डोळ्यात खाज सुटणे (Itchy Eyes) :
डोळे हे अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे डोळ्यात धूळ, कचरा गेल्यामुळे, प्रखर ऊन, डोळ्यातील जंतुसंसर्ग किंवा ॲलर्जी यांमुळे प्रामुख्याने डोळ्यात खाज येत असते. यामुळे डोळ्यांत जलन होऊ लागते. अशावेळी डोळे अधिक खाजवल्यास डोळे लाल होतात. डोळ्यांना खाज येणे ही एक सामान्य अशी डोळ्यांची समस्या असून काही उपाय केल्यास व डोळ्यांची योग्य काळजी घेतल्यास ही समस्या दूर होते.
डोळ्यात खाज येणे याची कारणे –
डोळ्यांना खाज येण्याची कारणे अनेक असतात. खालील कारणांमुळे डोळ्यात खाज येत असते.
- डोळ्यात बाहेरील धूळ, कचरा, प्रदूषण गेल्यामुळे डोळ्यात खाज येऊ शकते.
- प्रखर उन्हात फिरल्यामुळे डोळ्यात खाज सुटते.
- डोळ्यांत ऍलर्जीक रिऍक्शन झाल्यामुळे डोळ्यांना खाज येते.
- डोळ्यातील बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे (जंतुसंसर्ग झाल्यामुळे) डोळ्यात खाज येत असते.
- तिखट पदार्थ डोळ्यात गेल्यामुळे सुध्दा डोळ्यामध्ये खाज सुटते.
- सौंदर्य प्रसाधने, केमिकल्सयुक्त साबण डोळ्यांना गेल्यामुळे डोळ्यात खाज येऊ लागते.
- अस्वच्छ कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यामुळे,
- चष्म्याचा नंबर बदलल्यामुळे,
- पुरेशी झोप न घेण्यामुळे,
- स्मार्टफोन, कॉम्प्युटर किंवा टीव्ही अधिक काळ पाहत राहिल्यामुळे डोळ्यांना खाज सुटते.
डोळ्यात खाज येणे यावर उपाय –
डोळ्यात खाज सुटत असल्यास डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे डोळ्यातील धुळ कचरा निघून जाऊन डोळ्यातील खाज कमी होते. याशिवाय डोळ्यातील खाज कमी करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेल्या काकडीचे काप करून ते डोळ्यावर ठेऊ शकता. यामुळेही डोळ्यांना आराम मिळून डोळ्यातील खाज कमी होते. त्याचप्रमाणे बटाट्याचे काप देखील तुम्ही डोळ्यावर ठेऊ शकता. यामुळेही डोळ्यात होणारी खाज कमी होण्यास मदत होते. हे घरगुती उपाय डोळ्यांना खाज येणे यावर उपयोगी पडतात.
डोळ्यात खाज येत असल्यास काय करावे..?
1. स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुवावेत.
दिवसातून दोन ते वेळा स्वच्छ थंड पाण्याने आपला चेहरा आणि डोळे धुवावेत. यांमुळे डोळ्यातील धूळ, कचरा निघून जाते. त्यामुळे डोळ्यांत खाज होत नाही.
2. डोळ्यांना चोळू नका.
डोळ्यात खाज होत असल्यास डोळे खाजवणे टाळावे. कारण डोळे चोळल्याने हा त्रास जास्त वाढतो. तसेच डोळ्यात इन्फेक्शन असल्यास ते इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता असते त्यामुळे असा त्रास होत असल्यास स्वच्छ रुमालने डोळे पुसावे किंवा स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत.
3. दर्जेदार गॉगल वापरावे.
उन्हाळ्यात सूर्यापासून निघणाऱ्या घातक UV किरणांमुळे डोळ्यांची खाज होत असते. यासाठी उन्हाळ्यात बाहेर फिरताना डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी दर्जेदार सनग्लासेज वापरावे. डोळ्यात धूळ, कचरा जाऊ नये यासाठीही हे गॉगल उपयुक्त ठरते.
4. स्मार्टफोन, टीव्ही चा मर्यादित वापर करा.
स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टिव्ही यांचा मर्यादित वापर करावा. या उपकरणांचा सलग वापर करणे टाळावे. डोळ्यांना 15 – 20 मिनिटांनी विश्रांती द्यावी.
हे सुध्दा वाचा – डोळे लाल होणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Itchy Eyes Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.
डॉक्टर तुमच्याकडून नेहमीच चांगल्या हेल्थ टीप्स मिळतात. धन्यवाद
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..
अशीच आरोग्यविषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आमचे YouTube channel देखील subscribe करा.
चॅनल लिंक – https://youtube.com/@HealthMarathiChannel