बाळाला दात येणे (baby teething) :
बाळाला दात येणे ही एक सामान्य बाब असते. काही बाळांचे दात हे सहज बाहेर येतात तर काहींना दात येत असताना जास्त त्रास सहन करावा लागू शकतो. बाळाचे दात कधी येतात, दुधाचे दात येताना बाळास काय त्रास होतो याविषयी माहिती येथे दिली आहे.
बाळाचे पहिले दात कधी येतात..?
बाळाचे दुधाचे दात वयाच्या सहा महिन्यानंतर येण्यास सुरवात होते. साधारणपणे 6 ते 9 महिन्यात दात कधीही येऊ शकतात. तसेच काही बाळांचे दुधाचे दात हे चार ते पाच महिन्यातही बाहेर येऊ शकतात.
बाळाला दात उशिरा येण्याची कारणे :
काही बाळांचे दात उशिरा येत असतात. दात उशिरा येणे ही काही समस्या नसते. अनेक बाळांच्या बाबतीत असे होत असते. यासाठी अनुवंशिकता, वेळेपूर्वी जन्म होणे, पोषकघटकांची कमतरता अशी कारणे कारणीभूत असू शकतात.
बाळाला दात येताना होणारे त्रास :
जेव्हा बाळाचे दात बाहेर येऊ लागतात, तेव्हा बाळाच्या हिरड्या किंचित सुजतात. हिरड्यांच्या ठिकाणी वेदनादेखील होत असते. दात बाहेर येण्यापूर्वी आणि दात बाहेर आल्यावर साधारण 3 ते 6 दिवस त्रास होऊ शकतो. अशावेळी खालील लक्षणे असतात.
• हिरड्यांमध्ये सूज असणे, हिरड्या लाल होतात आणि वेदना होतात.
• बाळ चिडचिड करते.
• बाळाच्या तोंडातून अधिक लाळ येऊ लागते.
• वेदना कमी करण्यासाठी बालके आपली बोटे, खेळणी किंवा वस्तू चावण्याचा प्रयत्न करतात.
• तोंडात त्रास अधिक होत असल्याने बालके याकाळात पुरेसे दूध किंवा आहार खात नाहीत.
जास्त त्रास न होता बाळाला दात येण्यासाठी उपाय :
हिरड्यांना मसाज करा –
तुमच्या स्वच्छ बोटाने बाळाच्या हिरड्यांना हलका मसाज करावा. यामुळे बाळास आराम वाटून हिरड्यांतील वेदना कमी होण्यास मदत होईल.
टीथर्स खेळणी द्या –
बाळाला टीथर्स खेळणी आणून द्यावीत. ही टीथर्स खेळणी बाळ तोंडात धरून चावण्याचा प्रयत्न करते. यामुळे हिरड्यांतील वेदना कमी होण्यास मदत होते व दात लवकर येतात. याशिवाय बाळाला स्वच्छ व मऊ ओले कापड ही चावण्यास देऊ शकता.
औषध –
बाळाचे दात जास्त त्रास न होता येण्यासाठी अनेक वर्षांपासून होमिओपॅथीचे Den-Tonic हे औषध वापरले जात आहे. या औषधाचा वापरही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करता येईल.
दात येताना बाळाला ताप येणे किंवा हिरवट रंगाचे पातळ शौचास होणे असे त्रास होत असले तरीही ते त्रास दात येण्यामुळे होत नसतात. तर दात येताना बाळ आपली बोटे किंवा अनेक वस्तू चावण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे अशा अस्वच्छ वस्तू बाळाच्या संपर्कात आल्यामुळे त्याला पातळ जुलाब होणे असे त्रास होऊ शकतात. ताप किंवा जुलाब होत असल्यास त्यावर आपल्या डॉक्टरांकडून योग्य ती औषधे घ्यावीत.
Read Marathi language article about baby teething age. Last Medically Reviewed on March 11, 2024 By Dr. Satish Upalkar.