने आढळतात.
ऑटिजम आणि व्यायाम :
ऑटिझम ग्रस्त मुलांना आनंद वाटणारा व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्यावे. बळजबरीने व्यायाम करून घेऊ नयेत. आपल्याबरोबर त्यांना मोकळ्या हवेत सकाळी व संध्याकाळी फिरायला घेऊन जावे. मैदानात त्यांच्याबरोबर मोठया चेंडूने खेळावे.
ऑटिस्टीक मुलाच्या पालकांची जबाबदारी..
उपचारासोबत अशा मुलांना कुटूंबाच्या प्रेम व आधाराची अत्यंत गरज असते. पालकांनी त्यांना समजून घेणे खूप गरजेचे असते कारण त्या मुलांची वागणूक ही जाणीवपूर्वक होत नसून आजारामुळे होत असते. अशी मुले सोशली अॅक्टीव्ह देखील नसतात कारण त्यांचा मेंदू त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सक्षम नसतो. त्यामुळे अशा मुलांना आपणच समजून घेऊन त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत करावी जेणेकरून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
समाजाची जबाबदारी..
समाजानेही थोडे ‘परिपक्व’ झाले पाहिजे कारण ऑटिझम मुल सांभाळणे कोणत्याही पालकांसाठी एक खूप मोठे आव्हान असते. आपला ‘समाज’ आजही ऑटिस्टीक मुले, मतिमंद, गतिमंद किंवा दिव्यांगजण यांच्याकडे कुत्सित नजरेने पाहत असतो. त्यांच्या व्यंगावर विनोद करण्यातचं ते धन्य मानत असतात. पण असे न करता समाज म्हणून आपणही त्या मुलांच्या पालकांना भावनिक आधार व प्रोत्साहन दिले पाहिजे.
Read Marathi language article about Autism spectrum disorder (ASD) symptoms, causes and treatment. Last Medically Reviewed on February 19, 2024 By Dr. Satish Upalkar.