एक महिन्यांचे बाळ :
बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याठिकाणी एक महिन्याच्या बाळाची घ्यावयाची काळजी याची माहिती दिली आहे.
एक महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची :
प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो.
बालकाचे (baby boy) चे वजन 3.4 ते 5.7 किलो आणि उंची 58 सेमी पर्यंत इतकी असू शकते.
तर बालिकेचे (baby girl) चे वजन साधारण वजन 3.2 ते 5.4 किलो असते आणि उंची सुमारे 55 सेमी पर्यंत असू शकते.
एक महिन्यांच्या बाळातील विकासाचे टप्पे :
• एक महिन्याच्या बाळास भुकेची संवेदना जाणवू लागते. त्यामुळे भूक लागल्यास ते रडू लागतात.
• बाळ पहिल्या महिन्यात हलणाऱ्या वस्तू किंवा खेळण्याकडे पाहत असते.
• आईला ओळखते.
• मूठ घट्ट आवळून घेऊ शकते.
• मोठ्या आवाजाने दचकते.
एक महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता असा असावा :
पाहिले सहा महिने नवजात बालकाचा आहार म्हणजे आईचे दूध हेचं असते. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाला स्तनपान करावे. नवजात बाळास दुसरा कोणताही आहार देऊ नये. त्यामुळे नवजात बाळास पाणी, ग्राईप वॉटर, ग्लुकोजचे पाणी, फळांचा रस, गुटी वैगरे काहीही देऊ नये.
काही परिस्थितीत बाळास आईचे दूध देता येत नसल्यास पावडरचे फॉर्म्युला दूध दिले जाते. पहिल्या महिन्यात फॉर्म्युला दूध देताना बाळाला चार ते पाच वेळा थोडे थोडे दूध दिले पाहिजे.
एक महिन्याच्या बाळाची झोप :
एक महिन्याचे बाळ दिवसभरात 15 तास झोप घेत असते. बाळाची वाढ आणि विकासासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.
एक महिन्याच्या बाळाचे लसीकरण :
बाळ जन्मल्यावर हॉस्पिटलमध्ये लगेच त्याला पोलिओ, बीसीजी आणि हेपाटिटिस-B अशा तीन लसी दिल्या जातात.
डॉक्टरांकडे कधी जावे..?
पहिल्या महिन्यात बाळास ताप, अतिसार, सर्दी, खोकला असे त्रास होऊ शकतात. अशावेळी बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे. याशिवाय,
• बाळ दूध पीत नसल्यास,
• बाळाला कावीळ झाल्यास,
• बाळाच्या नजरेसमोर धरलेल्या वस्तूंकडे बाळ लक्ष देत नासल्यास,
• आवाजाकडे लक्ष देत नसल्यास डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जावे.
Read Marathi language article about 1 month baby care tips. Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.