प्रसूतीच्या कळा – लेबर पेन्स :
गरोदरपणातील सर्वात कठीण काळ म्हणजे जेव्हा प्रसूतीच्या वेदना सुरू होतात. काही स्त्रियांना याचा त्रास थोडावेळचं होऊ शकतो तर काही स्त्रियांमध्ये प्रसव वेदनांचा त्रास बराच वेळपर्यंत होऊ शकतो. परंतु प्रत्येक गरोदरपणात स्त्रीला या प्रसुती कळा (म्हणजेच लेबर पेनमधून) जावे लागते. गर्भावस्थेचा काळ पूर्ण झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे 280 दिवस झाल्यावर प्रसूतीची प्रक्रिया आपोआप सुरू होते. याला प्रसूतीची लक्षणे असेही म्हणतात. डिलिव्हरीची प्रक्रिया सुरु झाल्याचे खालील लक्षणांवरून ओळखता येते.
बाळंतपणाची लक्षणे (Labour pain Symptoms) :
प्रसव कळातील वेदना ह्या सुरवातीला मासिक पाळीतील वेदनाप्रमाणे जाणवतात. यामुळे ओटीपोटात आणि पाठीत वेदना होऊ शकतात. जर खाली दिलेल्या लक्षणांपैकी कोणतेही लक्षण तुम्हाला प्रेग्नन्सीच्या शेवटच्या महिन्यात दिसल्यास हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी ऍडमिट व्हावे.
ओटीपोटात सारख्या कळा येणे –
प्रसुतिच्यावेळी गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावल्यामुळे ठराविक अंतराने कळा येत असतात. या कळा (क्रैम्प्स) ओटीपोटात, पोटात, मांड्यात आणि कंबरेत येत असतात. या वेदनात खेचल्यासारखे वाटत असते. त्या वेदना ठरावीक वेळाने पुन्हापुन्हा येत असतात. अशाप्रकारे कळा येत असल्यास ते प्रसुतीचे प्रमुख लक्षण असू शकते. ह्या वेळेस तुम्ही रिस्क न घेता डॉक्टरांना भेटा किंवा हॉस्पिटलला जाणे आवश्यक असते.
योनीतुन स्त्राव होणे –
जर योनीतून रक्तासारखा किंवा तपकिरी रंगाचा चिकट स्त्राव येत असल्यास तेदेखील डिलिव्हरी जवळ आल्याचे दर्शवते. असा स्त्राव येत असल्यास त्वरित दवाखान्यात जावे.
गर्भजलाची पिशवी फुटणे –
गरोदरपणात बाळ हे गर्भजलाच्या पिशवीत तरंगत असते. जेंव्हा स्त्री प्रसूत होते तेंव्हा ही पिशवी फुटत असते. त्यामुळे योनीमधून गर्भजल (अॅम्निओटिक फ्लुइड) योनीतुन बाहेर येऊ लागतो. प्रसूतीचा काळ जवळ आल्यास योनीतुन अशाप्रकारे पाणी जात असल्यास बाळ लवकरच बाहेर पडणार आहे ते समजते.
तीव्र कंबरदुखी –
प्रसूतीची तारीख जवळ आल्यावर जास्त प्रमाणात पाठ व कंबर दुखत असल्यास डिलिव्हरीची वेळ जवळ आल्याचे सूचित होते.
बाळाची हालचाल –
प्रेग्नन्सीत शेवटच्या टप्प्यात पोटातील बाळ हळूहळू खाली सरकत असते. त्यामुळे त्याचा भार मूत्राशयावर पडत असतो. अशावेळी वारंवार लघवीला होत असते. अशी लक्षणे प्रेग्नन्सीत शेवटच्या दिवसात दिसत असल्यास प्रसुतीची वेळ जवळ आल्याचे समजावे.
अशावेळी डॉक्टरांकडे कधी जावे..?
प्रसुतीची तारीख जवळ आल्यावर जर आपल्याला सतत कळा येत असल्यास आणि होणाऱ्या वेदना ह्या कमी होण्याऐवजी वाढतचं असतील तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. या व्यतिरिक्त, जर आपल्या बाळाची हालचाल कमी झाली आहे असे वाटत असल्यास किंवा योनीतून पाणी तसेच रक्त येत असेल तर अशा परिस्थितीतही त्वरित दवाखान्यात जाणे आवश्यक असते.
Read Marathi language article about Labour pain signs & symptoms. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.