अर्धांगवायू कशामुळे होतो, अर्धांगवायूची लक्षणे आणि अर्धांगवायूवर उपचार

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

अर्धांगवायू म्हणजे काय..?

अर्धांगवायू हा मेंदूसंबंधी एक गंभीर आजार असून यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांमध्ये कायमचं अपंगत्वही येऊ शकते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास अर्धांगवायूचा झटका येतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते व हातपाय लुळे पडतात.

अर्धांगवायूचे दोन मुख्य प्रकार आहेत.
1) Ischemic अर्धांगवायू
2) Hemorrhagic अर्धांगवायू

पहिल्या प्रकारच्या म्हणजे Ischemic अर्धांगवायू यामध्ये मेंदूला रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होतो व अर्धांगवायूचा झटका येतो. रक्ताची गुठळी मेंदूच्या एखाद्या रक्तवाहिनीला बंद करते तेंव्हा ह्या प्रकारचा अर्धांगवायूचा झटका येत असतो. साधारण 80 टक्के रुग्ण हे याच प्रकारचे असतात.

तर दुसऱ्या प्रकारात म्हणजे Hemorrhagic अर्धांगवायू मध्ये मेंदूत रक्तस्राव होतो व अर्धांगवायूचा झटका येतो. या प्रकारात मेंदूमधील रक्तवाहिनी फुटून मेंदूत रक्तस्राव होतो. सुमारे 20 टक्के रुग्णांना अशा प्रकारचे अर्धांगवात येताना आढळतो. हाय ब्लडप्रेशरमुळे रक्तवाहिन्यातील लवचिकता कमी होते व त्या कमजोर आणि कडक बनतात. कमजोर झालेल्या रक्तवाहिन्या मेंदूमध्ये फुटतात तेंव्हा मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने Hemorrhagic अर्धांगवायू होतो. हा प्रकार प्रामुख्याने उतारवयात अधिकतेने आढळतो.

अर्धांगवायूत उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा डाव्या बाजूच्या हात, पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो. तर डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये बिघाड होतो तेंव्हा उजव्या बाजूच्या हात, पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो. याठिकाणी अर्धांगवायू कशामुळे होतो, अर्धांगवायूची कारणे, अर्धांगवायू लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती दिली आहे.

अर्धांगवायूची लक्षणे :
• शरीराच्या एका बाजूला अचानक शिथिलपणा किंवा लुळेपणा येणे,
• हातापायात लुळेपणा जाणवितो, मुंग्या येणे,
• ‎तोंड वाकडं होते, बोलता न येणे,
• ‎अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होणे.
• बोललेले न समजणे,
• एक किंवा दोन्ही डोळ्यांना नीट न दिसणे,
• चालताना अडखळणे,
• चक्कर येणे किंवा तोल सांभाळता न येणे,
• अचानकपणे खूप जास्त डोके दुखणे ही प्रमुख लक्षणे अर्धांगवायूत असतात.
अशी लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय उपचार होणे गरजेचे असते.

अर्धांगवायू कशामुळे होतो व अर्धांगवायूची कारणे :

अर्धांगवायूचा झटका येण्यासाठी हाय ब्लडप्रेशर, हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा आणि रक्तात वाढलेले वाईट कोलेस्टेरॉल ही प्रमुख कारणे आहेत.
• ‎याशिवाय धुम्रपान-सिगारेट, तंबाखु व मद्यपान यासारखे व्यसन करणाऱ्या व्यक्तींमध्ये,
• ‎55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये,
• ‎बैठी जीवनशैली व व्यायाम न करण्यामुळे,
• ‎तेलकट, चरबीजन्य पदार्थ, खारट पदार्थ अधिक प्रमाणात खाणाऱ्या व्यक्तींमध्ये,
• ‎कुटुंबात अर्धांगवाताची अनुवंशिकता असल्यास,
• ‎मानसिक ताणतणावामुळे अर्धांगवायूचा धोका अधिक वाढत असतो.

अर्धांगवायू वर उपचार :

एखाद्यास अर्धांगवायूचा अटॅक आल्यास रुग्णाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावे. जवळ वाहतुकीचे साधन नसल्यास 108 नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्या व रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

अर्धांगवायूवर 4 तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये उपचार होणे आवश्यक असते. अर्धांगवायूमध्ये ‘TPA’ नावाचे औषध खूप उपयोगी पडते. पण हे औषध रुग्णाला देण्याचा कालावधी केवळ चार ते साडेचार तास इतका आहे. त्यामुळे 4 तासाच्या आत रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक आहे.

तातडीने उपचार मिळाल्यास एखाद्याचा जीव तर वाचू शकतोच, तसेच त्याचे या आजारात येणारा लुळेपणा लवकर कमी होऊन त्या व्यक्तीला पूर्वीसारखे स्वावलंबी जीवन जगता येऊ शकते.

Web title – Get information about Ardhang vayu in marathi language.