गर्भधारणेचा सातवा महिना – Pregnancy 7th Month :
सातव्या महिन्यानंतर गर्भधारणेची शेवटची तिमाही सुरू होते. या शेवटच्या तीन महिन्यात अधिक काळजी घ्यावी लागते. कारण येथून पुढे प्रसूतीची वेळ जवळ येत असते आणि गर्भाशयात बाळाचा वेगाने विकास होत असतो. सातवा महिना हा 27 व्या आठवड्यापासून ते 30 व्या आठवड्यापर्यंत असतो.
सात महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे :
सातव्या महिन्यात गरोदर स्त्रीच्या पोटाचा आकार व वजन वाढलेले असते. स्तनसुद्धा अधिक जड वाटतात. निप्पलभोवतीचा भाग गडद काळा होतो. हातापायावर सूज येऊ शकते. विशेषतः पोटातील गर्भाचा भार हळुहळू गर्भवती स्त्रीच्या पायाच्या शिरांवर पडतो व पायांवर सूज येऊ लागते. पोटाच्या व स्तनांच्या त्वचेवर स्ट्रेच मार्क्स येऊ लागतात.
तसेच गर्भधारणेच्या सातव्या महिन्यात ओटीपोटात वेदना (ब्रेक्सटन हिक्स आकुंचन) जाणवू लागतात. योनीतून अधिक स्त्राव येऊ शकतो. याशिवाय अपचन, छातीत जळजळ होणे, मळमळणे, बद्धकोष्ठता, गॅसेस, पाठदुखी हे त्रास होऊ शकतात.
गरोदरपणातील सातव्या महिन्यात होणारी बाळाची वाढ आणि आकार :
सातव्या महिन्यात गर्भाच्या आकारात वाढ व विकास अधिक झालेला असतो. सातव्या महिन्याच्या शेवटी बाळाचे वजन सुमारे 1 किलो असू शकते आणि त्याची लांबी 14 इंच असू शकते. बाळ बाहेरील आवाजावर प्रतिक्रिया देऊ शकते, तसेच ते आपले डोळे उघडू आणि बंद करू शकते. गर्भाची movements या महिन्यात आईला चांगल्यारीतीने जाणवायला लागते.
सातव्या महिन्यामध्ये गर्भाची सर्व प्रकारे वाढ झालेली असते. त्याचे सर्व अंग अवयव तयार झालेले असतात. शरीर संपूर्णपणे तयार असते. त्यामुळेच या महिन्यात प्रसूती झाली तरी बालक जगण्यास तयार असते. परंतु अशा बालकाची प्रतिकारक्षमता मात्र कमी असते. तसेच अशा अकाल प्रसव झालेल्या बालकांना Incubator मध्ये ठेवावे लागते.
गरोदरपणाचा सातवा महिना आणि आहार :
प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यात विशेष काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी सातव्या महिन्यात गर्भवतींनी काय खावे आणि काय खाऊ नये, कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती खाली दिली आहे.
गरोदरपणात सातव्या महिन्यातील आहार असा असावा –
सातव्या महिन्यानंतर गर्भाची वाढ वेगाने होत असते. अशावेळी प्रोटिन्स, लोह, फॉलिक ऍसिड, कॅल्शिअम अशी पोषकतत्वे असणारा आहार घेणे आवश्यक असते. यासाठी आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, हंगामी फळे, संत्री, खजूर, धान्य, कडधान्ये, सुखामेवा, मांस, मासे, अंडी यांचा समावेश करावा.
एकाचवेळी भरपेट न जेवता, दिवसातून तीन ते चार वेळा थोडाथोडा आहार घ्यावा. यामुळे सहजरीत्या अन्नाचे पोषण होते व अपचन व गॅसेसचा त्रास होत नाही. या महिन्यातही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यासाठी आहारात फायबर्सयुक्त पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्य, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश असणे आवश्यक असते. तसेच दिवसभरात 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाणीही वरचेवर थोडेथोडे पीत राहावे.
रुढीनुसार, पहिलटकरीण असेल तर सातव्या महिन्यापासून डोहाळजेवणे आयोजित केली जातात. त्यामध्ये गर्भिणीच्या आवडीचे पदार्थ बनविले जातात. यामध्ये तिला आवडत असलेले परंतु त्रासदायक ठरणारे पदार्थ कमी प्रमाणात द्यावेत. उदा.- बेसन, बटाटा, वांगी इ. वातुळ पदार्थ. तसेच जंतुसंसर्ग होऊ शकेल असे बाहेरचे पदार्थ देणे टाळावे.
गर्भावस्थेतील सातव्या महिन्यात काय खाणे टाळावे..?
बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. तसेच वारंवार तेलकट, मसालेदार, खारट पदार्थ, जंकफूड, मैद्याचे पदार्थ, गोड मिठाईचे पदार्थ खाणे टाळावे. रक्तदाब किंवा हातापायावर सूज असल्यास आहारातील खारट पदार्थ, पापड, लोणचे खाणे टाळावे. सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे, चहा कॉफी वारंवार पिऊ नयेत. तसेच व्यसनांपासून दूर राहावे.
प्रेग्नन्सीचा सातवा महिना आणि व्यायाम :
गरोदरपणाच्या 7व्या महिन्यात असा करावा व्यायाम.
गरोदरपणात व्यायाम करणे हे गर्भवती आणि पोटातील बाळासाठी फायदेशीर असते. यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण कोणता व्यायाम करू शकता याविषयी माहिती जाणून घ्या व त्यानुसार व्यायाम सुरू करा.
गरोदरपणात सातव्या महिन्यात आपण चालण्याचा व्यायाम करू शकता. चालणे हा एक सुरक्षित असा व्यायामप्रकार आहे. यासाठी आपण सकाळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरण्यास जाऊ शकता.
गर्भधारणेचा सातवा महिना आणि वैद्यकीय तपासण्या :
सातव्या महिन्यात गरोदर स्त्रीने ह्या तपासण्या करून घ्याव्यात.
गरोदर स्त्रीचा रक्तगट निगेटिव्ह व पतीचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल तर Coombs test ही रक्ताची तपासणी केली जाते. सोनोग्राफी काही गरज असल्यास केली जाते. या महिन्यातही रक्तदाब, वजन व गर्भाच्या हृदयाचे ठोके तपासले जातात. याशिवाय गरज असल्यास रक्त व लघवीतील साखरेचे प्रमाण तपासले जाते.
प्रेग्नन्सीमध्ये सातव्या महिन्यात अशी घ्यावी काळजी :
- जड वस्तू उचलणे किंवा ढकलणे टाळावे,
- जास्त काष्टाची कामे करणे टाळावे,
- घरातील हलकी कामे करू शकता,
- सुती व सैलसर कपडे वापरा,
- थकवा जाणवल्यास पुरेशी विश्रांती घ्यावी,
- दुपारी अर्धा ते एक तास विश्रांती घ्यावी. या महिन्यापासून गर्भाच्या भाराने पाय दुखणे, सुजणे, कंबर दुखणे इ. तक्रारी निर्माण होत असल्याने विश्रांती आवश्यक आहे.
- ज्या स्त्रिया नोकरी किंवा व्यवसाय करतात त्यांनीही या महिन्यापासून रजा घ्यावी.
- शक्यतो डाव्या कुशीवर झोप घ्या,
- लांबचा प्रवास टाळावा,
- मानसिक ताण आणि दगदग टाळा,
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका,
- डॉक्टरांनी दिलेली लोह व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या औषधे वेळेवर घ्यावीत.
- सातव्या महिन्यात धनुर्वाताचे (टिटी) इंजेक्शन दिले जाते. यामुळे गरोदर स्त्रीचे व बाळाचे प्रसवादरम्यान व प्रसूतिनंतर एक ते दीड महिना धनुर्वातापासून रक्षण होण्यास मदत होते.
हे सुद्धा वाचा –
गरोदरपणात आठव्या महिन्यात घ्यावयाची काळजी ते जाणून घ्या
Read Marathi language article about Seventh Month Pregnancy Symptoms, Diet plan & Care tips. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.